esakal | नका येऊ कुणी दारावर….कोरोनामुळे नातेवाईक, आप्तेष्टांचा आधार दुरापास्त
sakal

बोलून बातमी शोधा

News about rising death toll in pimpalgaoan baswant due to corona Nashik News

नका येऊ कुणी दारावर…. कोरोनामुळे नातेवाईक, आप्तेष्टांचा आधार दुरापास्त

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या निधनाच्या बातम्या कळत असल्या तरी संसर्गाच्या भीतीमुळे त्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे अवघड झाले आहे. ज्यांच्या घरी अशी दुःखद घटना घडते, त्यांनाच जड अंतःकरणाने ‘नका येऊ कुणी दारावर’ असा संदेश द्यावा लागत आहे. सुखात नाही तर नाही, पण दुःखातही हा कोरोना आड येत असल्याने नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवाराची घुसमट होत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून, यामुळे मृत्युदर वाढला आहे. वृद्ध व ज्येष्ठांबरोबर तरुणही बळी पडत आहेत. वृद्धापकाळाने, काहींचा अल्प, तसेच दीर्घ आजाराने, तर काहींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कुटुंबीयांचे दुःख हलके करण्यासाठी तसेच त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन, दारावर, दशक्रिया अशा कोणत्याच विधीला उपस्थित राहण्यास मर्यादा पडत आहेत. इच्छा व ओढ असूनही केवळ कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून येण्या-जाण्यास प्रतिबंध घातला जात आहे.

मानवी नात्यांवरच हल्ला..!

कोरोनाची बाधा होऊ नये, तसेच कोरोनाचा वाहक वा माध्यम बनू नये या उद्देशाने कुणीही सांत्वनाला येऊ नये, असे संदेश सोशल मीडियावर टाकले जात आहेत. कोरोनाच्या अनामिक भीतीमुळे हे दुःख असेच एकेकटे पचविण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीपर्यंत सुख-दुःखाला तरी एकमेकांच्या दारी जाणे व्हायचे. दुःखात मित्रमंडळी, नातेवाइकांचा अशा वेळी मोठाच आधार मिळायचा. दुःख स्वतःलाच सहन करावे लागत असले तरी शेजारपाजारचे लोक, नातेवाईक, स्नेहीजन काही दिवस तरी बरोबर असत. आता इच्छा असली तरी जवळचे नातेवाईकही येऊ शकत नाहीत. कोरोनाने जीवांबरोबरच मानवी नात्यांवरही हल्ला केल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

हेही वाचा: पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा

आमच्या काकूंचे निधन झाल्याने आमची सर्वांची तेथे जाण्याची इच्छा असूनही कोरोना आडवा आल्याने कोणत्याच विधीला आम्ही जाऊ शकत नाही याचे दुःख मोठे आहे. इतर आप्तेष्टांनाही नाइलाजाने दारावर न येण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

-मनेष गवळी, खुंटेवाडी, देवळा

आताची परिस्थिती अशी आहे की ना कुणाच्या अंत्यविधीला जाता येत ना कुणाच्या सांत्वनाला. घरूनच भावपूर्ण श्रद्धांजलीचे कोरडे मेसेज टाकण्याशिवाय हाती काही उरले नाही. कोरोनाने माणसाला एकटे पाडलेय.

-भारत कोठावदे, सामाजिक कार्यकर्ते, देवळा

हेही वाचा: कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा

loading image