esakal | नाशिकमध्ये कोसळ'धार' सुरूच; नदीकाठच्या व्यावसायिकांत धाकधूक | Nashik Rain
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Rain News

नाशिकमध्ये कोसळ'धार' सुरूच; नदीकाठच्या व्यावसायिकांत धाकधूक

sakal_logo
By
दत्ता जाधव


पंचवटी (नाशिक) : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोर‘धार’ सुरूच असल्याने पंधरा हजार क्युसेक वेगाने पाणी गोदापात्रात सोडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या रहिवासीयांसह व्यावसायिकांची धाकधूक वाढली आहे. काठावरील बहुतांश टपऱ्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या तर भांडीबाजार, सराफ बाजारातील अनेकांनी दुकानातील सामान अन्यत्र हलविले. दरम्यान रामकुंड परिसर सकाळीच पाण्याखाली गेल्याने धार्मिक विधींसाठी आलेल्यांना मिळेल तेथे विधी उरकावे लागले.

काल रात्रीच्या कोसळधारेमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. प्रशासनाने व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासून नदीकाठच्या टपऱ्या, अन्य सामान हलविण्याची लगबग सुरू होती. पाणीपातळी वाढून बाराच्या सुमारास पाणी रामकुंड पोलिस चौकीत शिरले.


भांडी, सराफ बाजारात आवराआवर

गत महापुराच्या स्मृती अनेकांच्या स्मरणात असल्याने व प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग करण्याचे ध्वनीक्षेपकावरून सांगितल्याने भांडी बाजारातील व्यावसायिकांसह काही सराफी व्यावसायिकांनी दुकानातील किमती वस्तु सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्राध्यान्य दिले. पुराचे परिमाण समजल्या जाणा-या दुतोंड्या मारूतीच्या छातीच्यावर पाणी पोहोचल्याने अनेकांनी दुकानातील सामान आवरण्यास प्राध्यान्य दिले.

मिळेल तेथे दशक्रिया

काल रात्रीपासून संततधार सुरू असल्याने व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने रामकुंड परिसर सकाळीच पाण्याखाली गेला होता. त्यामुळे अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी दशक्रिया विधी उरकण्यास प्राध्यान्य दिले. पंचवटीकडील भागात उंचवटे असल्याने अहिल्याराम व्यायामशाळेच्याखालील चौथ-यावर मोठ्या प्रमाणावर दशक्रियाविधी झाले, परंतु शहराकडील भागात दशक्रियांसाठी जागाच शिल्लक नव्हती, त्यामुळे अनेक ठिकाणी चक्क पाय-यांवर विधी पार पडले.

हेही वाचा: MPSC परीक्षेत रोहन कुवर मागासवर्गीयांमध्ये राज्यात प्रथम

वाहने हटविली

गंगाघाटावर मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने येतात, त्यात स्थानिकांसह परराज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक असते. त्यांची वाहने नदीकिनारीच उभी केली जातात, परंतु आज पाणी वाढण्याच्या शक्यतेने पोलिस यंत्रणेने नदीकाठी वाहने उभी करण्यास मज्जाव केला. यावेळी वाहनधारक व पोलिसांची काहीठिकाणी हमरीतुमरीही झाली. परंतु पोलिसांनी परिस्थिती पटवून दिल्यावर अनेकांनी आपली वाहने त्याठिकाणहून काढत सुरक्षित स्थळी हलविली.

सर्वत्र टपऱ्याच टपऱ्या

पाणीपातळी वाढू लागल्यावर अनेकांनी काल रात्रीच नदीकाठच्या टपऱ्या सुरक्षितस्थळी हलविल्या होत्या. तर पाणी वाढणार नाही, याआएशवर असणा-या अनेक व्यावसायिकांची आज सकाळीच टप-या हलविण्याची लगबग सुरू होती. नदीकाठावरील या टप-या सरदारचौक, भांडीबाजार, दिल्ली दरवाजा याभागात हलविल्याने सर्वत्र टपऱ्याच दिसून येत होत्या.

हेही वाचा: नाशिक पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलासह दोघांचा चिमुरडीवर बलात्कार

loading image
go to top