SAKAL Exclusive : महागड्या चारचाकींवर चोरट्यांचा ‘डोळा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

car theft

SAKAL Exclusive : महागड्या चारचाकींवर चोरट्यांचा ‘डोळा’

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहनचोरीच्या घटना थांबता थांबलेल्या नाहीत. दुचाकी चोरट्यांचा तर शहरात अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. दुसरीकडे वाहनचोरीला आळा घालण्यासाठी करण्यात येणारी पोलिसांची नाकाबंदीही फोल ठरली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये वाहनचोरट्यांनी आपला मोर्चा महागड्या चारचाकी वाहनांकडे वळविला आहे.

गेल्या दहा महिन्यांत २६ चारचाकी वाहने चोरट्यांनी लंपास केल्या असून, यात महागड्या वाहनांचा समावेश आहे. चार वर्षांमध्ये १०४ चारचाकी वाहने चोरट्यांनी चोरून नेली असून, पोलिसांना केवळ २८ वाहनांचा शोध घेण्यात यश आले आहे. (SAKAL exclusive imported car theft increases 104 four wheeler theft in 4 years Nashik Crime News)

पांढऱ्या रंगाच्याच कार लंपास

शहरात गेल्या दोन महिन्यांत चोरट्यांनी एकाच कंपनीच्या व एकाच मॉडेलच्या पाच महागड्या कार चोरून नेल्या आहेत. विशेषतः चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्याच कार लंपास केल्या असून, बनावट चावी, सॉफ्टवेअरमध्ये बदल करून या कार चोरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक पोलिसांनी तयार केले असले तरी अद्यापपर्यंत पोलिसांना कार चोरट्यांपर्यंत पोचता आलेले नाही.

दरम्यान, २०१८ पासून चार वर्षांमध्ये शहरातून चोरट्यांनी शंभरहून अधिक कार लंपास केल्या आहेत. या प्रकरणी शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांनुसार चोरट्यांनी चार वर्षे दहा महिन्यांत शहर आयुक्तालय हद्दीतून १०४ कार लंपास केल्या आहेत. बहुतांश कार या रात्रीच चोरी झाल्या आहेत. त्यापैकी अनेक कार या अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज होत्या. तरीदेखील त्यापैकी काही कारचा शोध लागलेला नसल्याने त्या कार व चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

गत चार वर्षांत पोलिसांना केवळ २८ चारचाकी शोधण्यात यश आलेले आहे. त्यातील काही चोरटे हे परजिल्हा व परराज्यातील आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या कारचा शोध लागलेला नाही त्या कारचे पुढे काय होते, हा प्रश्नदेखील अनुत्तरित आहे. तर गेल्या दहा महिन्यांत सर्वाधिक २६ चारचाकी चोरीस गेल्या असून, त्यापैकी फक्त चार कारचा शोध पोलिसांना लागलेला आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : साडेसतरा वर्षीय युवती गर्भवती; म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल

वर्ष ---- चोरीस गेलेल्या कार ---- शोध लागलेल्या कार

२०१८ ------------- २१ ----------------- सात

२०१९ ------------- २४ ----------------- आठ

२०२० --------------२३ ----------------- सात

२०२१ ------------- दहा ----------------- दोन

ऑक्टोबर २०२२ पर्यंत ---- २६ -------------- चार

एकूण ---------------१०४ --------------- २८

राजस्थान, बिहार, यूपीत विक्री

दरम्यान, चोरून नेलेल्या कारची विक्री परराज्यात केली जात असल्याचे समोर येते आहे. यात प्रामुख्याने राजस्थान, बिहार, यूपी, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये चोरीच्या कारची विक्री केली जाते. महागड्या व आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत असलेल्या कार चोरटेही अशा तंत्रज्ञानाचा वापर करून रात्रीच्या वेळी चोरी करतात.

काही महिन्यांपूर्वी उपनगर हद्दीतून चोरलेली अशीच कार राजस्थानातून ताब्यात घेण्यात आली होती. मात्र दुचाकींप्रमाणेच चोरीला गेलेली कार सापडण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. परराज्यात विक्री करताना कारची नंबर प्लेट बदलली जात असावी. तसेच त्या राज्यातील ग्रामीण भागात या कारची अत्यल्प दरात विक्री होत असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: Nashik Crime News : गावठी दारु हातभट्टयांवर ग्रामीण पोलिसांचा बडगा!