Latest Crime News | गावठी दारु हातभट्टयांवर ग्रामीण पोलिसांचा बडगा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police team of local crime branch of Nashik rural while destroying the base of Gavathi alcohol hand furnace in rural area.

Nashik Crime News : गावठी दारु हातभट्टयांवर ग्रामीण पोलिसांचा बडगा!

नाशिक : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कळवण, सुरगाणा, वाडिवर्हे, दिंडोरीच्या डोंगर कपारीमध्ये चोरीछुप्यारितीने सुरू असलेल्या गावठी दारुच्या हातभट्ट्यांवर छापा मारत स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने अड्डे उद्‌ध्वस्त करीत, आठ गुन्हे दाखल केले आणि साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (village liquor den demolished by Rural police Nashik Latest Crime News)

नवनियुक्त पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक ग्रामीणचा पदभार घेताच जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनाही अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हेशाखेनेही एका मागोमाग एक कारवाई करीत गावठी दारु अड्डे, मटका, जुगार अड्ड्यांवर छापामारी करीत कारवाई केली जात आहे.

शनिवारी (ता.१९) नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकांनी वाडिवऱ्हे, पिंपळगाव, सुरगाणा, कळवण, सायखेडा, दिंडोरी, इगतपुरी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापे टाकत कारवाई केली. मुकणे शिवारातील राखाडूच्या डोहाजवळ अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टया पोलिसांनी उदध्वस्त केल्या. १ लाख १८ हजार ४०० रुपयांचे साहित्य व रसायन जप्त केले. दोन गुन्हेही दाखल केले.

हेही वाचा: Nashik Crime News : साडेसतरा वर्षीय युवती गर्भवती; म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल

सुरगाणा हद्दीतील रोकडपाडा व सायखेडा हद्दीतील शिंगवे येथे अवैधरित्या सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी ८७ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्याचप्रमाणे, कळवण तालुक्यातील नांदुरी येथे अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर व मोबाईल असा ४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारात अवैध देशी-विदेशी मद्याचा २४ हजार ४७५ रुपयांचा मद्यसाठा जप्त करीत गुन्हा दाखल केला. इगतपुरी तालुक्यातील महामार्गावरील न्यू खालसा पंजाबी ढाब्यावर छापा टाकत पोलिसांनी ५ हजार ८९५ रुपयांचा अवैधरित्या विक्रीचे देशी-विेदेशी मद्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेने आठ गुन्हे दाखल केले असून, ६ लाक ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: Rajya Natya Spardha : ‘तांत्रिक’ अडथळ्याने उत्कंठावर्धक ‘इथर’ प्रेक्षकांपर्यंत पोचलेच नाही