esakal | आदिमायेचा कीर्तिध्वज डौलाने फडकला! सप्तशृंगगडावर भाविकांविना चैत्रोत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

saptshringi

आदिमायेचा कीर्तिध्वज डौलाने फडकला! सप्तशृंगगडावर भाविकांविना चैत्रोत्सव

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि.नाशिक) : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर सुमारे पाचशे वर्षांची परंपरा असलेला कीर्तिध्वज परंपरेनुसार सोमवारी (ता. २६) मध्यरात्री गडाच्या शिखरावर डौलात फडकला. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द असल्याने भाविकांशिवाय चैत्रोत्सव व ध्वजारोहण सोहळा झाला. समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार ५६९ फूट उंचावर असलेल्या गडशिखरावर डौलात ध्वज फडकविला.

सप्तशृंगगड शिखरावर डौलाने फडकला कीर्तिध्वज

कोरोनाचे संकट निवळून आदिमायेचे रूप व शिखरावर डौलात फडकलेल्या कीर्तिध्वजाचे दर्शन लवकरच घेता यावे, यासाठी लाखो भाविकांनी घरूनच आदिमायेचे पूजन केले आहे.चैत्रोत्सवातील चतुर्दशीला (चावदस) धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने याच दिवशी आदिमायेच्या शिखरावर कीर्तिध्वज आरोहणाची सुमारे पाचशे वर्षांची परंपरा आहे. या अद्‌भुत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक उन्हातान्हाची तमा न बाळगता मजल-दरमजल करत गडावर येतात व आदिमायेपुढे नतमस्तक झाल्यानंतर शिखरावर फडकलेल्या कीर्तिध्वजाचे दर्शन घेऊन माघारी परततात. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी या अद्‌भुत सोहळ्यासाठी भाविकांना उपस्थित राहता आलेले नाही.

हेही वाचा: नाशिक ग्रामीणला कोरोनाचा विळखा घट्ट! दैनंदिन आकड्यात शहराला पछाडले

पाचशे वर्षांची परंपरा; यंदा भाविकांविना चैत्रोत्सव

सोमवारी (ता. २६) सकाळी नऊला आदिमायेची नित्यनेमात पंचामृत महापूजा झाली. दुपारी साडेतीनला श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात कीर्तिध्वजाचे पूजन विश्वस्त मनज्योत पाटील, ललित निकम, भूषण तळेकर, सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ध्वजाचे मानकरी दरेगावचे एकनाथ गवळी, काशीनाथ गवळी आदींच्या हस्ते झाले. या वेळी ११ मीटर लांबीचा केसरी ध्वज, ६० फूट लांबीचा ध्वजस्तंभ व ४१ प्रकारचे पूजेचे साहित्य मानकरी गवळी व सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर कोणतेही वाद्य न लावता, पोलिस बंदोबस्तात ध्वज गडावरील देवतांच्या भेटीसाठी गवळी पाटील कुटुंबातील निवडक सदस्यांनी पहिल्या पायरीपर्यंत नेले. या वेळी गडावरील सर्व भाविक व ग्रामस्थांनी कोविड नियमांचे पालन करीत मिरवणुकीत सहभागी न होता दुरूनच कीर्तिध्वजाचे दर्शन घेतले. दरम्यान, गवळी पाटील यांनी सायंकाळी सातला आदिमायेचे दर्शन घेऊन शिखरावर जाताना मार्गातील सर्व देवदेवतांचे पूजन करीत मध्यरात्री समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार ५६९ फूट उंचावर असलेल्या गडशिखरावर डौलात ध्वज फडकविला.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

loading image