Latest Marathi News | रामतीर्थाचा कोंडलेला श्‍वास मोकळा व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram - Tirth

Nashik Ramtirth Update : रामतीर्थाचा कोंडलेला श्‍वास मोकळा व्हावा

नाशिक : शहराची मूळ ओळख श्री गोदावरी नदीपात्रातील ११ तीर्थे व १७ पुरातन कुंडे अशी आहेत. ‘सुंदरनारायण मंदिर ते मोदकेश्‍वर मंदिर’ यादरम्यानच्या गोदावरीच्या अडीच किलोमीटरमधील पात्रात अनेक तीर्थस्‍थाने आहेत. या तीर्थस्‍थानात जिवंत पाण्याच्या झऱ्यांमुळे स्‍वप्रवाही गोदावरी खळाळून वाहत होती. पेशव्यांच्या काळात तसेच गोपीकाबाई यांनी प्रवाहित नदीत स्‍नानासाठी कुंडाची सोय केली.

यात आठ हात गोलाकार गुंफण करून जेवढा भाग तयार होतो, अशा स्‍वरूपात दगडी बांधकाम केले व त्‍याला ‘कुंड’ असे संबोधले गेले. मात्र प्रचलित संबोधन हे तीर्थ असेच आहे. तीर्थाचे बांधकाम दगडी असल्‍यामुळे या खडकातून झिरपणारे पाणी अतिशय शुद्ध व पिण्यास योग्‍य होते. मात्र २००२ मधील काँक्रिटीकरणामुळे तीर्थांचा श्‍वास कोंडला गेला, ते दबले गेले. त्यामुळे गोदावरीचा हा दबलेला श्‍वास मोकळा व्हावा, अशी तमाम नाशिककरांची भावना आहे.

ही सर्व तीर्थे काँक्रिटीकरणाच्या पाशातून मुक्‍त झाल्‍यास खळाळून वाहणारी गोदामाय पुन्हा एकदा भरभरून वाहू लागेल व पुन्हा स्‍वप्रवाही नदीचे सौंदर्य नाशिककरांना अनुभवता येईल. तीर्थाच्या स्‍नानाने मिळणारे समाधान व उत्‍साह अगणिक आहे, स्‍नानाने पापमुक्‍ती होते, असे पद्‌मपुराणात नमूद आहे. (Save Real beauty Ramtirtha be relieved Pollute of flowing river due to concretization Nashikkars need to come forward Nashik News)

हेही वाचा: Nashik : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘गांधी आणि आंबेडकर’ चे सादरीकरण

पुरातन तीर्थे ही नाशिकची मूळ ओळख

इंद्रकुंड, श्रीराम, सीता, लक्ष्‍मण, धनुष्‍य, अहिल्या, अनामिक, शारंगपाणी, द्विमुखी हनुमान, सूर्य, दशाश्‍वमेघ, रामगया, पेशवा अथवा शिंतोडे महादेव कुंड, खंडोबा कुंड, ओक कुंड, वैशंपायन कुंड, मुक्‍तेश्‍वर कुंड

स्थान महात्‍म्‍यानुसार प्रचलित तीर्थे

इंद्रतीर्थे : पंचवटीतील इंद्रकुडातून अरुणा नदीचा प्रवाह गोदावरीत रामकुंड येथे एकत्रित येऊन गोदा व अरुणाचा संगम होतो.

रामकुंडाच्या बाजूस असलेल्या लक्ष्मण कुंडातील पाणी काँक्रिटीकरणापूर्वी पिण्यास योग्‍य होते. मात्र कुंडातील तीर्थाचा बीओडी (ऑक्‍सिजन लेव्हल) साडेतीन ते चार असा होता.

धनुष्‍यतीर्थे : गोदावरी नदी ही धनुष्‍यतीर्थात येऊन दक्षिणेकडे वळते व तिथून तिचा प्रवास हा दक्षिणवाहिनी असा झाला आहे. यामुळे या कुंडाला विशेष महत्त्‍व आहे.

रामतीर्थे : या ठिकाणी साडेतीन तासांत अस्थींचे पाणी होते. म्‍‍हणून याला ‘अस्‍थिविलय तीर्थ’ असेही संबोधले जाते.

सीतातीर्थ : रामतीर्थाच्या बाजूस सीतातीर्थ आहे.

अनामिक तीर्थ : दक्षिण दिशेच्या जवळच हे तीर्थ आहे.

हेही वाचा: Nashik Sports News : ‘भारत- अ’ विरुद्ध अंतिम सामन्‍यात ईश्‍वरी सावकार च्‍या सर्वाधिक धावा

दशाश्‍वमेघ तीर्थ : हे तीर्थ नीळकंठेश्वर महादेव मंदिर आणि गोरेराम मंदिरासमोर आहे. ब्रह्म‍देवाने या ठिकाणी दश अश्‍वमेघ यज्ञ केला म्‍हणून यास ‘दशाश्‍वमेघ तीर्थ’ असे संबोधले जाते. नाशिकची बाजू १७६८ मध्ये हिंगणे आणि राजेबहादूर यांनी बांधली. पंचवटीची बाजू शेवटचे पेशवा व होळकरांनी बांधली.

रामगया तीर्थ : नारोशंकर मंदिरासमोर ‘रामगया तीर्थ’ आहे. या तीर्थाची नाशिकची बाजू कृष्‍णदास परांजपे यांनी १७८० मध्ये बांधली. पंचवटीतील बाजू नारोशंकरांचे बंधू लक्ष्मणशंकर यांनी १७६३ मध्ये बांधली. या तीर्थात रामाने पितृश्राद्ध (दशरथ राजाचे) श्राद्ध विधी केला आहे. म्‍हणून ‘रामगया तीर्थ’ नावानेही प्रसिद्ध आहे.

पेशवा तीर्थ अथवा शिंतोडे महादेव तीर्थ : या तीर्थात पाच नद्यांचा संगम होतो. या तीर्थात वरुणा म्‍हणजेच वाघाडी, सरस्‍वती, गायत्री, सावित्री आणि श्रद्धा या नद्यांचा छोटा प्रवाह येऊन मिळतो. या पाच नद्या येऊन गोदेस मिळतात व गोदा आणि अरुणा असा एकूण सात नद्यांचा संगम येथे झाला आहे. या तीर्थाची नाशिककडील बाजू बाजीराव प्रथम यांनी बांधली. पंचवटीतील बाजू गायधनी आणि चिमा यांनी बांधली.

हेही वाचा: School Nutrition Diet : शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी 11 ठेकेदार पात्र

खंडोबा तीर्थ : हे तीर्थ खंडोबाचे देवस्‍थानासमोर असल्‍याने प्रसिद्ध स्‍थान आहे. हे तीर्थ पानिपतच्या लढाईचे नायक सदाशिवराव भाऊ यांचे काका त्र्यंबकराव मामा पेठे यांनी बांधले आहे.

ओक तीर्थ : १७९५ मध्ये कृष्‍णराव ओक यांनी हे तीर्थ बांधले आहे, म्‍हणून यास ‘ओक’ या नावानेही ओळखले जाते.

वैशंपायन तीर्थ : १८७० मध्ये मामलेदार गणेश नारायण वैशंपायन व नाशिकच्या माळी समाजाने हे तीर्थ बांधले आहे. म्‍हणून हे तीर्थ ‘वैशंपायन’ नावाने प्रसिद्ध आहे.

मुक्‍तेश्‍वर तीर्थ : १७८८ मध्ये पेशव्यांनी नियुक्‍त केलेले मामलेदार मोरो विनायक दीक्षित यांनी हे तीर्थ बांधले. १८२८ मध्ये मामलेदारांचे पुत्र नाना दीक्षित यांनी तीर्थाचा विस्‍तार केला. मुक्‍तेश्‍वर जागृत देवस्‍थानासमोरील हे तीर्थ विशेष पवित्र मानले जाते.

"पुरातन कुंडांचा कोंडलेला श्‍वास हा काही प्रमाणात मोकळा झाला आहे. मात्र पूर्णतः मोकळा होण्यासाठी अथक प्रयत्‍नांची गरज आहे व त्‍यासाठी नाशिककरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपली आई गोदामाईसाठी लढा प्रभावी करण्याची वेळ आली आहे."

- देवांग जानी, गोदाप्रेमी