Anganwadi Recruitment : अंगणवाडीतील हजारांवर रिक्त पदे भरतीला हिरवा कंदील! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

Anganwadi Recruitment : अंगणवाडीतील हजारांवर रिक्त पदे भरतीला हिरवा कंदील!

येवला : चिमुकल्यांसाठी शाळेची गोडी लावणारी संस्कार केंद्र आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य केंद्र या दुहेरी भूमिकेत असणाऱ्या गावोगावच्या अंगणवाड्यात असणाऱ्या रिक्त पदांचा प्रश्न आता सुटू शकणार आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने आज (ता. १०) मान्यता दिली. यामुळे रिक्त असलेली पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विस्कळित झालेल्या कामकाजाला पुन्हा गती येणार आहे.

हेही वाचा: Nashik News : विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरण; सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी

गावोगावी बालकांसह महिलांच्या दृष्टीने अंगणवाडीचे कार्य आजही महत्त्वपूर्ण व मोलाचे ठरत आहे. त्यातच जिल्ह्यात तब्बल आजारावर पदे रिक्त असल्याने अंगणवाड्यांच्या कामकाजाला नक्कीच विस्कळितपणा आला असल्याने जिल्हा परिषदेने व लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी ही रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. ‘सकाळ’ ने देखील वेळोवेळी या प्रश्न आवाज उठविला आहे.

वर्षांपूर्वी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९, मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२ जागा रिक्त होत्या. यात नव्याने भर पडली असून एकट्या येवला तालुक्यात दोन्ही प्रकल्पांची प्रकल्प अधिकाऱ्यांसह ९९ पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यात कामकाजात विस्कळितपणा येऊन कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्‍न वर्षोनुवर्षे पासून कायम असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आहे, त्या सेविका व मदतनिसांवर कामाचा ताण येत आहे. आपले काम पाहून शेजारच्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळण्याची वेळ अनेकांवर येत असल्याने साहजिकच विस्कळितपणा वाढत असल्याचे दिसते. यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती.

आज वित्त विभागाने सेविका,मिनी सेविका व मदतनिसांची मंजूर पदांच्या संकेत रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.यापूर्वी काही जिल्ह्यात ही पदे ५० टक्के प्रमाणात भरली होती. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम जाणवत होता. त्यामुळे रिक्त असलेली २० हजार १८३ पदे भरण्यास आजच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे.

भरती प्रक्रियेच्या वेगळ्यावेगळ्या निकषानुसार ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून भविष्यात मंजूर पदसंख्येच्या प्रमाणात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवावी, असे आदेश देखील शासनाने दिल्याने यापुढे रिक्त होणारी पदे वेळेत भरली जातील, अशी अपेक्षा वाढली आहे.

हेही वाचा: Education News : आधुनिक शिक्षण व्यवस्थेमुळे कुशलतेकडून अकुशलतेकडे वाटचाल ; गिरीश प्रभुणे

रिक्त अधिकाऱ्यांचे काय?

गाव पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र आजही अनेक पंचायत समितीतील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह पर्यवेक्षिका,लिपिक व इतर कर्मचाऱ्यांची पदे ही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यामुळे साहजिकच तालुका पातळीवरून काम करण्यास मर्यादा पडतात.त्यामुळे अधिकाऱ्यांची पदेही त्वरित भरावीत अशी मागणी हे होत आहे.

"अंगणवाडीतील सेविका,मदतनीस यांची रिक्त पदे त्वरित भरावीत व होणारी गैरसोय थांबवावी यासाठी वेळोवेळी मागणी केली होती. ग्रामीण भागात अंगणवाडी गोरगरिबांसाठी नर्सरी-प्लेग्रुप सारखे वर्ग असल्याने या अंगणवाड्या संस्कार केंद्र बनत आहेत, येथील रिक्त पदे भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागत आहे असून त्याची वेळेत अंमलबजावणी करून अंगणवाड्यांना कर्मचारी द्यावेत.” - डॉ.सुधीर जाधव, येवला

हेही वाचा: Education inflation : शिक्षणाचा खर्च वाढला दप्तराच्या ओझ्या इतकाच

★ राज्यातील अंगणवाडी सेविका - ९७४७५

★राज्यातील मिनी अंगणवाडी सेविका - १३०११

★ राज्यातील अंगणवाडी मदतनीस - ९७४७५

★ राज्यातील एकूण अंगणवाडी कर्मचारी - २०७९६१

★ राज्यातील अंगणवाडीची रिक्त पदे- २०१८३