esakal | ‘सर्व्हर अनअव्‍हेलेबल’चा मनस्‍ताप; सायबर कॅफेत होतेय विद्यार्थ्यांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

online exam

सर्व्हर ठप्प; विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना अडचणी

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या द्वितीय सत्रासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यासाठी संकेतस्‍थळाला भेट देत असल्‍याने सर्व्हर ठप्प होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी उद्‌भवत आहेत. ‘सर्व्हर अनअव्‍हेलेबल’ अशी सूचना संकेतस्‍थळावर दाखविली जात असल्‍याने विद्यार्थ्यांना मनस्‍ताप होत आहे. (Server-down-Difficulties-filling-up-examination-forms-for-students-nashik-marathi-news)

गर्दी सायबर कॅफेंवर विद्यार्थ्यांची मोठी

दरम्यान, शुक्रवारी (ता. १८) दुपारी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मोबाईलवर विद्यापीठातर्फे मेसेज आला. त्यात परीक्षा अर्ज भरण्याची मुदत रविवार (ता. २०)पर्यंत देण्यात आली होती. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी सायबर कॅफेंवर झाली. सायबर कॅफेत गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. पुणे विद्यापीठाने जुलै, ऑगस्‍ट महिन्‍यात शैक्षणिक वर्षाच्‍या द्वितीय सत्राची परीक्षा घेणार असल्‍याचे जाहीर केले आहे. या परीक्षांना प्रविष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरायचा आहे. या संदर्भात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्‍या नोंदणीकृत क्रमांकावर लिंक पाठविली आहे. अर्ज चुकायला नको, म्‍हणून बहुतांश विद्यार्थ्यांकडून सायबर कॅफेतून अर्ज भरण्यास प्राधान्‍य दिले जात आहे. मात्र, गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून संकेतस्‍थळात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्‍याने विद्यार्थ्यांना अर्जच भरता येत नसल्‍याची स्‍थिती आहे. संकेतस्‍थळ दुरुस्‍त होण्याच्‍या प्रतीक्षेत तासन्‌तास विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये बसावे लागत असून, गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना सायबर कॅफेवर चकरा माराव्या लागत आहेत. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसह त्‍यांच्‍या पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहेत.

मुदतीबाबत संभ्रमाची स्‍थिती

या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, सर्व्हरची समस्‍या दूर केली असल्‍याचे शुक्रवारी (ता. १८) दुपारी सांगण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत सर्व्हरची समस्‍या ‘जैसे थे’ होती. तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेल्या मेसेजमध्ये परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत रविवार (ता. २०)पर्यंत असल्‍याचा उल्‍लेख आहे. मात्र, ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविली असल्‍याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे परीक्षा अर्ज भरण्याच्‍या अंतिम मुदतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा: सुनेकडून निराधार सासू-सासऱ्यांची फसवणूक; न्यायाची अपेक्षा

हेही वाचा: सत्ताधारी भाजपला घरचा आहेर; भाजप नगरसेवकाकडूनच इशारा

loading image