Maharashtra Politics: हकालपट्टीचा शिक्का नको रे बाबा! संजय राऊतांच्या इशाऱ्याने कार्यकर्ते अन् नेत्यांची पळापळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics News

Maharashtra Politics: हकालपट्टीचा शिक्का नको रे बाबा! संजय राऊतांच्या इशाऱ्याने कार्यकर्ते अन् नेत्यांची पळापळ

नाशिक : शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचे श्राद्ध घालू, असा इशारा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दिल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून हकालपट्टीचे संकेत मिळाल्याने घाईघाईने शिंदे गटात प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. हकालपट्टीचा शिक्का माथी लागल्यास अपेक्षित मागण्या मान्य करताना अडथळ्यांची शर्यत पार पडावी लागण्याची भीती यामागे असल्याचे समजते. जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मदतीने सरकार स्थापन झाले.

बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नवीन पक्षाला दमदार नेत्यांची भरभक्कम फळी उभी करायची आहे. पालकमंत्री दादा भुसे (dada bhuse), खासदार हेमंत गोडसे (hemant godse) व नांदगावचे आमदार सुहास कांदे वगळता दमदार नेता शिंदे गटात सहभागी झाला नव्हता. त्यामुळे नाशिक शहरात नागरिकांसमोर शिंदे गट म्हणून जाताना प्रभावहिनता अधिक दिसून येत होती. अशा परिस्थितीमध्ये दमदार नेत्यांची आवश्यकता होती. त्याअनुषंगाने माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणणे आवश्यक होते. (Shivsena Uddhav Thackeray Eknath shinde Sanjay Raut saamana leaders in nashik wants to escape Maharashtra politics)

हेही वाचा: Uddhav Thackeray Uncut Speech: भाजपच्या मंत्र्यांना बौद्धिक दारिद्र्य; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दोन महिन्यांपूर्वीच प्रवेश निश्चित

संघटनात्मक पातळीवर शिवसेने अंतर्गत असलेल्या कुरबुरी व गटबाजीचा फायदा घेत जवळपास १३ माजी नगरसेवकांना शुक्रवारी (ता.१६) मध्यरात्री शिंदे गटात प्रवेश देण्यात आला. शिंदे गटासाठी मोठी उपलब्धी तर शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे. यानिमित्ताने नाशिकच्या राजकीय पटलावर नव्या पक्षाची दमदार एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे. तेरापैकी सात ते आठ माजी नगरसेवक असे आहेत की, त्यांच्या प्रभागात पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून मतदान होते.

त्यामुळे महापालिकेच्या सभागृहात आजतरी शिंदे गटाचे सात ते आठ नगरसेवक दिसतील, असे बोलले जाते. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांचा दोन महिन्यांपूर्वीच प्रवेश निश्चित झाला होता, मात्र माध्यमांमध्ये शिवसेना फुटीच्या बातम्या झळाकल्यानंतर दोन पावले मागे जाण्याची भूमिका घेतली गेली.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: हे सरकार फेब्रुवारी पाहणार नाही; राऊतांच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, तुमच्या नाकाखालून...

येत्या काळात आणखी प्रवेश

१८ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे शिवसेनेत चर्चा होती. यातील १३ जणांनी शुक्रवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत प्रवेश केला. येत्या काही काळात आणखी पाच माजी नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

वृत्त प्रसिद्ध होण्याची कुणकूण

शिवसेना सोडून अन्य पक्षात प्रवेश करणाऱ्यांची माहिती वरिष्ठ पातळीवर पोचल्यास शिवसेनेचे मुखपत्र सामनातून हकालपट्टी केली जाते. हकालपट्टीचा शिक्का माथी लागल्यानंतर अन्य पक्षात प्रवेश करताना हकालपट्टी झालेल्यांना अटी व शर्तींमध्ये कपात करावी लागते. नाशिकचा दौरा आटोपून गुरुवारी (ता. १५) मुंबईकडे परतताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गद्दारी करणाऱ्यांचे श्राद्ध घालू असा इशारा दिला होता. त्यामुळे सामनात हकालपट्टीचे वृत्त प्रसिद्ध होण्याची कुणकूण लागल्यानेच घाईघाईने गुरुवारी स्वतंत्र सवतासुभा उभारणाऱ्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: MVA Morcha : फडणवीसजी Cool Down; तुमचा जळफळाट समजू शकतो म्हणत राष्ट्रवादीनं डिवचलं