esakal | आजचा श्रीराम जन्मोत्सव बंद दाराआडच

बोलून बातमी शोधा

shriram janmotsav at panchavati
आजचा श्रीराम जन्मोत्सव बंद दाराआडच
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पंचवटी (नाशिक) : शहरासह जिल्हाभरात कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने प्रशासन पुरते धास्तावले आहे. त्यामुळे राज्यभरातील धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांचे आराध्यदैवत असलेला श्रीराम जन्मोत्सवही बुधवारी (ता. २१) निवडक विश्‍वस्त व पुजारीवर्गाच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याशिवाय कामदा एकादशीचे औचित्य साधत काढण्यात येणारा व नाशिकचे वैशिष्ठ्य ठरलेला श्रीराम व गरुड रथोत्सवासह सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

हेही वाचा: पंचवटी पोलिसांकडून दोन दिवसांत २२९ जणांवर कारवाई

प्रभू श्रीराम अन्‌ नाशिक त्यातल्या त्यात पंचवटीचे एक आगळेवेगळे नाते. प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांची काळ्या पाषाणातील एकमेव मूर्ती म्हणून या मंदिराची देशभर महती आहे. त्यामुळे याठिकाणी वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. देवस्थानतर्फे गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे हे सर्व कार्यक्रमच रद्द करण्यात आल्याचे विश्‍वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरची खुल्या बाजारात विक्री; सुधाकर बडगुजर यांचा आरोप

बुधवारी (ता. २१) पहाटे काकड आरती झाल्यावर श्रीरामांची महापूजा झाली, की दुपारी बाराला निवडकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव पार पडेल. त्यानंतर दिवसभर कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. यानिमित्त होणारा रथोत्सव (ता. २३) रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी केवळ मंदिराच्या आवारात ‘श्रीं’चा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा: दहा दिवसांसाठी बांधकामे बंद; बिल्डर्स असोसिएशनचा निर्णय

मंदिराची साफसफाई

वासंतिक नवरात्रोत्सव व त्यानिमित्त होणारा जन्मोत्सव सोहळा रद्द केला असला तरी मंगळवारी (ता. २०) नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली. तसेच, मंदिरावर विद्युत रोषणाईही करण्यात येणार आहे. यंदाचे पुजेचे मानकरी विलासबुवा पुजारी आहेत. पहाटे धनंजय पुजारी यांच्या हस्ते काकड आरती होईल. सायंकाळी सातला अन्नकोट व आठच्या सुमारास नरेशबुवा पुजारी यांच्या हस्ते शेजारती करण्यात येईल. जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.