नाशिकमध्ये मनसेत बंडाचे निशाण; युवा पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला 

mns flag 1111.jpg
mns flag 1111.jpg

नाशिक : महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्ता असतानाही गेल्या चार वर्षांत भाजपला दमदार कामगिरी करता आली नाही. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर वचक निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये मनसेला चांगले दिवस आहेत, परंतु पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून वातावरणनिर्मिती होत नाही. मनसेकडून चालून आलेली संधी दवडली जात असल्याचा आरोप करत मनसेच्या दुसऱ्या फळीतील युवा कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची थेट मुंबईत ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. 

नाशिककरांनी पक्षाला दिले तीन आमदार

युवा कार्यकर्त्यांची तळमळ पाहून राज ठाकरे यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकला येऊन कार्यकर्त्यांशी हितगूज करण्याचा शब्द दिला. युवा कार्यकर्ते सायंकाळी नाशिकमध्ये परतले. मनसेची सत्ता स्थापन झाल्यानंतर नाशिककरांनी पक्षाला तीन आमदार दिले. ४० नगरसेवक निवडून आल्याच्या यशानंतर मनसेची राज्यात ताकद वाढली. २०१२ ते २०१७ मध्ये राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये लक्ष घालून सीएसआरमधून नाशिकमध्ये चांगले प्रकल्प आणले. मात्र महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या, तसे पक्षाला ग्रहण लागले. ज्येष्ठ नेते वसंत गिते यांनी मनसेला ‘रामराम’ करत भाजपमध्ये प्रवेश केला.

अखेरीस युवा कार्यकर्त्यांनी थेट कृष्णकुंज गाठले.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने शिवसेना-भाजपमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी प्रवेश करण्यास सुरवात केल्यानंतर पक्षाची ताकद क्षीण होत गेली. २०१७ च्या निवडणुकीत नाशिककरांनी महापालिकेत भाजपला यश देत बहुमताच्या पुढे नेऊन ठेवले. या निवडणुकीत मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. मनसेच्या यशाला घरघर लागल्यावर संघटना खिळखिळी झाली. गेल्या पावणेचार वर्षांमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात अनेक मुद्दे असताना आणि केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कुठलेही मोठे आंदोलन पक्षाकडून झाले नाही. संघटनात्मक पातळीवरून या विरोधाची दखल घेतली गेली नाही. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात नाशिकमध्ये मोठी लाट असताना त्याचा लाभ संघटनात्मक पातळीवर उठविला जात नाही. डॉ. प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, अनंत सूर्यवंशी यांसारखे प्रदेश पातळीवरचे नेते नाशिकमध्ये असताना भाजप व शिवसेने विरुद्ध कुठलेही मोठे आंदोलन झाले नाही. ही खंत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून होती. निवडणूक जवळ येत असताना खदखद मांडण्यासाठी व्यासपीठ मिळत नसल्याने अखेरीस युवा कार्यकर्त्यांनी थेट कृष्णकुंज गाठले. 

राज ठाकरे यांच्यासोबत अर्धा तास चर्चा
राज ठाकरे यांच्यासोबत अर्धा तास या कार्यकर्त्यांनी चर्चा करून नाशिक संदर्भातील परिस्थिती मांडली. नाशिकमध्ये पक्षाला वातावरण अतिशय चांगले आहे. मनसेच्या सत्ताकाळात केलेल्या कामांची अजूनही नाशिककरांना आठवण आहे, असे असताना संघटनात्मक पातळीवरून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. पक्षाकडून नाशिककरांच्या घरांमधील नाराजी पकडता येत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आल्याचे समाजते. यापूर्वी माणसे सोडून गेलेले अनेक नेते घरवापसीच्या तयारीत आहेत, परंतु त्याची दखल घेतली जात नाही. विविध प्रश्नांवर कार्यकर्ते आंदोलन करण्याच्या तयारीत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आल्याचे समजते. 

काळजी करू नका, मी येतोय! 
युवा कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून राज ठाकरे यांनी काळजी करू नका, आपले काम चालू ठेवा, जानेवारी महिन्यात मी येतोय, असा शब्द राज ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कुठलीही भिडभाड न ठेवता युवा कार्यकर्त्यांनी थेट राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसेंतर्गत वाद उफाळून आला असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना ओव्हरटेक करत दुसऱ्या फळीतील युवा कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे मनसेच्या संघटनात्मक पातळीवर बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com