लॉकडाउनचा 'असाही' परिणाम...आलटून-पालटून झोपण्याचा खास मालेगाव 'फंडा' ठरतोय कुचकामी!

malegaon home.png
malegaon home.png

नाशिक : (मालेगाव) दहा बाय दहाच्या खोलीत वीस-पंचवीस लोक राहात असल्याने मुंबईत कोरोनाचा बेसुमार फैलाव झाला, हे आपण अनेकदा ऐकले, वाचले असेल. मालेगावची स्थिती त्यापेक्षा भयंकर आहे. अशा कोंदट खोल्यांमुळे मोठी कुटुंबे राहात असल्यामुळे वर्षानुवर्षे पुरुषांनी पॉवरलूमवर रात्रपाळीला कामाला जायचे. घरातल्या बायाबापड्या व लहानग्या मुलांनी झोप घ्यायची. दिवसा पुरुषांनी झोपायचे व महिला-मुलांनी घराबाहेर राहायचे, अशी पद्धत आहे. अशी आलटून-पालटून झोप घेणारी हजारो कुटुंबे लॉकडाउन झाली आहेत. परिणामी, वेगळेच आजार पुढच्या काळात समोर आले तर आश्‍चर्य वाटायला नको. 

रात्री व दिवसा आलटून-पालटून झोप घेण्याचा मार्ग

झोपडपट्ट्यांमध्ये किड्यामुंग्यांसारखे आयुष्य काढणाऱ्या माणसांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी शोधलेला हा रात्री व दिवसा आलटून-पालटून झोप घेण्याचा मार्ग आहे. लहान झोपडी व मोठा परिवार, यावर मात करण्याचा प्रयत्न आहे. मालेगावात रात्रीचे यंत्रमाग मोठ्या प्रमाणावर चालतात. पुरुष रात्री कामावर असतात. रात्री काम केल्यानंतर ते दिवसा झोप घेतात. झोपड्यांची उंची जेमतेम सहा-सात फूट. आत-बाहेर करताना कायम झुकून ये-जा करायची. वर्षातले सात-आठ महिने कसे तरी निघतात. पण, उन्हाळ्यात 44-45 अंश जीवघेणा उष्मा तापलेल्या पत्र्याखाली कसा झेलला जात असेल, याची कल्पनाही करवत नाही. परिणामी, अन्य आजारांप्रमाणेच येथे त्वचेचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. 

दोन दिवसांत बारा बाय वीस व बारा बाय पंधराचे घर तयार

मालेगाव शहरात तब्बल 134 झोपडपट्ट्यांमध्ये लाखो कष्टकरी राहतात. कमालपुरा, जाफरनगर, नंदननगर, रिश्‍वतनगर, निहालनगर, गुलशेरनगर डेपो, पवारवाडी, रमजानपुरा, आझादनगर, आयेशानगर पाट किनारा, किल्ला झोपडपट्टी, तकीया झोपडपट्टी अशा पन्नासपेक्षा अधिक झोपडपट्ट्या दाट लोकवस्तीच्या आहेत. बहुतांशी घरे फळ्यांची आहेत. अलीकडे लाकडाचे, भाव वाढल्याने पत्र्याची घरे बांधली जातात. चारही बाजुंनी पत्रे ठोकून दोन दिवसांत बारा बाय वीस व बारा बाय पंधराचे घर तयार होते. वीस बाय वीस व त्यापेक्षा मोठ्या आकाराची घरे बोटावर मोजण्याइतकीच दिसतील. चारही बाजूने पत्रे ठोकून अवघ्या दोन दिवसांत घर तयार होते. निम्म्यापेक्षा अधिक कुटुंबांचे न्हाणी (बाथरूम)घर गटारीवरच आहे. 

गटारीवर न्हाणीघर व बावीस रुपये किलोचा काळा साबण 

झोपडपट्टीवासीयांना सार्वजनिक शौचालयांचाच वापर करावा लागतो. बहुतेकांचे न्हाणीघर जागेअभावी गटारीवरच आहे. पाण्याचा निचरा गटारीत होतो. धुणे-भांड्याचे सांडपाणीही थेट गटारीतच पडते. काही भागात तर गटारीही नाहीत. तिथे पत्र्याचे न्हाणीघर व शेजारी सांडपाण्यासाठी दोन-तीन फुटाचा शोषखड्डा. तो भरला, की उपसून पाणी बाहेर टाकायचे. सांडपाण्याच्या निचऱ्याची ही पद्धत. बहुतेकांकडे स्वतःची नळजोडणी नाही. दुसऱ्या कोणाच्या तरी नळावरून पिण्याचे व जवळच्या कारखान्याच्या कूपनलिकेवरून अन्य वापराचे पाणी आणले जाते.

झोपडपट्ट्यांचे आणखी एक वैशिष्ट्य

कपडे व भांडी धुण्यासाठी वापरला जाणारा बावीस रुपये किलोचा काळा साबण हे मालेगावच्या झोपडपट्ट्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा साबण मालेगाव व धुळे येथे तयार होतो. मागणी वाढली, की त्याची किंमत 40 रुपयांपर्यंत जाते. या साबणाचा दर्जा काय, हे मात्र विचारायचे नाही.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com