'आजार गरिबाचा अन्‌ पथ्यपाणी मात्र श्रीमंतांचे'...या आजाराच्या मृत्यूकडे यंत्रणेचे दुर्लक्षच?

यंत्रमाग कामगार.jpg
यंत्रमाग कामगार.jpg

नाशिक : (मालेगाव) येथील यंत्रमाग कामगार व त्यांच्या वस्त्या प्रदूषणाच्या विळख्यात घट्ट रोवल्या गेल्या आहेत. यंत्रमागावर काम करताना होणारा क्षयरोग व श्‍वसनाचे आजार जणू येथील हजारो कुटुंबांच्या घरचे कायमस्वरूपी सदस्यच बनले आहेत. "आजार गरिबाचा अन्‌ खाण्यापिण्याचे पथ्य श्रीमंतांचे' अशा कात्रीत हजारो रुग्ण सापडले आहेत. भरीस भर म्हणजे तीच तीच औषधे वारंवार घेऊन अनेक रुग्ण रेजिस्ट झाले आहेत. शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही. अशा रुग्णांना ऍन्टिरेजिस्टंट उपचारासाठी मुंबईला धाव घ्यावी लागते. टीबी व फुफ्फुसाच्या रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण मालेगावात मोठे असले तरी याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. 

टीबी झाला जणू आनुवंशिक 

वास्तविक तीन-सहा महिने औषधोपचार घेतल्यास टीबी म्हणजे क्षयरोगाचा रुग्ण हमखास बरा होतो. मात्र यंत्रमागांवर काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबांमध्ये तो जणू आनुवंशिक झाला आहे. काही कामगारांना तो वारंवार होतो. तीच तीच औषधे वारंवार घेऊन फरक पडत नाही. रेजिस्ट झालेल्या अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई गाठावी लागते. त्यासाठी स्वयंसेवी संस्था व दानशूरांची मदत घ्यावी लागते. हा आजार शेवटच्या टप्प्यात गेल्यास रुग्ण दगावतात. मात्र अशा मृतांची कधी चर्चा होत नाही. जणू ते भयंकर वास्तव या शहराने सहज स्वीकारले आहे. खरेतर टीबीसंदर्भात क्‍लस्टर टेस्टिंग झाले पाहिजे. जसे कोरोना विषाणूचे प्रकार वेगवेगळ्या देशात वेगवेगळे आहेत तसा मालेगावातील क्षयरोग वेगळ्या प्रकारचा आहे का, याचे संशोधन व्हायला हवे. 

चळवळी खुंटल्या 

मालेगाव तसा कम्युनिस्टांचा गड मानला जायचा. मात्र येथे कामगारांच्या चळवळी फोफावल्या नाहीत. कारण, एकतर काही नेत्यांचेच यंत्रमाग होते. यंत्रमाग कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार व बोनस मिळत नाही. आठवड्याला पगार दिला जातो. पगारपत्रक ठेवले जात नाही. ईदला दिला जाणारा बोनस नियमाप्रमाणे नसतो. रजा व सुटीच्या काळातील पगार कापला जातो. लेबर ऑफिसर कधी चौकशी करीत नाहीत. पैसा व राजकीय ताकदीवर कामगारांचे वर्षानुवर्षे शोषण सुरू आहे. कामगार संघटित नाहीत. किंबहुना त्यांना संघटित होऊ दिले जात नाही. अनेक पक्ष व त्यांच्या नेत्यांनी कामगारांबद्दल पोकळ पुळका दाखविला. यंत्रमाग मालकांशी मात्र वाईटपणा घेतला नाही. कामगारांच्या प्रश्‍नांना ज्यांनी धार दिली ते राजकारणात पराभूत होत गेले. त्यामुळे वरकरणी कामगारांबद्दल सहानुभूती व आतून मालकांशी हातमिळवणी असेच धोरण राहिले आहे. एक मात्र खरे, की निवडणुकीतील पराभवानंतर पुढाऱ्यांना कामगार व त्यांचे प्रश्‍न काही दिवसांपुरते आठवतात. 

मालेगावचे लोक खरेच मोठ्याने बोलतात का? 

मालेगावात नागरी वस्त्यांमध्ये यंत्रमाग आहेत. सगळीकडे यंत्रमागांचा खडखडाट घुमत असतो. नागरी वस्तीतील यंत्रमागाच्या खडखडाटामुळे येथील दहापैकी तीन कामगारांना जवळपास पूर्ण, इतर आणखी एकाला अंशत: बहिरेपणा आला आहे. कामावर असताना ऐकू जावे म्हणून कामगार एकमेकांशी जोराने बोलतात. जसे कामावर तसेच बाहेरही. त्यामुळे बहुसंख्य मालेगावकरांना मोठ्याने बोलण्याची सवय लागली आहे. याचा परिणाम असा, की मालेगावचे लोक मोठ्याने का बोलतात, असा प्रश्‍न पाहुण्यांना पडतो. 

एकसारख्या आवाजामुळे कानाच्या नसा कमजोर होतात. श्रवणशक्ती कमी होते. काही वर्षांनंतर कानात श्रवणयंत्र बसवावे लागते. मालेगावात बहिरेपणा आलेल्या यंत्रमाग कामगारांची संख्या 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. - डॉ. रमेश चोपडे, कान-नाक-घसातज्ज्ञ, मालेगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com