श्रीलंका अन्‌ सौदी अरेबियासह कांद्याची 25 टक्के निर्यात "ऑर्डर' रद्द..!

onion market nampur.jpg
onion market nampur.jpg

नाशिक : बदलते हवामान आणि अवकाळीच्या भीतीमुळे उघड्यावर ठेवलेला कांदा विक्रीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई केल्याने कांद्याच्या भावातील घसरण कायम आहे. बुधवारी (ता. 18) क्विंटलला सरासरी 900 ते बाराशे रुपये भावावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. निर्यात सुरू असतानाही भाव का कोसळत आहेत, याचा कानोसा घेतल्यावर श्रीलंका आणि सौदी अरेबियासह इतर देशांतील आयातदारांनी रद्द केलेल्या 18 ते 25 टक्के "ऑर्डर' व बांगलादेशमध्ये कोटा पद्धतीचा अवलंब केला जात असल्याची रंगलेली चर्चा कारणीभूत असल्याची माहिती पुढे आली. 

बांगलादेशच्या कोटा पद्धतीची रंगलीय चर्चा.. 
पाकिस्तानमध्ये कांद्याचा तुटवडा असल्याने खासगी आयातदारांनी कांद्याच्या आयातीसाठी मागणी नोंदविली आहे. मात्र आंतरराष्ट्रीयस्तरावर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारलेले नसल्याने निर्यातदार पाकिस्तानमध्ये कांदा पाठविण्यास धजावत नाहीत. बांगलादेश सरकारमधील मंत्र्यांनी कांद्याच्या आयातीच्या अनुषंगाने यापूर्वी अनेकदा वक्तव्ये केली आहेत. अशातच, स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून कोटा पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याची चर्चा कांदा व्यापाऱ्यांमध्ये आहे. अशातच, आता येत्या काही दिवसांमध्ये बांगलादेशमध्ये नवीन कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याची माहिती निर्यातदारांपर्यंत धडकली आहे.

पाकिस्तानला कांदा पाठविण्यास निर्यातदार साक्षंक 

सद्यःस्थितीत भारतामधून तीन सीमांमधून बांगलादेशला कांदा जातो. त्यापैकी गोजागोंडा सीमा भागातून मंगळवारी (ता. 17) पावणेदोन हजार, तर बुधवारी (ता. 18) दीड हजार टन कांदा बांगलादेशकडे रवाना झाल्याची माहिती कांदा निर्यातदारांपर्यंत पोचली. दरम्यान, श्रीलंकेतील आयातदारांनी कांद्याची मागणी नोंदविली होती. मात्र संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर ही मागणी रद्द केली. तसेच सौदी अरेबियाने भारतासह पन्नास देशांमधून आयात बंद करण्याचा निर्णय घेताच, आयातदारांनी "ऑर्डर' रद्द केल्या. काही तासानंतर मात्र पुन्हा फळे आणि भाजीपाला आयातबंदीतून वगळण्यात आल्याचा निर्णय सौदी अरेबियाने जाहीर केला. लंडनमधील आयातदारांनीसुद्धा मागणी रद्द केली आहे. 

भावात दोनशे रुपयांची घसरण 
लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक वाढली. त्यामुळे उन्हाळ कांदा दाखल होण्यापूर्वी जिल्ह्यातील बाजारपेठेत दिवसाला दीड लाख क्विंटल कांद्याची होणारी आवक आता दोन लाख क्विंटलच्या पुढे पोचली आहे. त्यापैकी 25 टक्के कांदा निर्यातीसाठी व्यापारी देत आहेत. जिल्ह्यातून आठवड्याला तीन हजार 200 टन कांदा बिहारकडे विक्रीसाठी रवाना होत आहे. मुळातच निर्यातीला सुरवात होण्यापूर्वी सतराशे ते एकोणीसशे रुपये क्विंटल भावाने लाल कांदा विकला जात होता. निर्यात सुरू झालेली असताना हे भाव कोसळत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. लासलगाव आणि पिंपळगावमध्ये 24 तासांपूर्वी विकलेल्या कांद्याच्या तुलनेत दोनशे रुपयांनी भाव कोसळला आहे. बुधवारी (ता. 18) बाजारपेठेत क्विंटलला सरासरी मिळालेला भाव रुपयांमध्ये असा ः लासलगाव- एक हजार (लाल), एक हजार दोनशे (उन्हाळी), नामपूर- एक हजार 150 (लाल), देवळा- एक हजार 125 (लाल), एक हजार दोनशे (उन्हाळी), मनमाड- एक हजार 93 (लाल), एक हजार दोनशे (उन्हाळी), पिंपळगाव- एक हजार 51 (लाल), येवला- 935 (लाल), सटाणा- एक हजार दोनशे (लाल), चांदवड- एक हजार 220 (लाल). 

हेही वाचा > माणसातच शोधा आता देव...कारण, 'मंदिर'च बंद!...इतिहासात घडतंय पहिल्यांदाच
कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

अहमदाबाद - एक हजार 850 
भुवनेश्‍वर - दोन हजार 300 
चेन्नई - एक हजार 800 
पाटणा - एक हजार 700 
दिल्ली - एत हजार 635 
मुंबई - एक हजार 700 
कोल्हापूर - एक हजार 400 
पुणे - एक हजार 100 
नागपूर - एक हजार 968 

"ऑर्डर' रद्दचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले

लंडनसाठी दोन आणि श्रीलंकेसाठी तीन कंटेनरभर कांद्याची मागणी आयातदारांनी माझ्याकडे नोंदविली होती. त्यानुसार कांदा पाठविण्याची तयारी केली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाव प्रतिबंधाच्या पार्श्‍वभूमीवर या "ऑर्डर' आयातदारांनी रद्द केल्या. "ऑर्डर' रद्दचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले. "मार्च एन्ड'च्या औद्योगिक मालाच्या निर्यात-आयातीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षीपर्यंत 20 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत कांद्याच्या निर्यातीसाठी कंटेनर न मिळणे, कांदा पाठविण्यास विलंब होणे अशा अडचणी यायच्या. आता मात्र कोरोना "इफेक्‍ट'मुळे समस्यांना तोंड द्यावे लागते. - विकास सिंह (कांदा निर्यातदार)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com