एसटी कर्मचारी आंदोलनाची धार जिल्ह्यात अद्याप कायम | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचारी आंदोलनाची धार जिल्ह्यात अद्याप कायम

नाशिक : एसटी कर्मचारी आंदोलनाची धार जिल्ह्यात अद्याप कायम

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपात नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग अद्याप कायम आहे. काही कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावल्‍यानंतरही संपकरी आक्रमक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्यातरी आंदोलनाची धार कायम असल्‍याची स्‍थिती आहे. दरम्यान, एस. टी. च्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही संपाला पाठिंबा दिला असल्‍याचे समजते.

यापूर्वी एसटी प्रशासनाने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्‍यानंतरही कर्मचाऱ्यांनी माघार न घेतल्‍याने नरमाईची भूमिका घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्‍न केला गेला. मात्र, त्‍यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यातच मंगळवारी (ता. १६) प्रशासनाने ३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली होती.

हेही वाचा: घोटी : भात खरेदीला मुहूर्त सापडेना!

बुधवारी (ता. १७) मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या दरम्‍यान एसटी कामगार सेनेच्या प्रादेशिक कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍यास प्रतिसाद मिळाला नसल्‍याचे सध्यातरी बघावयास मिळत आहे. त्‍यातच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही आंदोलनास पाठिंबा दर्शविल्‍याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आंदोलन मिटण्याऐवजी आणखी चिघळण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे.

प्रवाशांना आधार खासगी शिवशाहीचा

दरम्‍यान, प्रशासनातर्फे खासगी शिवशाही बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्‍ध करून दिल्‍या जात आहेत. याअंतर्गत बुधवारी सायंकाळी सहापर्यंत पुण्यासाठी नऊ, धुळ्यासाठी सहा, तर बोरीवलीकरिता दोन बसगाड्या सोडण्यात आल्‍या. याशिवाय ट्रॅव्‍हल्‍सच्‍या बसगाड्यांचा प्रवाशांनी आधार घेतला.

loading image
go to top