esakal | नाशिकमध्ये शनिवारी राज्य वकील परिषद...सरन्यायाधीश बोबडे व मुख्यमंत्री यांची उपस्थिती 
sakal

बोलून बातमी शोधा

thakre-bobde_.jpg

नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवार (ता. 15)पासून ऐतिहासिक दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, धनंजय चंद्रचुड यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, परिषदेचा समारोप माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे

नाशिकमध्ये शनिवारी राज्य वकील परिषद...सरन्यायाधीश बोबडे व मुख्यमंत्री यांची उपस्थिती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवार (ता. 15)पासून ऐतिहासिक दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, धनंजय चंद्रचुड यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, परिषदेचा समारोप माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

सरन्यायाधीश शरद बोबडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती 

महाराष्ट्र- गोवा बार असोसिएशन आणि नाशिक वकील संघातर्फे ही पहिली राज्यस्तरीय वकील परिषद होत आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारात शनिवारी सायंकाळी साडेपाचला न्या. बोबडे यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, भारताचे सॉलिसिटर जनरल ऍड. तुषार मेहता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ऍड. मननकुमार मिश्रा, महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल ऍड. आशुतोष कुंभकोणी, गोव्याचे ऍडव्होकेट जनरल ऍड. देवीदास पंगम प्रमुख पाहुणे असतील. रविवारी (ता.16) सकाळी दहाला प्रथम सत्र सर्वोच्च न्यायालयाचे न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात, "मार्चिंग टोवर्डस्‌ स्पीडी मॉडर्न ज्युडिशिअरी' याविषयी विचारमंथन होईल. या सत्रात न्या. गवई, मुख्यमंत्री ठाकरे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऍड. एएनएस नाडकर्णी, ऍड. कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ शेखर नाफडे, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ऍड. राजेंद्र रघुवंशी सहभागी होणार आहेत. दुपारी दोनला होणाऱ्या सत्रात राज्यातील 26 ज्येष्ठ विधिज्ञांचा गौरव ऍड. मिश्रा, ऍड. कुंभकोणी, ऍड. पंगम यांच्या हस्ते केला जाणार आहे. समारोपाचे सत्र पावणेचारला सुरू होईल. या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब, महापौर सतीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे असतील. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. अविनाश भिडे, सदस्य ऍड. जयंत जायभावे, नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष ऍड. प्रकाश आहुजा, सचिव ऍड. जालिंदर ताडगे, ज्येष्ठ विधिज्ञ विलास लोणारी, ऍड. मनीष बस्ते यांच्यासह पदाधिकारी, वकील संयोजन करीत आहेत. 

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

तयारी अंतिम टप्प्यात 
जिल्हा न्यायालयातील अंतर्गत परिसरात डांबरीकरण, न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीस रंगरंगोटी केली आहे. मुख्य सभामंडपासह इतर मंडप उभारण्यात आले आहेत. उपस्थित वकिलांसाठी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहर पोलिसांनी खबरदारी घेतली असून, नियमित तपासणी केली जात आहे. तसेच, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने शनिवारी दुपारी दोन ते रात्री दहा आणि रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेपर्यंत सीबीएस ते मेहेर सिग्नल या मार्गावरील दुतर्फा वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.  

हेही वाचा > गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकराने चक्क 'तिचा' गर्भपातही केला...त्यानंतर...

loading image