esakal | टेलरिंग व्यवसायावर लॉकडाउनचा फटका! परिस्थिती गेल्यावर्षी पेक्षा वाईट

बोलून बातमी शोधा

Tailoring business closed due to lockdown
टेलरिंग व्यवसायावर लॉकडाउनचा फटका! परिस्थिती गेल्यावर्षी पेक्षा वाईट
sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : जिल्ह्यात साधारण दीड महिन्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे आताही व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा वाईट परिस्थिती अनुभवत असल्याचे टेलरिंग व्यवसाय चालक सांगत आहेत. वर्षानंतर सर्व काही सुरळीत होत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.

लॉकडाऊनने व्यावसायिक अडचणीत वाढ

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने वीकेंड लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता. वीकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला, परंतु रुग्णसंख्या वाढती असल्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध कडक करत बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला. १५ ते २० दिवसांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. टेलरिंग व्यवसायही तोट्यात आला आहे. स्टायलीश कपडे शिवणारे ते अगदी रफू, पिकोफॉल, किरकोळ शिवणकाम करणारे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. एप्रिल आणि मेमध्ये विवाह मुहूर्त असतात. परंतु याच कालावधीत लॉकडाउन असल्याने याचा परिणाम अन्य व्यवसायांसह टेलरिंग व्यवसायावरही झाला आहे. यंदाचा लग्नाचा हंगाम होणार नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारीला पोलिस कोठडी; नाशिक न्यायालयाने सुनावला निर्णय

घेतलेलं कर्ज फेडणेही झालय मुश्किल

गेल्या वर्षापासून लग्नही छोटेखानी होत असल्याने व्यवसायही कमी झाले आहेत. मागच्या वेळी घेतलेले कर्ज अजून फिटत नाही, तोच पुन्हा लॉकडाउन लागले. नाशिक शहरात टेलरिंगचा व्यवसाय करणारे अनेक टेलर असून, ही संख्या मोठी आहे. टेलरिंग व्यवसायाची वर्षभरात लग्न आणि दिवाळी या दोन हंगामातच चांगली उलाढाल होते. गेल्या वर्षीच्या दिवाळीनंतर व्यवसाय सुरळीत झाल्याचे दिसत असतानाच आता पुन्हा लॉकडाउन लागल्याने व्यवसाय ठप्प झाला असून, ही व्यवसाय बंदची परिस्थिती मेअखेर कायम असल्याची भीती व्यावसायिकांना वाटत आहे.

हेही वाचा: ज्येष्ठ महिलेला रात्री उपचाराविना परत पाठविले; रुग्णालयाला संतप्त नागरिकांचा घेराव

लॉकडाउन लागल्याने गेल्या वर्षीपेक्षा या वेळची परिस्थिती वाईट असल्याचे दिसत आहे. दुकानात आठ कर्मचारी असून, त्यांना आधीच पगार दिला आहे. सलग दुसऱ्या वर्षी दुकान बंद असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता व्यवसाय मेअखेरपर्यंत बंद राहील की काय, अशी भीती आहे.
- गणेश नायक, संचालक, शार्प टेलर