
कळवणला साकारले जाणार उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवस्मारक
कळवण (जि. नाशिक) : संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकाचे कळवणकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून बघितलेले स्वप्न लवकरच साकार होणार असून कळवण शहरात शिवरायांच्या स्मारकाचे काम सुरू होत असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुतळ्याची कलाकृती साकारणार पद्मश्री राम सुतार
कळवण शहरात शिवरायांचा भव्य पुतळा असावा ही कळवण तालुक्यातील तमाम शिवभक्तांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मनोकामना आता प्रत्यक्षात उतरणार असून गुरुवारी (दि. ३) शिवरायांनी वास्तव्य केलेल्या किल्ल्यांच्या मातीपुजनाने आणि विविध कार्यक्रमांनी शिवस्मारक कामाचे भूमिपूजन होणार आहे. राज्य शासनाच्या कला संचालनालयाने व मुख्य वास्तुशास्त्रज्ञांनी परवानगी दिल्याने कळवण शहरातील शिवतीर्थ, मराठी मुलांच्या शाळेसमोर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा असलेले शिवस्मारक साकारले जाणार आहे. यामुळे तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून हे स्मारक कळवण शहरासह तालुक्याच्या वैभवात भर घालणार आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार; 'या' महिन्यात होणार मतदान
साधारण तीन कोटी रुपये अपेक्षित खर्च असलेल्या या स्मारकासाठी कळवण नगरपंचायतीने शहराच्या मध्यवर्ती भागात तीन एकर जागा उपलब्ध करून दिली असून सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण स्मारकासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून लोकवर्गणीतून हे शिवस्मारक आकार घेणार आहे. यामध्ये सव्वा कोटी रुपयांदरम्यान किंमत असलेल्या अश्वारूढ पुतळ्याची कलाकृती सुप्रसिद्ध शिल्पकार, पद्मश्री राम सुतार हे साकारत असून सुतार यांच्या दिल्ली येथील स्टुडिओमध्ये पुतळ्याचे काम सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हा पुतळा पूर्ण होऊन कळवण शहरात आणला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि पुतळ्याच्या चारही बाजूला गार्डन व सुशोभीकरण असे या शिवस्मारकाचे स्वरूप असणार आहे.
पुतळ्याची उंची - २१ फुट
पुतळ्याची लांबी - १७ फुट
पुतळ्याचे वजन - ७ टन
चबुतऱ्याची उंची - १८ फुट
चबुतऱ्याची लांबी - २५ फुट
चबुतऱ्याची रुंदी - १५ फुट
गुरुवारी भूमिपूजन व विविध कार्यक्रम -
कळवण शहरातील ह्या नियोजित शिवस्मारकाचे भूमिपूजन येत्या गुरुवारी (दि. ३) रोजी संपन्न होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात ते नऊ या वेळेत ब्रह्मवृंद मंत्रोच्चार व यजमान पुजन, सकाळी नऊ ते दहा ढोल- ताशा पथकाचे सादरीकरण, सकाळी दहा ते सव्वा दहा पर्यंत भूमिपूजन तर सव्वा दहा वाजता प्रा.यशवंत गोसावी यांचे शिवचरित्र व्याख्यान होणार आहे.

वातावरण झाले शिवमय
कळवण तालुक्यात प्रथमच शिवस्मारकाचे काम होत असून तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांना भूमिपूजन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. कळवण तालुका छ्त्रपती स्मारक समितीचे तालुक्यातील गावांमध्ये उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले असून शहर व तालुक्यात भूमिपूजनाच्या आधीच वातावरण शिवमय झाले आहे. तर शिवभक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
हेही वाचा: ‘पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या?’
कळवणकरांसाठी अभिमानाचा क्षण
''गेल्या अनेक वर्षांपासून कळवण तालुक्यातील शिवप्रेमींची आणि नागरिकांची असलेली इच्छा पूर्ण होणार असून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवस्मारक साकारण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या कामासाठी लोकसहभाग महत्वाचा असून लोकवर्गणीला उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. कळवणकरांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.'' - भुषण पगार, अध्यक्ष, कळवण तालुका छ्त्रपती स्मारक समिती.
Web Title: Tallest Chhatrapti Shivaji Maharaj Statue In North Maharashtra Will Constructed At Kalvan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..