prachar.jpg
prachar.jpg

निवडणुकीचे रिंगण सज्ज! आता दहा दिवस रात्रंदिवस नुसता प्रचाराचा धुरळा

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : गावकारभारी ठरविण्यासाठी मैदानात शेवटपर्यंत कोणकोण राहणार, याची उत्सुकता सोमवारी (ता. ५) झालेल्या माघारीनंतर संपली. मैदानातील चेहरे स्पष्ट झाले असून, चिन्हेदेखील ठरली आहेत. निवडणुकीचे रिंगण सज्ज झाले आहे. आता पुढील नऊ दिवस रात्रंदिवस नुसता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. 

६३ गावांतील माहोल थंडीत गरमागरम असणार 

ग्रामदैवतापुढे श्रीफळ वाढवून सोमवारी बऱ्याच गावांमध्ये प्रचाराचा नारळ फुटला आहे. ‘आमचं ठरलंय, तुमची जिरवणार’ अशी खूणगाठ बांधून निफाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असलेल्या गावांमध्ये वातावरण पहिल्याच दिवशी गरम झाले आहे. शह-काटशहाचा उडालेला हा धुरळा गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर आहे. पुढे जाऊन तो गट-तट, भावकीच्या वादाचा रंग घेईल. प्रचाराचा अंतिम टप्पा सत्ताधाऱ्यांच्या काळातील भ्रष्टाचार, गैरकारभार, विकासाच्या मुद्द्याभोवती रुंजी घालणार आहे. १५ जानेवारीला सायंकाळी साडेपाचपर्यंत निफाड तालुक्यातील ६३ गावांतील माहोल थंडीत गरमागरम असणार आहे. 

गावांमध्ये राजकीय संघर्षाचा भडका

ओणे, दावचवाडीमध्ये बिनविरोधचे वारे वाहिले, तर उंबरखेड, सायखेडा, ओझर आदी ठिकाणी बहुतांश जागांवर संघर्ष टळला आहे. पण, उर्वरित गावांमध्ये राजकीय संघर्षाचा भडका उडाला आहे. त्यात लासलगाव, शिरवाडे वणी, उगाव आदी गावांमध्ये मुद्द्याची लढाई कधी गुद्द्यावर येईल, याचा नेम नाही. त्यामुळे संबंधित गावांमध्ये पोलिसांची करडी नजर असेल. थोडी जरी गडबड झाली तरी खैर नाही, असा स्पष्ट संदेश पोलिस यंत्रणेने गावकारभाऱ्यांकडे पोचविला आहे. शिवाय निवडणुकीच्या नियमांची सोमवारी उजळणी घेण्यात आली. त्यातील काटेकोर अटी आणि नियम पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटला. एकीकडे मतदार परीक्षा पाहणारच आहेत, सोबतीला कडक नियमांनी परीक्षा बघायचे ठरविल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. 

कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी सामना रंगणार

त्यातही हिशेबाबाबत प्रशासन अतिशय काटेकोर राहणार आहे. एकाच उमेदवारांचे दोन अर्ज असतील, तर दोन्ही जागांसाठी स्वतंत्र बँक खाते हवे. त्याचा हिशेब दररोज दुपारी दोनच्या आधी पोच झाला पाहिजे, असे बजावले गेले आहे. त्यात दिरंगाई झाली तर पाच वर्षांसाठी निवडणूक रिंगणातून बाद व्हावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे चहापासून पेट्रोलपर्यंत आणि मुरमुऱ्यापासून मटणापर्यंत सगळ्याचा हिशेब करावा लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची फौज बसवून काम करून घ्यावे लागणार आहे. निफाडमध्ये बहुतांश ठिकाणी आमनेसामने होत आहे, तर कुठे तिरंगी, चौरंगी सामना रंगणार आहे. चिन्ह हाती येताच प्रचारपत्रके, बॅनर छापण्यासाठी धांदल उडाली आहे. ती हाती आल्यानंतर प्रचाराचा धमाका उडणार आहे. बहुतांश गावांत ग्रामदैवतापुढे नारळ वाढविण्याची प्रथा आहे. दोन्ही पॅनलचे प्रतिस्पर्धी एकाच दैवताला विजयासाठी साकडे घालतील. पुढेच दहा दिवस गावागावांत व शेतीशिवारातील वातावरण राजकारणाने तंग राहणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com