esakal | निफाडला आगीचे तांडव! नऊ दुकाने भस्मसात, सव्वा कोटीचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

fire in niphad city burnt down nine shops

निफाडला आगीचे तांडव! नऊ दुकाने भस्मसात

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : शहरातील उगाव रस्त्यावरील जनसेवा हॉस्पिटलजवळील नऊ दुकांनाना आज मध्यरात्रीनंतर आग लागून नऊ दुकाने भस्मसात झाली. यात घटनेत नव्यानेच व्यवसाय सुरू केलेल्या नऊ व्यावसायिकांचे अंदाजे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविताना ग्रामस्थांस जवळच्या अग्निशमन बंबांनी मदत केल्याने मोठा अनर्थ टळला.

उगाव रोडवर पत्र्याचे बांधकाम केलेले व्यापारी गाळे आहेत. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास गाळ्यांना आग लागल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले, त्यांनी तातडीने गाळे मालकांना माहिती कळविली. यानंतर उपस्थित नागरिक, तरुणवर्ग यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. निफाड नगरपंचायतीचा पाण्याचा टँकर, पिंपळगांव बसवंत आणि नाशिक येथील अग्निशमन दलाचे दोन बंबानी आग विझवण्याचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिक आणि तरुणांनी प्रयत्नांची शिकस्त करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या नागरिक आणि तरुण वर्ग यांनी पुढे सरकणारी आग आटोक्यात आणली नसती तर अजून बरेच गाळे आगीत खाक झाले असते. घटनास्थळी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, निफाडच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. निफाडचे मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे व तलाठी खंडांगळे यांनी पंचनामा केला.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील १२९ पैकी ८३ कोरोना बाधित ग्रामीणमधील


या व्यवसायिकांचे झाले नुकसान

या आगीत नऊ दुकानात सीताराम गायकवाड यांचे सनिज मेन्स पार्लर, सोहेब शैख यांचे मेहक किड्स अँड मेन्स वेअर (कापड दुकान ), राजेंद्र खैरे यांचे ईश्वरी ऑटो सेंटर, सौ. रुपाली निफाडे यांचे समृद्धी ट्रेडर्स, विजय निफाडे यांचे वसुंधरा हार्डवेअर, आरिफ अन्सारी यांचे महाराष्ट्र ट्रेडर्स, विकास कसबे यांचे श्री साई दूध संकलन केंद्र, सचिन ढेपले यांचे मल्हार खानावळ, संतोष सोळसे यांचे सोळसे इलेक्ट्रिकल अँड सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. नुकसान झालेले सर्व तरुण व्यवसायिक असून त्यांनी कर्ज काढून व्यवसाय सुरु केले होते. हे नुकसान पाहून यातील दुकानदारांना अश्रू अनावर झाले होते.निफाड येथे अग्निशमन दलाचे वाहन मिळावे याबाबतचा ठराव निफाड नगरपंचायतीने केला आहे. त्याची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव तयार करून तो आठ महिन्यांपूर्वीच मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
- डॉ. श्रीया देवचके, मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत.

निफाड शहरामध्ये आग विझवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने तसेच बाहेरून अग्निशमन दलाचे वाहने येण्यास उशीर झाल्याने आगीची दाहकता जाणवली. निफाड शहरात तातडीने अग्निशमन यंत्रणा उभारण्यात यावी.
- भीमराव साळुंखे, निफाड

हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

loading image
go to top