esakal | कॉर्पोरेट आणि खासगी हॉस्पिटल्सच्या मनमानीला बसणार चाप!

बोलून बातमी शोधा

Hospitals
कॉर्पोरेट आणि खासगी हॉस्पिटल्सच्या मनमानीला बसणार चाप!
sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : सध्या कोरोना महामारीत खासगी रुग्णालये भरमसाट बिल आकारत आहेत. इंजेक्शनचा काळा बाजार, वैद्यकीय उपकरणे, औषधांची बिले दुपटी-तिपटीने वसूल केली जात आहेत. भीतीपोटी रुग्ण सध्या कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मनमानीला बळी पडून आर्थिकदृष्ट्या पोखरला जात आहे.

बिलासंदर्भात त्रास आहे; त्वरित संपर्क साधा

कॉर्पोरेट व खासगी हॉस्पिटलच्या मनमानीला चाप लावण्यासाठी सध्या नाशिक शहरात ऑपरेशन हॉस्पिटल नावाची लोकसेवी चळवळ उदयाला आली आहे. या चळवळीची कीर्ती आता नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बिलासंदर्भात त्रास असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन ही टीम सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

अशी चालते चळवळ...

कॉर्पोरेट व खासगी हॉस्पिटलमध्ये बिले वारेमाप आल्यानंतर या टीमला रुग्णाचे नातेवाईक पाचारण करतात. महापालिकेने नेमलेल्या ऑडिटरमार्फत बिल तपासून घेतले जाते. त्याच्यावर ऑडिटची सही घेतली जाते. त्यानंतर या टीममधील अक्षरा घोडके बिलाचे कायदेशीर व नियमानुसार ऑडिट करतात. ऑडिटरने केलेले ऑडिट बरोबर आहे की नाही, हे अक्षरा घोडके ठरवितात. बिलामधल्या तफावतीची आकडेवारी काढली जाते. नंतर ही सर्व टीम रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना बिल नियमानुसार घेतले जावे, अशी विनंती करतात. बिलामधील तफावत डॉक्टरांना समजावून सांगितली जाते. डॉक्टरांनी ऐकले नाही, तर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या वारेमाप बिलाचे विवरण लोकांना दाखविले जाते. डॉक्टरांशी चर्चा करताना फेसबुक लाइव्हद्वारे ही चर्चा सर्व लोकांना दाखविली जाते. यात नियम मोडून किती बिल जादा आकारात आहेत, हे दाखविले जाते. सोशल मीडियाला घाबरून ही रुग्णालये बिले तत्काळ कमी करतात. यातून रुग्णांना न्याय मिळत आहे.

आतापर्यंत तीन कोटी वाचविले

आजपर्यंत ऑपरेशन हॉस्पिटल टीमने ३५ हॉस्पिटलना भेटी देऊन रुग्णांचे जवळपास तीन कोटी रुपये वाचविले आहेत. त्यामुळे ऑपरेशन हॉस्पिटल ही सोशल मीडियावर लोकसेवी चळवळ होत आहे. या चळवळीत अनेक लोक सहभागी होऊन मदत मागत आहेत, तर अनेक लोक चळवळीत येण्यासाठी तयारी दर्शवीत आहेत. खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी लोकसभेत तत्काळ कायदा होऊन वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, अशी या टीमची मागणी आहे.

या टीममध्ये जितेंद्र भावे, मुकुंद दीक्षित, अक्षरा घोडके, रोहन देशपांडे, कामिनी दोंदे, पद्मिनी वारे, सोमा कुऱ्हाडे, वृंदा आहेर काम करीत आहेत.

हेही वाचा: "खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले" गिरीश महाजन यांची टिका