esakal | इगतपुरीत लंपी त्वचारोगाचे थैमान; हजारो जनावरे बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

 lumpy skin disease

इगतपुरीत लंपी त्वचारोगाचे थैमान; हजारो जनावरे बाधित

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात सद्य:स्थितीत लंपी त्वचारोगाने थैमान घातले आहे. अशातच ७३ हजार पशुधनाची देखरेख केवळ ११ डॉक्टरांच्या मदतीने होत असून, तालुक्यात १४ पशुधन रुग्णालय सुरू असलेल्या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा व्याप वाढला आहे. पशुपालकांना पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची अक्षरशः वाट पाहत बसावे लागते.


तालुक्यात पशू संवर्धनासाठी १४ रुग्णालय आहे. यातील अनेक रुग्णालय हे मोडकळीस आली आहेत. तीन पशू वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असून, परिचर संवर्गातील नऊ पदे रिक्त आहेत. आधीच मनुष्यबळ कमी आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला तालुका यामुळे अतिरिक्त कामाचा ताण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत असतो. यामुळे तालुका पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांनी फिरता दवाखान्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यातील ११९ पैकी १५ गावांत लंपी स्कीन साथ रोगाचे थैमान वाढले आहे. या आजाराने पाच हजार दोनशेहून अधिक जनावरे बाधित झाली आहेत. यासाठी उपयुक्त औषधांचा वापर करून साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. या रोगाची लक्षणे गाय व बैल या पशुधनाला अधिक प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. जनावरांच्या शरीरावर विविध भागावर गाठी निर्माण होऊन काही दिवसांनी या गाठी फुटून जखमा तयार होतात. मात्र, मृत्यू प्रमाण कमी असले तरी जनावरांना शारीरिक वेदनांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. पंधरा गावांमध्ये तीन हजार जनावरांचे लसीकरण झाले असून, पाच किलोमीटर अंतरावरील गावांतील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. यासाठी अधिकचा लसीचा साठा वरिष्ठ कार्यालयातून मागणी केला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

हेही वाचा: नाशिक महापालिकेने 348 गणेश मंडळांना परवानगी नाकारलीतालुक्यात पशुधनाला विविध प्रकारच्या आजाराने ग्रासले आहे. पशुधन अधिकारी रिक्त पदे आणि भौगोलिकदृष्ट्या इगतपुरीचे क्षेत्रफळ मोठे असल्याने अधिकाऱ्यांवर कामाचा ताण आहे. पशुधन वाचवून रिक्त पदे तातडीने भरावे. - नारायण जाधव, अध्यक्ष, शेतकरी संघटना.


इगतपुरी तालुक्यासह राज्यात लंपी त्वचारोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याने पशुपालकांनी घाबरून न जाता १९६२ क्रमांक वर संपर्क साधावा. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेत उपचारासाठी प्रयत्न करावे.
- डॉ. प्रदीप कांगने, पशुसंवर्धन विकास अधिकारी, इगतपुरी.

हेही वाचा: ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू; जाणून घ्या बुकिंग प्रोसेस

loading image
go to top