राहुल गांधी आदिवासी आंदोलकांना भेटण्याची शक्यता
---
दोन दिवसांचा दौरा गोपनीय; विविध ठिकाणांची तयारी अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानानिमित्त पक्षाचे नेते राहुल गांधी मंगळवारी (ता. १) व बुधवारी (ता. २) नाशिकला येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांची माहिती अत्यंत गोपनीय राखली जात असली, तरी आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या आंदोलकांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील ७८ जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी नाशिकमधे दाखल झाले. आठ दिवसांपासून संघटन सृजन हे प्रशिक्षण शिबिर राबविले जात आहे. त्यातील पक्षांतर्गत घटना व घडामोडींविषयी जाहीर वाच्यता केली जात नाही. तसेच, राहुल गांधी हे नाशिकला येत असले, तरी त्यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता राखली जात आहे. प्रशासनाने त्यांच्या दौऱ्याविषयी फक्त बुधवारची वेळ कळविली असली, तरी प्रत्यक्षात गांधी हे मंगळवारीच दाखल होण्याची शक्यता वर्तविली जाते. या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. मात्र, बुधवारी विविध ठिकाणी ते भेट देणार असल्याने त्या ठिकाणी अंतिम तयारी केली जात आहे. आदिवासी आंदोलकांनी आयुक्तालयासमोरच स्टेज उभारून त्यांचे स्वागत करण्याची तयारी केली आहे.
आज मोर्चा
आदिवासी आंदोलकांनी मंगळवारी आयुक्तालयावर मोर्चा आयोजित केला आहे. या राज्यव्यापी मोर्चात राज्यातील विविध भागांतून बांधव, विद्यार्थी व युवक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.