पान-२ मेन
-----------------
सेवकांना सातवा वेतन आयोग, विद्यापिठाचा विषय रद्द
--------------
‘मविप्र’च्या वार्षिक सभेत ॲड. ठाकरे यांची घोषणाः अग्निशमनदलासाठी जागेबाबत कायदेशीर सल्ल्यानंतर निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २०ः मविप्र संस्थेत दहावर्षांहून अधिक काळ कार्यरत सेवकांना १ जानेवारी २०२७ पासून सातवा वेतन आयोग देण्याची घोषणा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी रविवारी (ता.२०) वार्षिक सभेत केली. उर्वरित कर्मचाऱ्यांना उचित वेतनवाढीचे आश्वासन त्यांनी दिले. इतिवृत्तात दुरुस्ती करत मविप्र विद्यापीठाचा विषय रद्द करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. अग्निशमन दलाला जागा देण्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याची भूमिका अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी मांडली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.२०) मराठा हायस्कूलच्या (कै) तुकाराम रौंदळ सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी डॉ. सुनील ढिकले होते. सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती डी. बी. मोगल यांच्यासह कार्यकारिणी पदाधिकारी, तसेच माजी सरचिटणीस नीलिमा पवार, माजी अध्यक्ष तुषार शेवाळे, अरविंद कारे, माणिकराव बोरस्ते, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते आदी उपस्थित होते.
सभा सुरळीत व शांततेत पार पाडावी, असे आवाहन सुरुवातीस अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी उपस्थितांना केले. यानंतर प्रास्ताविकात सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी संस्थेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. सभेपुढील विषयांचे वाचन करताना सभेच्या इतिवृत्तास मंजुरीवर चर्चा होत असताना ''मविप्र विद्यापीठ रद्द'' असा उल्लेख असावा, अशी मागणी अध्यक्ष डॉ. ढिकले यांच्यासह विरोधकांनी केली. ही दुरुस्ती मान्य करत विषयाला मंजुरी देण्यात आली. वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे, एकत्रित खर्च-उत्पन्न पत्रके व ताळेबंद पत्रकांना मंजुरी देणे, एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे, २०२६-२०२७ साठी हिशेब तपासनिसांची नेमणूक करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.
संस्थेच्या मालकीची व अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेली जागा महापालिकेला हस्तांतरण करण्याच्या विषयावर चर्चा झाली. हा विषय प्रलंबित ठेवताना, कायदेशीर सल्ला आणि तज्ज्ञांचे मत घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी जाहीर केले.
---
१६-१
सभासद पावतीपासून
कर्ज आकड्यांवर चर्चा
सभेप्रसंगी बाळासाहेब कोल्हे यांनी वारसा सभासदांना देणगी पावत्या मिळण्याची मागणी केली. प्रणव पवार म्हणाले, की कार्यकारिणी सत्तेवर आल्यावर पहिल्या वर्षी १७ कोटी कर्ज फेडले असताना यावर्षी अवघे एक कोटीच कर्ज कसे फेडले. समाजकार्य महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झालेले नाही. वैद्यकीय महाविद्यालयाजवळील जागेत अनाधिकृत बांधकाम केल्याचे मुद्दे उपस्थित केले. यावर उत्तर देताना ॲड. ठाकरे म्हणाले, मुदत कर्ज असल्यामुळे ही कर्जाची रक्कम फेडलेली नाही. वैद्यकीय महाविद्यालयाजवळील जागेत उद्यान विकसित केले असून सभासद, रुग्ण व नातेवाइकांच्या हितासाठी जागेचा वापर होत आहे. कुठल्याही कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा वैयक्तिक स्वार्थ त्यात नसल्याचे प्रतिउत्तर त्यांनी दिले. होरायझन बांधकामाच्या पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अर्ज केला असून, महापालिका स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले. यानंतर माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही मनोगत व्यक्त करताना कार्यकारणीच्या कामकाजासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.
---
इन्फोः
डॉ. ढिकलेंकडून शांततेचे आवाहन..
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा वादळी ठरण्याची चिन्हे असताना, सुरुवातीपासून ॲड. ढिकले यांनी शांततेचे आवाहन सभासदांना केले. सभेदरम्यान वादाचे प्रसंग उद्भवले असता, ‘आपल्याला सभा शांततेत पार पडायची आहे’ असे आवाहन करत त्यांनी उपस्थितांना संयमी भूमिका घेण्याचा आग्रह केला.
---
इन्फोः
कृषी महाविद्यालयाच्या
रस्त्यावरून हवेदावे
मागील कार्यकारणीने जागा खरेदी करताना रस्त्याचा विचार केलेला नव्हता. त्यामुळे चाचडगाव येथील मविप्र कृषी महाविद्यालयासाठी ६० लाख रुपये देऊन रस्त्यासाठी जागा खरेदी करण्याची वेळ ओढवल्याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले. यावर उत्तर देताना डॉ. ढिकले म्हणाले, यापूर्वीच्या कार्यकारिणीतही मी होतो. तेव्हा महाविद्यालयाच्या रस्त्यासाठी जमीन देण्याच्या मोबदल्याने संबंधितांच्या दोन वारसांना नोकरीचे आश्वासन दिले होते. परंतु संबंधितांनी दिलेला शब्द पाळला नसल्याने, रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाल्याचे स्पष्ट केले.
---
इन्फोः
ॲड. ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे...
- संस्थेच्या इंग्रजी शाळांमध्ये वाढता कल, विद्यार्थी संख्या २२ हजारांवर
- मविप्र फिटनेस अकॅडमीद्वारे विद्यार्थी, नागरिकांच्या स्वास्थ्याचा विचार
- माजी विद्यार्थी संघटनेकडून विविध शाखांचे होतेय सक्षमीकरण
- प्रोजेक्ट दृष्टीच्या माध्यमातून ९ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी
- नॅक सेलद्वारे दरवर्षी महाविद्यालयांच्या कामगिरीचा घेतला जातोय आढावा
- आयडिया बॉक्सद्वारे विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना संस्थेचे बळ.
- सर्व शाळांच्या वर्गखोल्यांना स्मार्ट क्लासरूम बनविण्याचा मानस
- फिजिओथेरपी महाविद्यालयाची इमारत सज्ज
- आयुर्वेद रुग्णालय सुरु, महाविद्यालयासाठी पुढील वर्षी अर्ज
- वैद्यकीय महाविद्यालयात सभासदांसाठी दुसरा सभासद कक्ष सुरु करणार
--------------------