esakal | टोमॅटो, कांदा, बटाट्याचे ‘टॉप’चे भाव गडगडले! शेतकऱ्यांना यंदा जबरदस्त फटका
sakal

बोलून बातमी शोधा

tomato onion

टोमॅटो, कांदा, बटाटाचे ‘टॉप’चे भाव गडगडले! योजना कागदावरच

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : केंद्र सरकारच्या ऑपरेशन ग्रीन (operation green) अंतर्गतच्या टोमॅटो (tomato), कांदा(onion), बटाटा(potato) या ‘टॉप’चे भाव गडगडल्याने धूळधाण झाली आहे. टोमॅटो ३ ते ५, कांदा १२ ते १५, तर बटाटा ८ ते १२ रुपये किलो भावाने विकला जात आहे. नाशवंत शेतमाल प्रक्रिया योजनांबद्दल बराच बोलबाला झाला असला, तरीही योजना कागदावर राहिल्याने शेतकऱ्यांना यंदा जबरदस्त फटका बसला आहे.

टोमॅटो ३ ते ५ अन्‌ कांदा १२ ते १५ रुपये किलो

केंद्र सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेत टोमॅटो आणि बटाट्याचा समावेश केला. राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी ५० टक्के आर्थिक भार उचलू शकते, अशी तरतूद त्यात आहे. मात्र, टोमॅटो व बटाट्याच्या उत्पादनात गेल्यावर्षीपेक्षा यंदा दहा टक्के वाढ आणि किंमतीत दहा टक्के घट अशी अट आहे. शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर ओतावे लागले असताना, राज्यभर या योजनेची बरीच चर्चा झाली. केंद्रातील मंत्र्यांनी राज्य सरकारकडून योजनेत सहभागी होण्याची अपेक्षा केली. राज्यातील मंत्र्यांनी संबंधित विभागांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. पण पुढे काय? याचे उत्तर केंद्र अथवा राज्य सरकारकडून मिळालेले नाही. अशातच, कांदा उत्पादकांनी सरकारने बाजारातून ३० रुपये किलो भावाने कांदा खरेदी करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली. त्याचे घोंगडे भिजत पडले आहे. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मध्यंतरी नाशिकमध्ये असताना सरकारने वेळीच कांद्याचा प्रश्‍न हाताळावा, अशी अपेक्षा मांडली होती. त्यासाठी किसान रेलसाठी पाठपुरावा करण्यासोबत वाहतूक अनुदान देण्याची सूचना त्यांनी केली होती. त्याबद्दलही कोणत्याच सरकारकडून उत्तर मिळालेले नाही. टोमॅटोचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळत आहेत. हीच अवस्था कांद्याची झालेली आहे.

आणखी पंधरा दिवस भावात फारसे चढ-उतार नाही

चाळींमध्ये साठवलेल्या कांद्याला कोंब यायला लागलेत. त्याची साल जूनाट झाली असून, वास यायला लागला आहे. हा कांदा साठवणुकीमुळे खर्चात वाढ झालेली आहे. पण अपेक्षित भाव शेतकऱ्यांना अद्याप मिळत नाही. देशांतर्गत मागणीमुळे आणखी पंधरा दिवस भावात फारसे चढ-उतार होण्याची चिन्हे दिसत नसली, तरीही दक्षिणेतील कांद्याची आवक वाढल्यावर नाशिकच्या कांद्याचा वांदा होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. बेंगळुरुमध्ये गेल्या महिन्यात १५ रुपये किलो असा भाव कांद्याला मिळाला होता. पुणे आणि डेहराडूनमध्ये मात्र कांद्याच्या भावात किलोला एक रुपायाहून अधिक घसरण झाली आहे. मुंबईत किलोला अडीच रुपयांनी भाव कमी झाला आहे. प्रत्यक्षात मात्र देशातील ग्राहकांना २५ ते ३५ रुपये किलो भावाने कांदा खरेदी करावा लागत आहे.

हेही वाचा: नाशिक शहरातील 2 हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर

बटाट्याच्या भावात निम्म्याने घसरण

बटाट्याच्या भावात गेल्यावर्षीच्या ऑगस्टच्या भावाशी तुलना केली असता, गेल्या महिन्यात निम्म्याने घसरण झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. घाऊक बाजारात गेल्या महिन्यात बेंगळुरुमध्ये १२, डेहराडूनमध्ये ८, मुंबईत ११, पुण्यात सव्वादहा रुपये किलो या भावाने विकला गेला. गेल्यावर्षीच्या ऑगस्टमध्ये याच बाजारपेठांमधून बटाट्याचा किलोचा भाव २० ते २६ रुपये असा होता. दरम्यान, साठवणुकीतील बटाटा गेल्या महिन्यात मुंबईत साडेनऊ रुपये किलो भावाने विकला गेला. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये त्याचा भाव २१ रुपये ५० पैसे असा होता.

टोमॅटोच्या भावाची स्थिती (आकडे किलोला रुपयांमध्ये)

बाजारपेठ ऑगस्ट २०२१ ऑगस्ट २०२० सप्टेंबर २०२१ किरकोळ विक्री सप्टेंबर २०२१

डेहराडून १०.४६ २२.८९ ९.३३ ४३.३३

हैदराबाद १२.७० १९.२२ १० २६.५०

मुंबई १२.६६ २७.३५ ९ ३१.४०

पुणे ९.८१ १५.०३ ८.७५ ३०

हेही वाचा: चणकापूर उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतीचे मोठे नुकसान

loading image
go to top