esakal | ‘टॉसिलिझुमॅब’ रॅकेटचे थेट मुंबई कनेक्‍शन! मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता
sakal

बोलून बातमी शोधा

tocilizumab

‘टॉसिलिझुमॅब’ रॅकेटचे थेट मुंबई कनेक्‍शन! मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : टॉसिलिझुमॅब इंजेक्‍शनची खूप कमी रुग्‍णांना गरज पडत असते; परंतु या इंजेक्‍शनची एमआरपी अधिक असल्‍याने काळ्या बाजारात तितक्‍याच चढ्या दराने इंजेक्‍शनची विक्री होते आहे. काहींकडून इंजेक्‍शनसाठी थेट एक लाख रुपयांपर्यंत मागणी केली जाते आहे. मुंबईवरून इंजेक्‍शन उपलब्‍ध करून देणार असल्‍याचा दावा दलालांकडून केला जातो आहे. दरम्‍यान, या संदर्भात सखोल चौकशी झाल्‍यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे.

हेही वाचा: नाशिक रोडला दगडफेक; परिस्थिती वेळीच नियंत्रणात

मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता
काळ्या बाजाराच्‍या गैरप्रकाराला आळा घालण्याचे नवे आव्‍हान प्रशासकीय यंत्रणेपुढे उभे राहिले आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी रेमडेसिव्‍हिरनंतर आता टॉसिलिझुमॅब इंजेक्‍शनच्‍या उपलब्‍धतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. डॉक्‍टरांकडून चिठ्ठी (प्रिस्क्रिप्‍शन) लिहून दिल्‍यानंतर रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना इंजेक्‍शनच्‍या उपलब्‍धतेकरिता वणवण फिरावे लागत आहे. काळ्या बाजारात एक लाखापर्यंत मागणी केली जात असल्‍याने, या गैरप्रकाराला आळा घालण्याचे आव्‍हान प्रशासकीय यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.

काळा बाजार तेजीत
जिल्ह्यात कोरोना रुग्‍णांची संख्या वाढत असताना, अत्यवस्‍थ रुग्‍णसंख्येतही वाढ होत चालली आहे. रुग्‍णालयांमध्ये खाटांची उपलब्‍धता करताना नातेवाइकांना चपला घासाव्‍या लागत आहेत. यापूर्वी रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनच्‍या तुटवड्याच्‍या गंभीर समस्‍येला रुग्‍णाच्‍या नातेवाइकांना तोंड द्यावे लागत होते. या इंजेक्‍शनच्‍या उपलब्‍धतेबाबतची प्रशासकीय यंत्रणेने दखल घेतली असून, तुटवड्याचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी थेट कोविड रुग्‍णालयांना इंजेक्‍शनची उपलब्‍धता केली जाते आहे.

रुग्णांचे नातेवाईक फिरताहेत वणवण
असे असले तरी रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. काही रुग्‍णांकरिता डॉक्‍टरांकडून टॉसिलिझुमॅब इंजेक्‍शन देण्याचा सल्‍ला दिला जातो आहे. या संदर्भात डॉक्‍टरांकडून प्रिस्‍क्रिप्‍शन लिहून दिले जात असून, यानंतर इंजेक्‍शन उपलब्‍धतेकरिता रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची कसरत सुरू होते आहे. रेमडेसिव्‍हिरप्रमाणे या इंजेक्‍शनचाही काळा बाजार सध्या सुरू आहे..