नाशिकमध्ये भाविकांची मांदियाळी; सलग सुट्यांमुळे गजबजली मंदिरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

नाशिकमध्ये भाविकांची मांदियाळी; सलग सुट्यांमुळे गजबजली मंदिरे

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : यंत्रभूमी अशी ओळख मिळविण्यापूर्वी नाशिकनगरीची ओळख मंत्रभूमी अशीच होती. शहरावरील धार्मिकतेचा पगडा अद्यापही तसाच असून सध्या देवदर्शनासाठी पंचवटीतील मंदिरांमध्ये राज्यासह परराज्यातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. यानिमित्त पंचवटीच्या अर्थकारणासही थोड्या प्रमाणावर ‘बुस्ट’ मिळू लागल्याचे सकारात्मक चित्र आहे.

कोरोना उद्रेकामुळे मागील दीड वर्षे राज्यातील सर्वच लहानमोठी देवस्थाने सामान्य भाविकांच्या दर्शनासाठी कुलूपबंदच होती. त्यानंतर घटस्थानपेनेच्या पहिल्या माळेला म्हणजे ७ ऑक्टोबरला राज्यातील देऊळबंदी मागे घेण्यात आली. मात्र बंदी हटविल्यानंतरही शहरातील राममंदिर, कपालेश्‍वर, रामकुंड, तपोवन याठिकाणी भाविक पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून पंचवटीत यात्रेकरूंच्या गाड्यांची वर्दळ वाढली असून त्यामुळे पंचवटीतील हॉटेल्स, धर्मशाळा, लॉजिंग, रिक्षाचालक व अन्य व्यवसायात काही प्रमाणात बुस्ट मिळाल्याचे दिसून येते.


श्रीराम, तपोवनाला पहिली पसंती

धार्मिक पर्यटनासाठी शहरात येणाऱ्या यात्रेकरूंची पहिली पसंती श्री काळाराम मंदिरासह निसर्गरम्य तपोवनाला राहिली आहे. त्यामुळे मंदिरे उघडूनही भाविकांची अपेक्षित गर्दी होत नसलेल्या श्री काळाराम मंदिरासह तपोवनात पर्यटक भाविकांची गर्दी दिसू लागली आहे. या शिवाय प्रसिद्ध रामकुंडात डुबकी मारून देशातील एकमेव नंदी नसलेल्या कपालेश्‍वराच्या दर्शनास भाविक पसंती देत आहेत. रामकुंड परिसरात सकाळच्या सुमारास दशक्रियाविधींसाठी गर्दी होते, मात्र आता याठिकाणी दिवसभर गर्दी होत आहे. श्रीरामसह सीतेचे वास्तव्य असलेल्या सीतागुंफा येथेही भाविकांच्या रांगा लागत आहेत.

हेही वाचा: मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नाही? शरद पवारांनी दिलं उत्तर

तपोवनात पर्यटक भाविकांची गर्दी दिसू लागली आहे.

तपोवनात पर्यटक भाविकांची गर्दी दिसू लागली आहे.

शेअर रिक्षांना पसंती

सीतागुंफा, गंगाघाट, रामकुंड भागातून तपोवनात जाण्यासाठी शेअर रिक्षा हा पर्याय उपलब्ध झाला आहे. तपोवनातील मंदिरांसह येथील निर्सगाचा अनुभव घेण्यासाठी तपोवनातही मोठी गर्दी उसळत आहे. यासाठी एका भाविकांकडून परतीच्या प्रवासासह पन्नास ते ऐंशी रुपयांपर्यंत रिक्षा उपलब्ध असल्याने भाविकांकडूनही या शेअर रिक्षांना मोठी पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे हे रिक्षाचालक गाइडचीही भूमिका निभावत असल्याने भाविकांना आपसूकच सर्व माहिती मिळते.

नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांकडूनही या शेअर रिक्षांना मोठी पसंती मिळत आहे.

नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांकडूनही या शेअर रिक्षांना मोठी पसंती मिळत आहे.


पुलाची दुरवस्था

तपोवनाच्या गोदावरीच्या उजव्या तीरावर रामसीतेचे लोखंडी शिल्प अनेक वर्षापूर्वी बसविण्यात आले आहे. याठिकाणी जाण्यासाठी पूर्वी गोदावरीवर छोटासा पूल होता. मात्र या पुलाची दुरवस्था झाल्याने मध्यंतरी तो तोडून टाकण्यात आला. मात्र त्याठिकाणी अद्यापही नवीन पूल बनविण्यात न आल्याने भाविकांना पलिकडे जाण्यासाठी जीव धोक्यात घालण्याबरोबरच मोठी कसरत करावी लागते.

हेही वाचा: बघा अक्षय कुमार काय म्हणतोय...'मी धर्मासाठी जगलोय अन्'...

loading image
go to top