Nashik | फास्टटॅगधारकांना नवा झटका; चांदवडनंतर धुळ्यालाही कापला जातो टोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

toll

फास्टटॅगधारकांना नवा झटका; चांदवडनंतर धुळ्यालाही कापला जातो टोल

sakal_logo
By
उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर संगणक प्रणालीत बदल करून शासनाच्या खात्यात पैसे न जाता परस्पर टोलची रक्कम वळवण्याची घटना ताजी असतानाच टोलवरील झोलचा नवीन प्रकार समोर आला आहे. फास्टटॅग धारकांना पहिला टोल भरूनही पुन्हा दुसऱ्या नाक्यावर तेवढाच टोल आपोआप कापला जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघड झाला आहे. धुळ्यात व चांदवड येथे दोनदा टोल कापला जात असल्याने फास्टटॅगधारकांनी सावध होणे गरजेचे आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर ओझर ते धुळे दरम्यान असलेल्या चांदवड व लळींग (धुळे) टोल नाक्यावर फास्टटँग असलेल्या वाहनाचा दोन्ही ठिकाणी एकाच बाजूची दोनदा टोलची रक्कम वसूल करुन लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत ओझरचे रहिवाशी व एचएएलचे निवृत्त कर्मचारी बाळासाहेब वाघ यांना नुकताच अनुभव आला. श्री. वाघ परिवारासह त्यांच्या कारने (एमएच १५, सीटी ७७७६) धुळे येथे गेले होते. धुळे येथून रविवारी ओझरला परत येतांना ८ वाजून ११ मिनिटांनी धुळे येथील टोल नाक्यावर १४५ रुपये टोलची रक्कम फास्टटॅगमधून कापली गेली. आता नियमानुसार चांदवड टोल नाक्यावर टोल कापयला नको होता. मात्र रात्री ११.२५ ला चांदवड टोल नाक्यावरही पुन्हा १४५ रूपये कापले गेले. एकाच वाहनाला दोन ठिकाणी टोल कापला गेला. असे झाले तर २४ तासाच्या आत एका टोल नाक्यावरची रक्कम परत मिळणे अपेक्षित होते. परंतु ४८ तास उलटूनही जादाची कापली गेलेली रक्कम परत मिळालेली नाही.

हेही वाचा: नाशिक : आयटी पार्क प्रस्तावाला अखेर मंजुरी

हा नवा प्रकार तर नाही ना?
हा प्रकार फास्टटँग लेनमधून येताना झाला आहे. कस्टमर केअरला फोन केला तर उत्तर मिळाले नाही. असे प्रकार अनेक वाहनाच्या बाबतीत होत असावेत अशी शंका वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. अनेक जणांकडे फास्टटॅगला दिलेला मोबाईल क्रमांक वेगळा असतो. कधी चालक वेगळा असेल तर त्याचा मेसेज मालकाला येतो, त्यामुळे चालकाला समजत नाही. तसेच अनेक जण बारकाईने नेमकी किती रक्कम कापली गेली किंवा कसे हे सातत्याने तपासतही नाही,त्यामुळे हाही झोलचा वेगळा प्रकार तर नाही ना अशी शंका खासगी वाहनचालक-मालकांनी व्यक्त केली आहे.

प्रत्येक वाहनचालकाने धुळे येथे जाताना व येताना चांदवड व धुळे या दोन्ही टोलनाक्यावर दोन्ही ठिकाणी टोलची रक्कम खात्यातून कापली गेली तर झाली नाही ना ? हे तपासून घ्यावे. टोलनाक्याच्या या झोलबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे.
- बाळासाहेब वाघ, ओझर.

हेही वाचा: गुरुपुष्यामृत योग : सोने दीड, चांदी 4 हजारांनी स्वस्त! |Nashik

loading image
go to top