esakal | कांदा चाळींवर यूरियाचे संकट! विकृतपणामुळे शेतकऱ्यांनी घेतला धसका
sakal

बोलून बातमी शोधा

onion

कांदा चाळींवर यूरियाचे संकट! विकृतपणामुळे शेतकऱ्यांनी घेतला धसका

sakal_logo
By
संजिव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : एकाच आठवड्यातील ठराविक दिवसाच्या अंतराने साठवणूक केलेल्या कांद्याच्या चाळीत यूरिया टाकण्यात आल्याची घटना येथून जवळच असलेल्या पिंजारवाडी शिवारात घडली. पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. (Urea in stored onions is causing huge losses to farmers nashik news)

भगवान पाटील यांच्याबाबतीत हा प्रकार घडला. १५ ते १६ लाखांचा कांदा उकिरडयावर फेकून देण्याची वेळ आल्याची तक्रार त्यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. २३ जूनला अज्ञात व्यक्तीने यूरियाचे पाणी टाकल्याने एकूण ६०० क्विंटल कांद्याचे नुकसान झाले. या घटनेनंतर त्यांनी खराब झालेला कांदा बाजूला काढून ठेवला व उर्वरित चांगला कांदा पुन्हा त्याच चाळीत ठेवला. त्यानंतर पंधरा दिवसांच्या अंतरातच पुन्हा याच चाळीत ८ जुलैला रात्री पुन्हा यूरिया टाकला. पोलिसांनी घटनस्थळी भेट दिली. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागातही कांदा चाळीत यूरिया टाकण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जूनमध्ये लासलगाव, देवपूरपाडे, सोनज, देवळा तालुक्यात वाखारी, खेडलेझुंगे आदी वेगवेगळ्या गावांतील कांदा चाळीत यूरिया फेकून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पोलिसांत तक्रार दाखल होते. तपास सुरू असतो. खोडसाळपणा करणारा तपासाच्या टप्प्यात सापडत नसल्याने पुढे फाइल बंद होते. अर्थात, हे काही आताच घडले असेही नाही. कांदा उत्पादन पट्ट्यात तीन वर्षांत याबाबत विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई नाही. याउलट कांदा पिकासाठी महागडी बियाणे, पाण्यासाठी कसरती, हाती आलेले पीक चाळीत ठेवल्याने खोडसाळपणाच्या उद्योगामुळे पदरी मात्र हतबलता येते. आपत्कालीन नुकसानभरपाईबाबत शासनाचे विद्यमान निकष व नियमात सदर नुकसान बसत नसल्याने ‘तूपही गेले व हाती धुपाटणे आले’ अशी अवस्था संबंधित शेतकऱ्यांची झालेली असते. शासनस्तरावर साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना एकीकडे प्रोत्साहन म्हणून कांदा चाळीसाठी अनुदान देण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्पादक शेतकरी चांगला भाव मिळणार म्हणून चाळीतला कांदा साठवू लागला आहे. सध्या कोरोना व वातावरणातील सततच्या बदलामुळे मेटाकुटीला आलेल्या बळीराजाला कांदा पीक आधार असताना असूयेपोटी वाढणारा विकृत खोडसाळपणामुळे नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा: पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

शेतकऱ्यांनी घेतला धसका…

जेव्हा कांदाचाळी नव्हत्या तेव्हा कांद्याला जेमतेम भाव मिळत असे. आता चाळींमुळे साठवण क्षमता वाढल्याने भाव मिळतो. कांद्यात अलिल प्रोपिल डायसल्फाईड हा गुणधर्म असल्याने त्याचा यूरियाशी संयोग झाल्याने नायट्रोजन सल्फर ऑक्साइट वायू तयार होऊन कांद्याला पाणी सुटते. त्यामुळे उग्र दुर्गंधी सुटत असल्यामुळे कांद्याला उकिरड्यावर फेकावे लागते. परिणामी, शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. विकृतांच्या या उद्योगाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे.

(Urea in stored onions is causing huge losses to farmers nashik news)

हेही वाचा: मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…

loading image