Latest Marathi News | Civilमध्ये तातडीची ‘दिखाऊ’ डागडुजी; CM येण्यापूर्वीच खड्डे बुजविले अन्‌ धुरफवारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Repairing

Civilमध्ये तातडीची ‘दिखाऊ’ डागडुजी; CM येण्यापूर्वीच खड्डे बुजविले अन्‌ धुरफवारणी

नाशिक : नाशिक- औरंगाबाद रोडवरील भीषण अपघाताच्या घटनेने नाशिकच नव्हे तर, राज्य हादरले आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा नियोजित आळंदी (पुणे) दौरा रद्द करून नाशिकला येण्याचे निश्‍चित होताच, जिल्हा शासकीय रुग्णालयात अवघ्या काही तासात तातडीची पण ‘दिखाऊ’ डागडुजी करण्यात आली.

एरवी, रुग्णालयाच्या आवारातील खड्डे, अस्वच्छता, लिफ्टलगत रंगरंगोटी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या नियोजन बैठक अन्‌ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंगुलिनिर्देश करणाऱ्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही कामे कशी केली, किरकोळ डागडुजीसाठी निधी नावाने बोंब मारणाऱ्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे अवघ्या काही तासात निधी उपलब्ध होऊन दिखाऊ डागडुजी कशी झाली, असे प्रश्‍न जागरूक नागरिकांना या निमित्ताने पडले. एवढेच नव्हे तर, मुख्यमंत्र्यांनी दर महिन्यातून एकदा जिल्हा रुग्णालयास भेट दिली पाहिजे, अशाही प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या. (Urgent repairs in Civil hospital before arrival of CM potholes filled smoke sprayed Nashik Bus Fire Accident News)

हेही वाचा: Nashik Accident : अनेकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग; तातडीने दिले आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करीत दुपारी बारा वाजेपर्यंत नाशिकला येण्याचे निश्‍चित झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन सावध होत लागलीच अधिकारी- कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. ऐरवी, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात खड्ड्यांचे प्रमाण वाढून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले. रुग्णालयाच्याच आवारात पाण्याचे तळे साचून डासांचा प्रादूर्भाव वाढलेला असतो.

अनेक ठिकाणी अस्वच्छता अन्‌ कचऱ्याचे ढिगारे पडून असतात. रुग्णालयात अनेक ठिकाणी डागडुजी आवश्‍यकता असताना त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. जिल्हा रुग्णालयाच्या डागडुजीसाठी, खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यासाठी रुग्णालय प्रशासन नेहमीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंगुलिनिर्देश करते. सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबत जिल्हा प्रशासनाच्या नियोजन बैठकीमध्ये निधी मंजूर केल्यानंतर सदरची कामे केली जातील असे सांगत सदरची कामे करण्यास सतत चालढकलपणा करते.

हेही वाचा: Nashik Bus Fire: ''जाग आली अन् बघतो तर..."; बसमधील छोट्या आर्यनचा थरारक अनुभव

अशी ही टोलवाटोलवी सातत्याने होत असते. मात्र, आज मुख्यमंत्री शिंदे नाशिकला येणार असल्याचे सकाळी निश्‍चित होताच, रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे होत कामाला लागले. तातडीने रुग्णालय आवारात धुरफवारणी करण्यात आली. रुग्णालयाच्या आवारात पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले.

त्याचप्रमाणे रुग्णालयातील लिफ्टच्या ठिकाणी ही डागडुजी करून रंगरंगोटी करण्यात आली. ज्या पोर्चमधून मुख्यमंत्री आपत्कालीन कक्षाकडे जाणार होते, त्या ठिकाणचा कचरा वा दुर्दशा नजरेस पडू नये, यासाठी हिरव्या नेट जाळ्या तातडीने बसविण्यात येऊन ते झाकण्यात आले. एकप्रकारे मुख्यमंत्री येणार असल्याने ही दिखाऊ डागडुजीसाठी अचानक निधी कसा उपलब्ध झाला अशी चर्चा जिल्हा रुग्णालयाच्याच वर्तुळात रंगली होती.

हेही वाचा: Nashik Accident : कंडक्टर प्रवाशांना उठवायला मागे वळला अन्...; कंपनीचं स्पष्टीकरण