'तंबाखूमुक्तीसाठी सोशल मीडियाचा वापर करावा' - दत्तप्रसाद नडे

campaigne.jpg
campaigne.jpg

नाशिक : जिल्ह्यात तंबाखूमुक्तीच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. यात प्रामुख्याने यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप ग्रुप यांचा समावेश असावा. आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून एकत्रित समुपदेशन चर्चासत्र घ्यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी दिल्या. 

अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची सूचना 

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. श्री. नडे म्हणाले, की सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अतिशय धोक्याचे आहे. कोणी सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळला, तर त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात तंबाखूमुक्त जनजागृती करणारे फलक दर्शनी भागात लावावेत. जिल्ह्यात गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखूमुक्त जनजागृती व अंमलबजावणी समन्वय समिती गठीत करून वेळोवळी त्यांचे अहवाल जिल्हास्तरीय समन्वय समितीकडे सादर करावेत. 

सहा हजार ६३४ तंबाखू व्यसनाधीन व्यक्तींचे समुपदेशन

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा समन्वय समिती सचिव डॉ. निखिल सैंदाणे यांनी एप्रिल २०१९ ते मार्च २०२० दरम्यान जिल्हास्तरीय समन्वय समितीने सिगारेट व इतर तंबाखूजन्य कायद्यांतर्गत केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती दिली. तसेच तीन हजार २७३ पुरुष आणि तीन हजार ३६१ महिला असे एकूण सहा हजार ६३४ तंबाखू व्यसनाधीन व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती डॉ. सैंदाणे यांनी दिली.

येलो लाइन कॅम्पेन राबविणार 

तंबाखूमुक्त शालेय परिसर करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून प्राप्त झाल्या आहेत. यानिमित्त शाळेच्या १०० मीटर आवारात येलो लाइन उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. तंबाखूमुक्त शालेय अभियान राबविताना मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांच्या समन्वयातून तंबाखूमुक्त जनजागृती घराघरांत पोचविण्यात येणार आहे.  

यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. दिनेश ढोले, सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, राजेंद्र सूर्यवंशी, शिक्षण विस्ताराधिकारी फ्रान्सिस चव्हाण, पोलिस निरीक्षक शहाजी नरसोडे, प्राचार्य विजय मेधने, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर, जिल्हा समुपदेशक कविता पवार, उज्ज्वला पाटील, दिगंबर नाडे, डॉ. प्रवेश पचौरी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले, स्माल मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अजय चव्हाण आदी उपस्थित होते. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com