Nashik: शहर विकासाच्या दूरदृष्टीचा अन् दिलदार नेता हरपला; माजी आमदार रशीद शेख यांना मालेगावकरांची श्रद्धांजली

MLA Rashid Sheikh
MLA Rashid Sheikhesakal

मालेगाव : शहरवासीयांच्या मनावर गारुड घातलेल्या भिकाऱ्यापासून ते येथील मातब्बरांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या माजी आमदार तथा माजी महापौर रशीद शेख (वय ६८) यांचे निधन झाल्याने शहरातील राजकारणाचे चार दशकांचे पर्व समाप्त झाले.

त्यांच्या निधनामुळे इथल्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. एक दिलदार, दानशूर व्यक्तिमत्त्व व शहर विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले अशी शहरवासीयांची भावना आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. (visionary and courageous leader of city development lost Malegaon residents pay tribute to former MLA Rashid Sheikh Nashik)

शेख शफी यांच्या सामान्य कुटुंबात रशीद शेख यांचा जन्म झाला. कुटुंबाची जेमतेम परिस्थिती असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी वेगवेगळी कामे केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी बांगड्या भरण्याचे काम व व्यवसाय केला.

या व्यवसायातून त्यांना संभाषण कला अवगत झाली. संघटन कौशल्याच्या जोरावर मित्र परिवाराचा मोठा गोतावळा जमा झाला.

त्यानंतर नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष, महापौर अशा चढत्या क्रमाने चार दशके त्यांनी शहरातील राजकारण सांभाळले. कुठलाही राजकीय वारसा नसताना बांगडी विक्रेता ते आमदार ही त्यांची कारकीर्द चित्रपट कथानकात शोभेल अशी होती.

रशीद शेख यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा १९८५ मध्ये नगरसेवक म्हणून झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९९१ व १९९६ असे सलग तीन पंचवार्षिक त्यांनी नगरसेवक पदाची ‘हॅटट्रिक' साधली.

या काळात १९९२-९३ मध्ये ते नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी विकासकामे केली. त्यातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले. १९९४ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

त्यात त्यांचा पराभव झाला. १९९९ मध्ये त्यांनी माजी विरोधीपक्षनेते निहाल अहमद यांचा पराभव करून राज्याच्या राजकारणात ते ‘जायंट कीलर' ठरले. १९९४ च्या पराभवाची परतफेड त्यांनी केली. २००४ मध्ये सलग दुसऱ्यांदा ते विजयी झाले.

अत्यल्प शिक्षणामुळे मंत्रिपदाची त्यांची संधी हुकली. मात्र काँग्रेसने त्यांना राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष करून राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला.

MLA Rashid Sheikh
Nashik News: गारपीटीने उद्धवस्त द्राक्षबागेवर कुऱ्हाड! वैतागलेल्या वाकी खुर्द येथील बागायदार शेतकऱ्यांचा निर्णय

याकाळात त्यांनी शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेली १२५ कोटींची गिरणा धरण पाणीपुरवठा योजना, २०० खाटांचे सामान्य रुग्णालय, यंत्रमागधारकांना वीजबिलात सवलत, वस्त्रोद्योग योजना, घरकुल, महापालिका रुग्णालय अशी विकासकामे मार्गी लावली. मुलगा आसीफ शेख यांना महापौर व आमदार, तर पत्नी ताहेरा शेख यांना महापौर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

महानगरपालिकेत लोकाग्रहास्तव त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शिवसेनेशी युती करून २०१७ मध्ये ते महापौर झाले. दशकांपासून ते महापालिकेत नगरसेवक होते. या काळात त्यांनी शहरविकासाची अनेक कामे मार्गी लावली.

दानशूर म्हणून त्यांची प्रतिमा होती. त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेला कोणीही रिकाम्या हाताने परतत येत नसे. गरीब जनतेला ते सढळ हाताने सतत मदत करत. ‘क्या लेके आए थे और क्या लेके जाएंगे' अशी त्यांची भूमिका होती.

शहरातील गणेश मंडळांना त्यांचे भरभरून सहकार्य असायचे. मतदारसंघाचे मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य असे विभाजन झाल्यानंतर पश्चिम भागातील त्यांचा जनसंपर्क व सामाजिक संस्थांना मदत कायम राहिली.

गेल्यावर्षी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ‘एक दिन बित जायेंगा माटी के मोल, जग में रह जायेंगे प्यारे तेरे बोल...' या गाण्याप्रमाणे रशीद शेख हे शहरवासीयांच्या चिरकाल स्मरणात राहतील.

MLA Rashid Sheikh
Nashik News: जळीत कुटुंबाच्या मदतीला धावले तहसीलदार अन्‌ तलाठी संघटना; आगीत खंडागळे कुटुंबाचा संसार भस्मसात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com