esakal | संचारबंदीने आधीच हतबल, त्यात पाण्यावाचून तडफड..महिलांचा टाहो

बोलून बातमी शोधा

water shortage

संचारबंदीने आधीच हतबल, त्यात पाण्यावाचून तडफड..महिलांचा टाहो

sakal_logo
By
राम शिंदे

सर्वतीर्थ टाकेद (जि.नाशिक) : इगतपुरीच्या पूर्व भागातील गटग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशी येथील ६०-७० कुटुंब असलेल्या ठोकळवाडीतील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भरउन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे. दर वर्षीप्रमाणेच यंदाही ठोकळवाडीतील आदिवासी महिला माता-भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र वणवण करत फिरावे लागत आहे. कोरोनाच्या संचारबंदीआधीच हतबल होऊन बेरोजगार झालेला शेतकरी मजूरवर्ग घरी राहूनसुद्धा पाण्यावाचून सुखी नाही.

महिला भगिनींचा पाण्यासाठी टाहो

विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांचे हे गाव असून, या ग्रुपग्रामपंचायत मायदरा-धानोशी ठोकळवाडीतील ग्रामस्थ महिलांना दर वर्षी उन्हाळाभर डोक्यावर हंडा घेऊन दूर अंतरावर रानोमाळ भटकंती करत पाणी मिळेल तिथे जाऊन पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतीसह विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांनी ठोकळवाडीत पाण्यासाठी दोन हातपंप दिले. परंतु हातपंपांनी पूर्ण तळ गाठल्याने एकाच हातपंपावर संपूर्ण ठोकळवाडी ग्रामस्थ नंबर लावून रात्रंदिवस पाणी भरतात. या बोअरवेल हातपंपाने तळ गाठल्याने या हातपंपावर दर अर्ध्या तासाला एक हंडाभर पाणी मिळत आहे. पाण्यासाठी अवाजवी वेळ खर्च करूनही पाणी मिळत नाही. यामुळे येथील महिलांना याव्यतिरिक्त अन्य दुसरा पर्याय नाही. तसेच दुसरे साधन नसल्याने याठिकाणी सर्व ग्रामस्थ भांड्यांचे नंबर लावून ठेवतात व घरी निघून जातात. ग्रामस्थ, महिला कोरोनाच्या भीषण परिस्थितीत पाण्यावाचून जीवन जगत आहे. ही परिस्थिती वर्षानुवर्षे अशीच सुरू आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी ठोकळवाडीतील ग्रामस्थांना पाइपलाइनने पाणी द्यावे, अशी मागणी कुसुम मुंडे, तुळसाबाई करवंदे, देवराम मुंडे, रंगनाथ मुंडे, मधुकर मुंडे, जालिंदर करवंदे, नंदा करवंदे, सावित्री करवंदे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: रुग्ण अन् नातेवाइकांचा तो टाहो.. घटनेची आठवण होताच अजूनही चुकतो काळजाचा ठोका..

दर वर्षी भरउन्हात पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र हातपंपावर नंबर लावून पाण्यासाठी वेळ खर्च करावा लागत आहे. रात्री-बेरात्री जीव धोक्यात घालून हापसून पाणी भरावे लागते. एका तासात दोन हंडे पाणी मिळणेही कठीण असल्याने शेतातील घरातील इतरत्र कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही.- कुसुम मुंडे, ठोकळवाडी

दर वर्षी ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा व्हायचा. यंदा टँकरचेसुद्धा पाणी मिळत नाही. कूपनलिकेला पाणी नसल्याने सर्व ग्रामस्थांना पाण्यासाठी दूर अंतरावर पाण्याच्या शोधात जावे लागत आहे. माणसांनाच पाणी मिळत नसल्याने जनावरांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीने पाइपलाइन करून कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवावा, ही अपेक्षा आहे- जालिंदर करवंदे

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

पिण्यासाठीच पाणी मिळत नसल्याने तब्बल पाच-दहा दिवसांनी अंघोळ करावी लागते. भांडीकुंडी, कपडे धुण्यासाठीदेखील पुरेसे पाणी मिळत नाही. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पाण्यासाठी हतबल झाल्याने किमान स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतीने आतातरी आम्हाला पाणी उपलब्ध करून द्यावे.- तुळसाबाई करवंदे