esakal | मालेगावात महिला कॉंग्रेसतर्फे महागाई, इंधन दरवाढीचा अनोखा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaoan

मालेगावात महिला कॉंग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा अनोखा निषेध

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : ‘वाह रे मोदी तेरा खेल, खा गये राशन पी गये तेल’, ‘पेट्रोल डिझेल सौ पार, जनता करे हाहांकार’, ‘अच्छे दिन कब आयेंगे, मोदी जब घर जाऐंगे’, ‘देश की जनता करे पुकार, बंद करो ये अत्याचार’, ‘मेहंगाईसे हालत खस्ता, जीने का है मश्‍कील रस्ता’, ‘मेहंगाई कम करो, इंधन दरवाढ बंद करो’ अशा घोषणांसह प्रांत व तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात महापौर ताहेरा रशीद शेख यांच्यासह महिला कॉंग्रेसने चुलीवर स्वयंपाक करुन महागाई, इंधन दरवाढीचा व केंद्र शासनाचा जोरदार निषेध केला. (women congress agitation against inflation and fuel price hike in malegaon)


महापौर ताहेरा रशीद शेख, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १२) महिला कॉंग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. शहरातील किदवाई रस्त्यावरील कॉंग्रेस पक्ष कार्यालय, हजारखोली व आझादनगर भागातून महिला मोर्चाला सुरुवात झाली. किदवाई रोड, संविधान चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, डॉ. हेडगेवार मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा, कॅम्प रोड, एकात्मता चौक या मार्गाने मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. कार्यालयासमोर पत्र्याच्या लोखंडी चुलीत लाकूड पेटवून महापौर श्रीमती शेख यांच्यासह आठ ते दहा महिलांनी स्वयंपाक केला. स्वयंपाकासाठी महिलांनी गहूचे पीठ सोबत आणले होते. चुलीवर पोळ्या करुन कॉंग्रेसतर्फे महागाईचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्या महिलांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना निवेदन सादर केले.

यापूर्वी शहर कॉंग्रेसतर्फे महागाई व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल फेरी काढण्यात आली. पाठोपाठ विभागनिहाय जनजागृतीपर सायकल फेरी काढून केंद्र शासनाविरोधात वातावरण तापविण्यात येत आहे. कॉंग्रेस पक्षाने इंधन दरवाढ, महागाईच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम देखील सुरु केली आहे.

हेही वाचा: मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…


मोर्चात नगरसेविका कमरुन्निसा मोहंमद रिजवान, हमिदा शेख जब्बार, नुरजहॉं अन्सारी, नगरसेवक अस्लम अन्सारी, फारुक फैजुल्ला, इस्त्राईल कुरेशी, नजीर अहमद फल्लीवाले, जफर अहमद अहमदुल्ला, सलीम टॅक्सीवाले, निहाल हाजी, कॉंग्रेस सेवा दल अध्यक्ष हाफीज अन्सारी, जाकीर शेख, जैनू पठाण, सुलतान अहमद, सलमान शेख, रफीक शेख आदींसह बहुसंख्य महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते. छावणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

घरगुती गॅस, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. नागरिक हैराण झाले असून, केंद्र शासनाने महागाईला आळा घालावा. इंधन दरवाढ रोखावी.
- ताहेरा शेख, महापौर, मालेगाव

(women congress agitation against inflation and fuel price hike in malegaon)

हेही वाचा: पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

loading image