
World Disabled Persons Day : बहुविकलांग बालकांचा प्रश्न ऐरणीवर!
नाशिक : निराधार, बेवारस बालकांवरील अत्याचाराच्या घटनांनी शहर परिसर हादरून गेला आहे. आज जागतिक दिव्यांग दिन आहे. आधाराश्रम संस्थेत वयोमर्यादा पूर्ण केलेली १० बहुविकलांग बालके असून, त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमानुसार त्यांना योग्य संस्थेत दाखल करण्याची गरज आहे. (World Disabled Persons Day issue of multi disabled children is on agenda Nashik news)
आधाराश्रम ही संस्था गेली ६८ वर्षे निराधार बालकांना आधार देऊन त्यांच्या संगोपनाचे, पुनर्वसन करण्याचे काम करते. मातापित्यांनी टाकून दिलेली, अनौरस, एकल पालकांची तसेच बेवारस आढळलेली बालके जिल्हा रुग्णालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जिल्हा बालकल्याण समिती या संस्थांमार्फत कायदेशीर प्रक्रिया करून आधाराश्रमात दाखल होतात. एक दिवस ते ६ वर्षे वयाचे ३० मुलगे, तर एक दिवस ते १२ वर्षे वयाच्या ९० मुली सध्या येथे आहेत. यावरून अजूनही समाजात मुलींना स्वीकारण्याचा दृष्टिकोन किती संकुचित, नकारात्मक व अपरिपक्व आहे हे लक्षात येते.
आधाराश्रमाचे सचिव हेमंत पाठक म्हणाले, त्र्यंबकेश्वर जवळच्या एका निराधार बालकाश्रमात चिमुकल्या जिवाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा विनाकारण मनस्ताप संस्थेला सहन करावा लागला. कारण नामसाधर्म्यामुळे अनेकांनी आमच्याशी संपर्क साधून शहानिशा केली. पाठोपाठ म्हसरूळ परिसरातील गुरुकुल निवासी वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली. मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटनाही समोर आली.
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
चुंचाळे भागात एक दिवसाच्या नकोशा बालिकेला जन्मदात्यांनीच पिशवीत कोंबून फेकले. कुत्र्यांनी लचके तोडल्याने चिमुकलीला मृत्यूच्या बळी पडावे लागले. अशा वारंवार घडणाऱ्या दुर्दैवी घटनांनी समाज हादरून गेला आहे. आम्ही समाजाला आवाहन करतो की, नकोशी बाळे आम्हाला द्या. कोणालाही निराधार, बेवारस बालके आढळल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.
पाठपुरावा करूनही कार्यवाही नाही
पाठक म्हणाले, की बालके संस्थेत दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी बालकांचे अपंगत्व लक्षात येते. त्यानुसार उपचार केले जातात. काही बालकांमध्ये बहुविकलांगत्व असते. त्यांची विशेष देखभाल करावी लागते. सध्या संस्थेत अशी वयोमर्यादा ओलांडलेली ४ बहुविकलांग मुले व ६ मुली आहेत. त्यांच्या वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या समस्याही वाढलेल्या आहेत. त्यांना खास दिव्यांगांसाठी असणाऱ्या संस्थांमध्ये नियमानुसार दाखल करावे, अशी आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत. मात्र संबंधितांकडे पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याकडे श्री. पाठक यांनी लक्ष वेधले आहे.