#WorldSparrowDay : स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेत वाढतोय 'चिवचिवाट'!

sparrow.jpg
sparrow.jpg

नाशिक : जागतिक चिमणी दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (ता. 19) गुड न्यूज आहे, ती म्हणजे, चिवचिवाट वाढतोय! मात्र, शहरीकरणामध्ये चिमण्या घरट्यांसाठी आपली स्थाने बदलताहेत. त्यातून चिमण्या स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेताहेत असेच म्हणावे लागेल. 

आता चिवचिवाट वाढलाय

गावात दहा वर्षांपूर्वी घरातील वळचणीला, दाराला, भिंतीवर टांगलेल्या फोटोच्या फ्रेमच्या मागे चिमण्या घरटी बांधायच्या. दिवसभर गवताच्या काड्या जमवत त्यामध्ये कापूस, धागे, पिसे, आणून घरटे सुशोभित करत. चिवचिवाटाने प्रत्येक घराला सवय झाली होती. मान तपकिरी, काळ्या-पिवळ्या रंगाच्या रेघा आणि खालच्या भागात पांढराशुभ्र रंग ही चिमणीची ओळख. अश्‍व, म्हशी जेथे अधिक आहेत, तेथे चिमण्यांची संख्या वाढल्याचे चित्र पाहायला मिळते. प्राण्यांच्या विष्ठेत न पचलेले धान्य त्या खातात. तसेच पिकांचा नाश करणाऱ्या कीटकांना खाऊन त्या शेतकऱ्यांच्या मित्र बनल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरातून हद्दपार झाल्यात काय, अशी स्थिती तयार झाली होती. पण सामाजिक संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे आता चिवचिवाट वाढला आहे. तसेच दाणापाण्याची सोय अनेक कुटुंबे करत असल्याने परिसरात चिमण्या वाढल्या आहेत. 

चिमण्या आता स्वतःला परिस्थितीत जुळवून घेताय

गावांबरोबर शहर बदलू लागल्या. जुनी लाकडी घरे-वाडे, जनावरांचे गोठे काळाबरोबर नाहीसे झाले आहेत. त्या जागी चकाचक बंगले, गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. अशा परिस्थितीत चिमण्या आता स्वतःला परिस्थितीत जुळवून घेत आहेत. चिमण्यांच्या संख्येत घट होणाऱ्या अनेक कारणांमध्ये शहरात उभी असलेले मोबाईल टॉवर एक मोठी समस्या आहे. टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरी पक्ष्यांना हानिकारक ठरत आहेत, असे तज्ज्ञ सांगताहेत. लहरींमुळे चिमण्या आपले वसतिस्थान बदलत असल्याचे दिसून आले आहे. वृक्षतोडीमुळे झाडांवरील वास्तव्य करणारे ससाणा, शिक्रा, घार असे शिकारी पक्षी शहरातील टॉवरवर घरटे बनवत आहेत. त्यामुळे शिकारी पक्षी चिमण्यांसारख्या छोट्या आकाराच्या पक्ष्यांची शिकार करू लागले आहेत. त्यामुळे निसर्गसाखळी धोक्‍यात येऊ लागली आहे. गलोलीने पाखरांना टिपले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

चिमण्यांसाठी काय करावे? 

-अंगणात, गॅलरीत पिण्यासाठी पाणी आणि दाणे ठेवणे. 
-कृत्रिम घरटे साकारावे. 
-ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न. 
-शहरातील टॉवर वाढणार नाहीत याची काळजी आवश्‍यक. 
-घराजवळ, बागेत वृक्ष लावावेत. 
-जखमी पक्ष्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. 
-चिमणी बचाव-पर्यावरण बचाव उपक्रम राबविणे. 
-गलोरीवर आणि नायलॉन मांजावर कायमची बंदी हवी.  

नाशिक "पायोनिअर' 

नाशिकच्या नेचर फॉर एव्हर सोसायटीचे अध्यक्ष मोहंमद दिलावर यांनी पहिल्यांदा "वर्ल्ड स्पॅरो डे'ची सुरवात केली. चिमण्यांविषयी जनजागृती व संवर्धन व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. आता विविध शहरांत हा दिवस साजरा केला जात आहे. कीटकनाशकांमुळे कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असताना "नेस्ट बॉक्‍स' ही संकल्पना सुरू पुढे आली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com