YCMOU Exam : पुनर्मूल्यांकनासाठी ‘मुक्‍त’कडून 23 पर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YCMOU

YCMOU Exam : पुनर्मूल्यांकनासाठी ‘मुक्‍त’कडून 23 पर्यंत मुदत

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे (YCMOU) जानेवारी घेतलेल्‍या परीक्षांकरिता पुनर्मूल्यांकनाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध करून दिली आहे. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची स्‍कॅनकॉपी प्राप्त करण्यासह पुनर्मूल्‍यांकनाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असणार आहे. (ycmou offers revaluation opportunity to students till 23 march nashik news)

कृषी अभ्यासक्रम वगळता, अन्‍य प्रमाणपत्र, पदवी, पदविका, पदव्‍युत्तर या शिक्षणक्रमांच्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात मुक्‍त विद्यापीठाने नुकतेच परिपत्रक जारी केलेले आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची स्‍कॅनकॉपी मिळविण्यासह पुनर्मूल्यांकनाची संधी उपलब्‍ध करून दिलेली आहे.

जानेवारी महिन्‍यात झालेल्‍या विविध शिक्षणक्रमांच्‍या सत्र व पुरवणी परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निकालाच्‍या आधारे विद्यार्थ्यांना दिलेल्‍या परीक्षेतील संबंधित अभ्यासक्रमास प्राप्त गुणांबाबत पडताळणी करता येणार आहे.

विहित नमुने व सूचनांचा तपशील विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिला आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्जासोबत आवश्‍यक शुल्‍कदेखील ऑनलाइन पद्धतीने अदा करायचे आहे. निर्धारित मुदतीनंतर ऑनलाइन अर्ज स्‍वीकारले जाणार नाही व कुठल्‍याही परिस्थितीत ऑफलाइन अर्ज स्‍वीकारले जाणार नसून पोस्‍टाने अर्ज पाठवू नये, असेदेखील विद्यापीठाने कळविले आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

...अशी आहे प्रक्रिया

केवळ तीन विषयांसाठी गुणपडताळणी, स्‍कॅनकॉपी, पुनर्मूल्यांकनचा पर्याय निवडता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विषयाच्‍या उत्तरपत्रिकेची स्‍कॅनकॉपी प्राप्त करून घेणे आवश्‍यक आहे. थेट पुनर्मूल्यांकनासाठीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

प्रथम स्‍कॅनकॉपी ऑनलाइन अर्ज करून कॉपी मागवावी. नंतर पुढील दहा दिवसांच्‍या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत. स्‍कॅनकॉपीसाठी ई-मेल आयडी अचूक लिहावा. चुकीच्‍या ई-मेल आयडीमुळे स्‍कॅनकॉपी न मिळाल्‍यास विद्यापीठ जबाबदार राहणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

असे आहे वेळापत्रक

गुण फेरमोजणी -------- १३ मार्च

स्‍कॅपकॉपी मिळविणे --- १३ मार्च

पुनर्मूल्यांकन -------------- २३ मार्च

टॅग्स :examExaminationYCMOU