Nashik News | जलजीवनच्या मंजूर कामांची प्रत सरपंचांनी द्यावी : ZP CEO मित्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP CEO Ashima Mittal, Nashik News

Nashik News | जलजीवनच्या मंजूर कामांची प्रत सरपंचांनी द्यावी : ZP CEO मित्तल

नाशिक : जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणेने एकत्रित कामे करावी. ही कामे वेळेत होण्यासाठी ग्रामसेवक, सरपंचांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय तालुकानिहाय सरपंचांच्या बैठका घेऊन संवाद साधला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

तसेच, सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या मंजूर कामांच्या अंदाजपत्रकाची एक प्रत संबंधित सरपंचांना देण्यात यावी, अशा सूचना मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्या. (ZP CEO ashima Mittal statement Sarpanch to give copy of approved Jaljeevan works Nashik News)

जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, १५ तालुका गटविकास अधिकाऱ्यांची समन्वय सभा बुधवारी (ता. २५) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांकडून विविध राज्य व केंद्राच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

झालेले कामे, अपूर्ण कामे, प्रलंबित कामांसह झालेल्या खर्चाचादेखील आढावा घेतला. आचारसंहिता उठल्यानंतर प्रलंबित कामे वेगाने करावी. निधी अखर्चिक राहता कामा नये, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या. जलजीवन मिशन योजनेची १२९२ कामे मंजूर असून, प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश दिले आहे.

काही ठिकाणी ही कामे सुरू झाली आहे. मात्र, कामे मंजूर होऊन सुरू झाली नाही तेथे कामे तत्काळ सुरू करावी. या योजनेची कामे पूर्ण झाल्यानंतर हस्तातंराचे अधिकार हे सरपंचांनाच असल्याचे मित्तल यांनी बैठकीत स्पष्ट केले. मात्र, ही कामे वेळात, विनाअडथळा पार पडावी यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांचे एकत्रित ट्रेनिंग घेतले जाणार आहे.

या ट्रेनिंगमध्ये ग्रामसेवक, सरपंच यांना शासकीय योजनांसह जलजीवनच्या कामांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संजय नारखेडे उपस्थित होते.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

चोरीच्या रस्त्यांचा अहवाल सादर

मालेगाव तालुक्यातील बहुचर्चित टोकडे येथील चोरीला गेलेल्या रस्ता प्रकरणी पाहणी झाल्यानंतर कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी अहवाल मित्तल यांना सादर केला. सदर टोकडे गावात मंजुरी दिल्याप्रमाणे रस्त्यांचे काम झालेले असून, रस्तादेखील अस्तित्वात असल्याचे अहवालात असल्याचे मित्तल यांनी या वेळी सांगितले.

तक्रारदारांनादेखील रस्ता दाखविण्यात आला आहे. मंजूर अंदाजपत्रकानुसार हा रस्ता असल्याचे नारखेडे यांनी या वेळी सांगितले. तक्रारदारास लेखी अहवाल दिल्याचे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :NashikZP