Dhule Dhandaimata : नवसाला पावणारी स्वयंभू धनदाईमाता

Attractive idol of Dhandai Devi
Attractive idol of Dhandai Deviesakal

Dhule Dhandaimata : नवसाला पावणारी देवी म्हणून म्हसदी (ता. साक्री, जि. धुळे) येथील आदिमाया श्रीक्षेत्र धनदाईदेवीची राज्यभर ओळख आहे. धुळ्यापासून ४०, मालेगावपासून ५०, तर साक्री शहरापासून २० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत, नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ग्रामीण भागात सुमारे हजारो वर्षांपूर्वीचे स्वयंभू धनदाईदेवीचे पुरातन मंदिर आहे.

धनदाईदेवीविषयी पुरातन काळापासून अनेक रंजक, धार्मिक दंतकथा, आख्यायिका आजही सांगितल्या जातात.(navratri special article of dhandai mata dhule )

सुमारे ७७ पेक्षा अधिक कुळांची कुलदैवत असलेल्या धनदाईदेवीचे राज्यासह मध्य प्रदेश, गुजरातमध्ये भाविक आहेत. महिषासुरमर्दिनी म्हणून ओळख असणाऱ्या धनदाईदेवीचे मंदिर पावसाळ्यात निसर्गाशी एकरूप झाल्याचा भास भाविकांना होतो.

कुलस्वामिनी धनदाईदेवीविषयी आख्यायिका प्रत्येक भाविकाच्या मनी श्रद्धेमुळे अधिकच भक्कमपणे उभी आहे. धनदाईदेवी सात बहिणींमध्ये सर्वांत मोठी. त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्यासाठी सात बहिणींपैकी गडावरची सप्तशृंगीदेवी सर्वांत अगोदर बाहेर पडली. ती लवकर परत आली नाही, म्हणून तिचा शोध घेण्यासाठी धनदाईदेवी बाहेर पडली.

त्यापाठोपाठ अनुक्रमे म्हाळसा (चिंचखेडे), एकवीरा (धुळे), चिराई (चिराई), इंदाई (इंदवे), भटाई (खंडलाय) निघाल्या. या सप्तभगिनींनी दैत्यांना युद्धाचे आव्हान दिले. प्रत्येकीने राक्षसांचा वध केला. ज्या ठिकाणी वध केला, त्याच ठिकाणी स्थिरावल्या. मानव जातीचे संरक्षण करण्यासाठी मातलेल्या महिषासुर राक्षसाचा संहार करणारी महिषासुरमर्दिनी म्हणून धनदाईदेवीचे माहात्म्य आहे.

मंदिरात धनदाईदेवीची आद्य स्वयंभू मूर्ती आहे. धनदाईदेवीच्या मंदिराला सुमारे हजारो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेल्या विटा, दगड, रंगकाम, लाकडी वस्तूंवरील कोरीव काम व शिलालेखावरून त्याच्या निर्मितीचा कालखंड तिसऱ्या-चौथ्या शतकातला मानला जातो.

Attractive idol of Dhandai Devi
Dhule Navratri Festival: जिल्हावासीयांना आदिशक्तीच्या आगमनाचे वेध; विविध रूपांतील मूर्ती अन इतर साहित्य विक्रीस

मंदिर परिसराचा कायापालट !

पूर्वी याठिकाणी जुने मंदिर सहा पत्र्यांचे होते. चुना आणि विटा वापरून त्याचे बांधकाम केले होते. लाल रंगाने नक्षीकाम केलेला घुमटही होता. पूर्वी याच मंदिरालगत ‘नायगाव’ नावाचे गाव वसलेले होते. मात्र, जंगली प्राण्यांचा उपद्रव, दरोडेखोरांचा त्रास, तीव्र पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांनी या ठिकाणाहून स्थलांतर केले. सध्याच्या ठिकाणी गाव वसले आहे. त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती.

पिढ्यानपिढ्या देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्यामुळे ती मूर्ती पूर्णतः शेंदुरात गाढली गेली. जंगलात वास्तव्यास असलेले भिल्ल त्या देवस्थानचा सांभाळ करू लागले. आजही धनदाईदेवीचे पुजारी म्हणून भिल्ल बांधव काम पाहत आहेत. कालांतराने मंदिराच्या कामाचा जीर्णोद्धाराचा निर्णय झाला. गावातील १७ तरुण एकत्र आले. पूर्वीचे जुने मंदिर पाडण्यात आले. मूळ जागेवरच नवीन मंदिर बांधण्याचे ठरले. सुरवातीला ओटा बांधण्यात आला.

मध्यंतरी काही काळ काम रखडले. नंतर मात्र १९७३ मध्ये सतरा तरुणांनी ‘धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ‌’ स्थापन केले. सभासदांनी स्ववर्गणी गोळा केली. स्वत: सर्वांनी अनेक दिवस श्रमदान केले. याच काळात कुलदैवत मानणाऱ्या भाविकांनीही मदतीचा हात दिला. त्यातून आज उभे आहे ते मंदिर तसेच शासकीय मदतीतून भव्य सभागृह, धर्मशाळा, दोन मंगल कार्यालये, मानाचा तगतराव, भक्त निवास, जलशुद्धी यंत्र, नवसपूर्ती कार्यक्रमासाठी शेडसह भाविकांच्या सोयीसाठी एक ना अनेक विकासकामे केली आहेत.

शिवाय, धनदाईदेवीच्या माळ नावाच्या डोंगरावर ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन हजारो झाडे लावत वनसंवर्धनाचे आदर्शवत काम उभे केले आहे.

Attractive idol of Dhandai Devi
Navratri Utsav : नवरात्रामुळे वाढली फळांना मागणी; भावामध्ये २० टक्‍क्‍यांनी वाढ

कुलस्वामिनी धनदाईदेवीजवळ चैत्र शुद्ध अष्टमीचा यात्रोत्सव व नवरात्रोत्सव साजरा केला जातो. चैत्रात देवीजवळ चैतन्य निर्माण होते; तर नवरात्रोत्सवात दहा दिवस ‘उदे गं अंबे’चा गजर केला जातो. दरवर्षी अश्विन शुद्धपासून शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. एरवी नवसपूर्तीसाठी गर्दी करणारे भाविक देवीजवळ आरत्या लावणे, चक्रपूजेला प्राधान्य देतात.

विजयादशमी अर्थात दसरापर्यंत देवीजवळ विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्रोत्सवातील अष्टमी म्हणजेच आठव्या माळेस गर्दीचा महापूर असतो. कारण, खानदेशातील भाविक माघ, चैत्र महिन्यातील अष्टमी व नवरात्रोत्सवाच्या अष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व देतात. अष्टमीच्या दिवशी लावलेल्या आरत्या अन्य धार्मिक कार्यक्रम व नवसपूर्ती आपल्या सर्व इच्छा, आकांक्षांची पूर्तता देवी करीत असल्याची भावना भाविकांची आहे.

तथापि, जळगाव व नाशिक जिल्ह्यांतील काही भाविक पदयात्रेद्वार देवीजवळ हजेरी लावतात. मार्च वा एप्रिलच्या चैत्र शुद्ध अष्टमीपासून म्हसदीत चैत्र यात्रोत्सवास प्रारंभ होतो. हा नवचैतन्याचा उत्सव आठ दिवस सुरू राहतो. ग्रामीण भागातील अनेक खेड्यांसाठी धनदाईदेवीचा यात्रोत्सव पर्वणीच ठरतो. चैत्र महिन्यातील गुढीपाडवा, नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या दिवशी आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवीच्या मंदिरावर मानाचा ध्वज चढविण्याची परंपरा आजही कायम आहे.

गावात धनदाईदेवीच्या मंदिरासह देऊर रस्त्यावरील त्रिवेणी संगमावर श्री विश्वेश्वराचे आकर्षक मंदिरही आहे. अमरावती, उमरावती व देव नदीचा त्रिवेणी संगम असलेले तीर्थक्षेत्र पवित्र ठिकाण असल्याचे मानले जाते. या ठिकाणी ऋषिपंचमीच्या दिवशी महिला भाविकांची मांदियाळी असते. धनदाईदेवी मंदिराजवळ जागृत म्हसोबा, गणपती, हनुमंताचे मंदिर आहे. शिवाय, पुरातन शिलालेखाचे अवशेष शिल्लक आहेत.

Attractive idol of Dhandai Devi
Navratri Festival : तलवारबाजीसह स्त्री शक्तीचा साहसी गरबा; शौर्य, पराक्रम आणि संस्कृतीचे दर्शन; राज्यातील पहिलाच प्रयोग

धनदाईदेवीचे दर्शन नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेशातील भाविकांना सहज शक्य झाले आहे. गुजरातमधील भाविक साक्रीहून, तर मध्य प्रदेशातील भाविक दोंडाईचा अथवा धुळ्याहून म्हसदीपर्यंत येऊ शकतात. शिवाय, नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक भाविक दर्शन, नवसपूर्तीसाठी येतात.

देवीजवळ येणाऱ्या भाविकांना परिवहन महामंडळाच्या बस अथवा खासगी वाहनाद्वारे मंदिरापर्यंत जाता येते. जमीन सपाटीवर मंदिर असल्याने कोणतेही भाविक गर्दीची वेळ सोडून अन्य वेळेत तत्काळ दर्शन घेऊन मोकळे होतात.

पूजा विधी..!

नवरात्रोत्सवात आदिमाया श्रीक्षेत्र धनदाईदेवीचे मंदिर दर्शनासाठी २४ तास उघडे असते. पहाटे साडेपाचला देवीची सामुदायिक काकड आरती, महाअभिषेक, साजशृंगार चढविला जातो. सायंकाळी‌ देवीची महाआरती केली जाते. नवसपूर्तीसाठी भाविक साडीचोळीचा आहेर चढवितात.

श्री सिद्ध यंत्र

!! सिद्धी-बुद्धी प्रदेदेवि, भुक्ती-मुक्ती प्रदायिनी !!

!! मंत्र यंत्र मूर्ते देवी, धनदाई नमोस्तुते‌ !!

Attractive idol of Dhandai Devi
Navratri Festival : अंबाबाईची कुष्मांडा देवीच्या रूपात पूजा; तुळजाभवानी, त्र्यंबोली देवीनंही वेधलं लक्ष

धनदाईदेवीस कुलदैवत मानणारे भाविक ‌

देवरे, खैरनार, वाघ, देसले, बेडसे, भुसे, बेंडाळे, रौंदळ, गायकवाड, वेंडाईत, कुवर, तोरवणे, सयाईस, नेरपगार, सत्तावीसकर, खैरे, धोंडगे, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, मांडवडे, पवार, ईशी, सूर्यवंशी, केदार, खराटे, गांगुर्डे, साळी, धोंगडे, खोलमकर, कडभाने, नांद्रे, शंकपाळ, विश्वास, माळी, गिरासे, व्यवहारे, शिंदे, डबे, तुपे, अमराळे, महाले, चव्हाण, ठोंबरे, निकुम, डामरे, परांडे, इंगळे, मोराडे, श्रीवंत, कुलथे, ह्याळीज, पुराणिक, अग्निहोत्री, आहेर, चौरे, घुमरे, जाधव, काकुळदे, शिरसाट, बोडके, दहियेकर, सोनजे, बाविस्कर, फडोळ, बस्ते, धनगर, डोमे, लोकाक्षी, रामराज्य, थोरात, जगताप, रकिबे, मदाने, वसाणे आदी.

श्री धनदाईदेवीजवळील तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळे

@ श्रीक्षेत्र धनदाईदेवी मंदिरापासून सात किलोमीटर अंतरावर अक्कलपाडा प्रकल्प

@ म्हाळसादेवी मंदिर देवस्थान सहा किलोमीटरवर (चिंचखेडे)

@ चिराईदेवी मंदिर देवस्थान १३ किलोमीटर अंतरावर (चिराई, ता. बागलाण)

@ भटाईदेवी मंदिर देवस्थान १२ किलोमीटर अंतरावर (खंडलाय, ता. धुळे)

@ मंदिरापासून ४० किलोमीटर अंतरावर मुख्य शहर धुळे. मंदिरापासून दहा किलोमीटरवर मुख्य रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नेर फाटा (ता. धुळे)पासून आहे

(शब्दांकन : दगाजी देवरे, म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे)

Attractive idol of Dhandai Devi
Navratri Festival 2023 : नाशिकमध्ये उद्या आणि वणीत शनिवारी ‘नवदुर्गा : जागर स्त्री शक्तीचा' कार्यक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com