Dhule Crime News : अल्पवयीन मुलीचा नर्सने केला गर्भपात; 5 महिन्यांची गर्भवती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nurse aborted  minor girl who was 5 months pregnant dhule crime news

Dhule Crime News : अल्पवयीन मुलीचा नर्सने केला गर्भपात; 5 महिन्यांची गर्भवती!

पिंपळनेर (जि. धुळे) : येथील वडारवाडीमधील सोळावर्षीय राजश्री मंजूळकर या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकऱणी एकाला अटक करण्यात आली असून, या मुलीचा गर्भपात (Abortion) केल्याचा आरोप असलेली धुळे येथील खासगी रुग्णालयातील परिचारिका प्रमिला पवार मात्र फरारी आहे. (nurse aborted minor girl who was 5 months pregnant dhule crime news)

पिंपळनेर पोलिस तिचा शोध घेत आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिला गर्भवती केल्याप्रकरणी पोलिसांनी वडारवाडीतील संशयित राज सिकलकर याला अटक केली.

याबाबत मुलीच्या आईची तक्रार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडारवाडीमधील राजश्री मंजूळकर या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला होता. त्यात ती गर्भवती असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली.

राजश्रीचे पोट दुखू लागल्याने आई रेणुकाबाई ऊर्फ द्रौपदाबाई रामदास मंजूळकरने तपासणीसाठी धुळ्याच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथील परिचारिका प्रमिला पवारने आईला मुलीचे लग्न झालेले आहे का, असे विचारले असता आईने ‘नाही’ असे सांगत तिला पाहण्यासाठी स्थळ येत आहेत, असे सांगितले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्यावर मुलगी गर्भवती असून, तिच्याशी अशा स्थितीत कोण लग्न करेल, त्यापेक्षा दहा हजार रुपये घेत आपल्या घरी गर्भपात करून देते, असे सांगितल्यावरून आईने मुलीचा गर्भपात करायचा की नाही याबाबत सांगते, असे सांगितले. परंतु परिचारिका प्रमिला पवारने आई व मुलीस बाफना हॉस्पिटलमधून तिच्या राहत्या घरी नेले.

तेथे आईला हॉलमध्ये बसवून मुलीस दुसऱ्या एका खोलीत नेले. एक ते दीड तासाने मुलीस परत आणले व आता तुम्हाला काळजीचे कारण नाही, गर्भपात झाला आहे, असे सांगितले. मात्र घरी आणल्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

मात्र विच्छेदनात ती गर्भवती असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. राजश्रीच्या मृत्यूस गर्भपात कारणीभूत असल्याचा आरोप करीत आईच्या माहितीवरून पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या राज शिकलकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी परिचारिका प्रमिला पवार हिचा शोध घेतला जात आहे. उपनिरीक्षक पी. पी. सोनवणे तपास करीत आहेत.