
Dhule News : शिरपूर तालुक्यात पिस्तुलांसह नाशिकच्या युवकांना अटक
शिरपूर : मध्यप्रदेशातून पिस्तुले खरेदी करून नाशिकला घेऊन जाणाऱ्या युवकांच्या टोळीला सांगवी (ता.शिरपूर) येथील तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी (ता.१२) अटक केली. त्यांच्याकडे सहा जिवंत काडतुसेही आढळली.
मोबाईल व शेवरले क्रूझ वाहनासह एकूण सात लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. पाच संशयित नाशिक तर एक शिरपूर तालुक्यातील रहिवासी आहे. (Pistol in Shirpur taluka Youth of Nashik arrested Dhule News)
हेही वाचा: Nashik News : अश्विनीनगर उद्यानाला अवकळा; उद्यान दुरवस्थेकडे प्रशासनाचा काणाडोळा!
सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना चोपडा तालुक्यालगतच्या सत्रासेनकडून भोईटी (ता.शिरपूर) मार्गे पिस्तूलांच अवैध वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांनी १२ जानेवारीला भोईटी गावापुढे वाहनांची तपासणी सुरु केली. शेवरले क्रूझ (एमएच १५, सीटी ५६८८) ला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालकाने शिरपूरच्या दिशेने वाहन भरधाव नेले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून वाहन थांबवण्यास भाग पाडले. वाहनाची झडती घेतली असता सीटखाली लपवलेली तीन गावठी बनावटीची पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे पोलिसांच्या हाती लागली.
सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
हेही वाचा: Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती
नाशिकची टोळी
संशयितांना पिस्तुलांची अवैध वाहतूक केल्याच्या संशयावरून सांगवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. संशयितांमध्ये मोहित राम तेजवानी (वय २१, रा.गोदावरी कॉम्प्लेक्स, चिंचबन रोड, पंचवटी, नाशिक), आकाश विलास जाधव (वय २४, रा.विसे चौक, गंगापूर रोड, नाशिक), राज प्रल्हाद मंदोरिया (वय २१, रा.आव्हाड निवास, मधुबन कॉलनी, पंचवटी, नाशिक), अजय जेठा बोरीस (वय २९, रा.चैतन्य सोसायटी, रामवाडी, पंचवटी, नाशिक), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (वय २४, रा.दिव्यदर्शन सोसायटी, विसे मळा, कॉलेज रोड, नाशिक) व दर्शन चमनलाल सिंधी (वय २१, रा.अजंदे बु ता.शिरपूर) यांचा समावेश आहे. त्यांनी हौसेपोटी शस्त्रे विकत घेतली की त्यामागे मोठ्या घातपाती कृत्याचा उद्देश होता, संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर अधीक्षक किशोर काळे, प्रभारी डीवायएसपी अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार संजय सूर्यवंशी, पोलिस नाईक संदीप ठाकरे, हवालदार संतोष पाटील, संजय भोई, प्रकाश भिल, मुकेश पावरा, योगेश मोरे, इसरार फारुकी यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा: Naned News : कर वसुलीसाठी नांदेड वाघाळा महापालिका आक्रमक