Latest Marathi News | भरवस्तीतील अवैध गॅसपंपावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule: A police team along with a rickshaw seized gas cylinders in a raid on an illegal gas pump in Professor Colony

Dhule News : भरवस्तीतील अवैध गॅसपंपावर छापा

धुळे : शहरातील प्रोफेसर कॉलनीत अत्यंत धोकादायक स्थितीत चालणाऱ्या अवैध गॅसपंपावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी २० गॅस सिलिंडरसह एकूण एक लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांवर देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. ह्रषिकेश रेड्डी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील प्रोफेसर कॉलनीत उत्तरमुखी मारुती मंदिराच्यामागे गिरीश चौधरी हा त्याच्या राहत्या घरातील खोलीत व खोलीच्या मागील बाजूस भिंतीलगत अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या सिलिंडरमधून वाहनात अवैधपणे गॅस भरून देत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री. रेड्डी यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी (ता.२९) रात्री पावणेअकराच्या सुमारास तेथे छापा टाकला. मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने संशयित रिक्षा चालक तेथून पसार झाला. (Raid illegal gas pump by police crime registered against two Dhule Crime News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार

रिक्षासह मुद्देमाल जप्त

दरम्यान, घटनास्थळी बेकायदेशीररीत्या इलेक्ट्रॉनिक मोटारच्या साहाय्याने नोझलव्दारे घरगुती वापराचे गॅस सिलिंडरमधून रिक्षामध्ये गॅस भरला जात होता. पोलिसांनी तेथून ३५ हजार २०० रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे एकूण १६ भरलेले सिलिंडर, चार हजार ८०० रुपयांचे चार रिकामे सिलिंडर, १० हजार व १५ हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी, नोझल, पाच हजारांचा इलेक्ट्रिक वजन काटा, ४० हजार रुपये किमतीची अ‍ॅटोरिक्षा (एमएच-१८/एन-६७४७) असा एकूण एक लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मुख्य संशयित गिरीश ऊर्फ बबलू पांडुरंग चौधरी (वय-३२, रा. प्रोफेसर कॉलनी, ४७९२, वाडीभोकर रोड, उत्तरमुखी मारुती मंदिराच्या पाठीमागे, देवपूर) व रिक्षाचालक वसीम अहमद अब्दुल हाफीज अन्सारी (वय-३२, रा. इस्लामपुरा गल्ली नं.-३, देवपूर धुळे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मोतीराम निकम तपास करत आहेत.

हेही वाचा: Nashik News : ब्रेथ अनालयझर न वापरता होणार Drunk & Driveची कारवाई