
नंदनगरीतील जनता दरबारात 106 तक्रारींचे निवारण
नंदुरबार : जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिस दलातर्फे आज घेण्यात आलेल्या येथील जनता दरबारात नागरिकांनी निः संकोच आपल्या तक्रारी मांडून त्यांचे निरसन करून घेत वाद मिटल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन नंदुरबार तालुक्यातील १०६ तक्रारदार आनंदाने घरी परतले.कोणताही गुन्हा नाही, पोलिसांची भीती नाही, सामोपचाराने वाद -तंटे मिटल्याने एकमेकांनी गळाभेट घेत तक्रारदारांसह कौटुंबिक वाद असलेले दांपत्यांचाही यात समावेश होता.
नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या जनता दरबाराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांचे हस्ते करण्यात आले. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, डीवायएसपी सचिन हिरे, नायब तहसीलदार बी. ओ. बोरसे, विधी सेवा प्राधिकारणकडील विधीज्ञ अॅड. रोहन गिरासे, अॅड. श्रीमती सीमा खत्री, एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस विभागातील व महसुल विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. पती पत्नीच्या भांडणातून वाद झालेल्या ५ दांपत्यांचा समझोता घडविण्यात आला. जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी पाचही दांपत्यांचा सत्कार केला. मोबाईल हरविलेल्या १२ तक्रारदारांना हस्तगत मोबाईल परत दिले. तसेच होळ तर्फे रनाळा (ता.नंदुरबार) येथील श्रीराम साहेबराव पाटील यांनी भावांसोबत झालेल्या शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून आत्महत्या केली होती. त्यांचा भावांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. भावाचा आत्महत्येनंतर देखील भावांनी मीनाबाई पाटील यांना शेत जमीनीचा हिस्सा न देता धमक्या दिल्या होत्या.पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांचे समक्ष शेतीचा हिस्सा देण्याचे मान्य केल्याने वाद मिटला. सुझलॉन पवन उर्जा प्रकल्पातील तार चोरीचे बरेचसे गुन्हे पोलीसांनी उघडकीस आणून हस्तगत केलेले २ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी सुझलॉन कपंनीचे मॅनेजर श्री. सुमल यांना परत देण्यात आला.
हेही वाचा: Nandurbar : शेतजमीन, दागिन्यांसाठी बहिणीचा खून; निर्दयी भावाला अटक
तक्रारीचा तपशील असा -
- कौटुंबिक वाद - १३
-शेत जमीनीविषयी -२३
- हरविलेले मोबाईल- ४
- ऑनलाइन फसवणूक ३
- आर्थिक फसवणूक- ७
- धमकी , शिवीगाळ सारख्या अदखलपात्र गुन्हे - ३३
- इतर विभाग ( महसुल व एमएसईबी ) -१८
- माहिती मिळणेबाबत १०
- चारित्र्य पडताळणीचे ४
- पासपोर्ट पडताळणीचे -१
- एकूण तक्रारी - १०६
९० तक्रारदारांच्या तक्रारींचे जनता दरबारामध्ये निरसन करण्यात पोलिसांना यश आले. यातील बहुतांशी तक्रारी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वतः हाताळल्या. उर्वरित १६ तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली असून, त्या तक्रारींची अधिक चौकशी करून त्यावर देखील लवकरच निर्णय घेतला जाईल. निरसन झालेल्या तक्रारींपैकी १ प्रकरणात भारतीय दंडविधान संहितेनुसार, १ प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तर १ प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा: चक्क डुप्लिकेट चावी लावून चोरट्यांनी पळविली चारचाकी
Web Title: Redressal Of 106 Grievances In Janata Darbar Nandurbar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..