Dhule News : रहिवाशांची महापौरांकडे कैफियत ;पीतांबरनगरमध्ये जलवाहिनी, रस्ते, गटार, दिव्यांचा थांगपत्ता नाही. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule News

Dhule News : सुविधांपासून वंचित भागात कामे कधी होणार? रहिवाशांची महापौरांकडे कैफियत

धुळे : रस्ते नाहीत, गटारी नाहीत, इलेक्ट्रिक खांब स्वखर्चाने उभारूनही त्यावर दिवे नाहीत. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी (Water) जलवाहिनीदेखील नाही. (Residents demanded Mayor that conduct an inspection to know problem and provide basic facilities dhule news)

मागणी करूनही कार्यवाही होत नाही,अशी कैफियत मांडत समस्या जाणून घेण्यासाठी आपण स्वतः पाहणी करावी व आम्हाला हक्काच्या मूलभूत सोयी-सुविधा मिळवून द्याव्यात, अशी मागणी शहरातील प्रभाग ६ मधील पीतांबरनगर येथील रहिवाशांनी महापौरांकडे केली आहे.

शहरात असे अनेक छोटे-छोटे भाग मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. अशा भागांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील प्रभाग ६ मध्ये नकाणे रोडवरील पीतांबरनगर येथे कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा नसल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे केली आहे.

महापौर श्रीमती चौधरी यांना समस्या सोडविण्याची मागणी करणारे निवेदनही रहिवाशांनी दिले. आम्ही पीतांबरनगर येथे कायम वास्तव्यास आहोत. गेल्या सहा-सात वर्षांत पीतांबरनगर येथे पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन, गटार, पथदीप, रस्ते यापैकी एकही मूलभूत सुविधा नाही.

कुठलीही सुविधा मिळत नसताना मनपाचा वाढीव कर, पाणीपट्टी आम्ही नियमित भरत आहोत. विशेष म्हणजे आमच्या समोरील व मागील गल्लीमध्ये पाण्याची पाइपलाइन टाकलेली आहे. आमच्या गल्लीत १५० ते २०० मीटरची पाइपलाइन टाकणे बाकी आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

स्वखर्चाने रस्ते, खांब उभारले

आम्ही प्रत्येकाने २० ते २५ हजार रुपये खर्च करून सांडपाण्यासाठी शोषखड्डे बनविले, मात्र हे शोषखड्डे लगेच भरून जातात. परिणामी सांडपाणी रस्त्यावर व परिसरात साचून डासांचा त्रास होतो. तसेच आम्ही स्वखर्चाने विजेचे खांब उभे केले आहेत.

मात्र, त्यावर महापालिकेतर्फे दिवे लावले जात नाहीत. त्यामुळे परिसरात रात्री अंधार असतो. अंधारामुळे चोरांची भीती असते. रस्तेदेखील स्वखर्चाने बनविले. मात्र हे रस्ते कच्चे असल्याने पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडून रोज ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो, असे रहिवाशांनी निवेदनात म्हटले आहे.

पाहणी करावी

मूलभूत सोयी-सुविधांप्रश्‍नी यापूर्वी महापालिकेच्या यंत्रणेला निवेदन देऊनही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, आपण स्वतः येऊन पाहणी करावी व आम्हाला आमच्या हक्काच्या मूलभूत सोयी-सुविधा मिळवून द्याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी महापौर श्रीमती चौधरी यांच्याकडे केली.

पीतांबरनगर येथील रहिवासी बापू कोठावदे, प्रतिभा पाटील, साहेबराव देवरे, प्रभाकर अमृतकर, राजेंद्र येवले, संदीप सोंजे, निळकंठ चव्हाण, संजय मोरे, रामपाल गुजर, निंबा सैंदाणे आदींनी मागणीचे निवेदन महापौर श्रीमती चौधरी यांना दिले. रहिवाशांनी महापौरपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती चौधरी यांचा याप्रसंगी सत्कारही केला.

वंचित भागांना प्राधान्य हवे

शहरात अनेक भाग आजही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. एकीकडे शेकडो कोटी रुपयांची कामे मंजूर होतात. त्याचा गाजावाजाही होतो. संबंधित भागातील नागरिकांना त्याचा लाभदेखील होतो. यात अनेक भागांत पुनःपुन्हा कामे होतात. दुसरीकडे मात्र एकदाही रस्ता, गटार, जलवाहिनीची सुविधा झालेली नाही. ते भाग वंचितच राहतात.

शहरात काही भागात तर डांबरी रस्त्यावर काँक्रिट रस्ता, काँक्रिट रस्त्यावर डांबरी रस्ता होतो. काही भागात गरज नसताना कामे होतात, ही शोकांतिका आहे. त्यामुळे जिथे आजपर्यंत एकदाही मूलभूत सोयी-सुविधेचे काम झालेले नाही तेथे प्राधान्याने कामे व्हावीत यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.