esakal | पं.स.निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला 'इथे' दाखविला ठेंगा!
sakal

बोलून बातमी शोधा

shiv-sena-ncp.jpg

शिवसेनेकडून राष्ट्रवादीला उपसभापतिपद दिले जाते काय, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. मात्र, उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचा उपसभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला. निफाडच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, पाच सदस्य गैरहजर राहिलेत. त्यात अपक्ष, भाजप आणि कॉंग्रेसच्या सदस्यांचा समावेश होता.

पं.स.निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला 'इथे' दाखविला ठेंगा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ग्रामविकासातील सत्ताकारणात वरचष्मा ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले असले, तरीही मंगळवारी (ता. 31) पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने निफाडसह येवला अन्‌ दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीला ठेंगा दाखविला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी सहा पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळविली आहे. आरक्षणाचा उमेदवार विरोधकांकडे नसल्याने भाजपला एक सभापतिपद मिळाले असून, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने सुरगाण्यातील सत्ता अबाधित राखली. 

मोर्चेबांधणीच्या राजकारणाकडे जिल्हावासीयांच्या नजरा

येवला पंचायत समितीत सभापतिपदासाठी आरक्षणाचा उमेदवार नसल्याने या पदाची निवडणूक पुढे गेली आहे. मात्र, ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यात शिवसेनेने राष्ट्रवादीला जवळही फिरकू दिले नाही. अल्पमतात असलेल्या राष्ट्रवादीने उपसभापतिपदाची निवडणूक लढविली आणि नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावमध्ये अद्वय हिरेंच्या समर्थकांनी चिठ्ठीवर सभापतिपदी बाजी मारली. शिवसेनेला उपसभापतिपदावर समाधान मानावे लागले. नांदगाव, सिन्नर, पेठ, निफाड, दिंडोरी, इगतपुरीची सत्ता शिवसेनेने मिळविली आहे. जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात शिवसेनेतर्फे इच्छुक असलेल्या निफाडमधील बाळासाहेब क्षीरसागर यांना समर्थन मिळावे म्हणून शिवसेनेकडून राष्ट्रवादीला उपसभापतिपद दिले जाते काय, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. मात्र, उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचा उपसभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला. निफाडच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, पाच सदस्य गैरहजर राहिलेत. त्यात अपक्ष, भाजप आणि कॉंग्रेसच्या सदस्यांचा समावेश होता. दिंडोरीमध्ये कॉंग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असताना त्यांनी पंचायत समितीची सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. येथे राष्ट्रवादीला दणका देण्यात श्री. चारोस्कर यशस्वी झाले आहेत. या साऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणातील शिवसेना-राष्ट्रवादीच्या मोर्चेबांधणीच्या राजकारणाकडे जिल्हावासीयांच्या नजरा खिळल्या आहेत. 

बागलाणमधील लक्षवेधी राजकारण 
बागलाणमध्ये भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्यामुळे पंचायत समितीची सत्ता भाजप आपल्याकडे राखेल असे वाटत असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी लक्षवेधी राजकारणाची प्रचीती घडवत सत्ता महाविकास आघाडीकडे राखण्यात यश मिळविले. सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने एका मताने बाजी मारली, तर उपसभापतिपदी शिवसेनेने बिनविरोध यश मिळविले. कळवणमध्ये मागील सत्ताकारणात राष्ट्रवादीने कॉंग्रेसला उपसभापतिपद दिले असल्याने या वेळी दोन्ही पदे आपल्याकडे राखली. चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या राजकारणात शिवसेनेला राष्ट्रवादीच्या जोडीला कॉंग्रेसचे समर्थन मिळाल्याने भाजपने उपसभापतिपदाचा आग्रह धरला नाही. नांदगावमध्ये अपक्ष सदस्यांना उपसभापतिपद देत त्यांचा शिवसेनेने प्रवेश करून घेतला. त्र्यंबकेश्‍वर सभापतिपदी बाजी मारलेले अपक्ष सदस्य हे राष्ट्रवादीचे सदस्य असल्याचे सांगण्यात आले. 
हेही वाचा > छतावरुन आत्महत्या करण्यासाठी पाऊल पुढे टाकणार....तेवढ्यातच.. 

सभापती आणि उपसभापती 
पंचायत समिती सभापती (पक्ष) उपसभापती (पक्ष) 

नांदगाव भाऊसाहेब हिरे (शिवसेना) सुशीलाबाई नाईकवाडे (अपक्ष-शिवसेना प्रवेश) 
सिन्नर शोभा बर्के (शिवसेना) संग्राम कातकाडे (शिवसेना) 
पेठ विलास अलबाड (शिवसेना) पुष्पाताई पवार (शिवसेना) 
निफाड अनुसयाताई जगताप (शिवसेना शिवा पाटील (शिवसेना) 
दिंडोरी कामिनी चारोस्कर (शिवसेना) वनिता अपसुंदे (चारोस्कर समर्थक) 
मालेगाव सुवर्णा देसाई (अद्वय हिरे समर्थक) सरला शेळके (शिवसेना) 
बागलाण इंदूबाई ढुमसे (राष्ट्रवादी) कान्हू गायकवाड (शिवसेना) 
चांदवड पुष्पाताई धाकराव (भाजप) नितीन आहेर (शिवसेना) 
इगतपुरी जया कचरे (शिवसेना) जिजाबाई नाठे (शिवसेना) 
येवला (आरक्षण पेचामुळे पुढे) लक्ष्मीबाई गरुड (शिवसेना) 
सुरगाणा मनीषा महाले (माकप) इंद्रजित गावित (माकप) 
देवळा शांताबाई पवार (राष्ट्रवादी) धर्माअण्णा देवरे (राष्ट्रवादी) 
त्र्यंबकेश्‍वर मोतीराम दिवे (अपक्ष) देवराम मौले (माकप) 
कळवण मीनाक्षी चौरे (राष्ट्रवादी) विजय शिरसाठ (राष्ट्रवादी) 
नाशिक विजया कांडेकर (राष्ट्रवादी) ढवळू फसाळे (राष्ट्रवादी) 

हेही वाचा > नाशिक पंचायत सभापतीपदी विजया कांडेकर, उपसभापतीपदी ढवळू फसाळे बिनविरोध 

छगन भुजबळ पोचले मुक्कामी 
ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ मंगळवारी रात्री नाशिक मुक्कामी पोचले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे आणि कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांनी त्यांची भेट घेतली. बुधवारी (ता. 1) जिल्हा परिषदेचे सहलीसाठी रवाना झालेले शिवसेना-राष्ट्रवादीचे सदस्य हॉटेल एक्‍स्प्रेस इनमध्ये मुक्कामी पोचल्यावर अध्यक्ष-उपाध्यक्षसह विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे. गुरुवारी (ता. 2) जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची, तर शुक्रवारी (ता. 3) विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर दुपारी दोनला कालिका मंदिरासमोरील कपाडिया कॉम्प्लेक्‍समधील इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरचे कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन श्री. भुजबळ यांच्या हस्ते होईल. श्री. भुजबळ दुपारी तीनला पुण्याकडे रवाना होतील. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या अनुषंगाने भुजबळ बुधवारी मुंबईकडे रवाना होणार आहेत. तसे घडल्यास स्थानिक राजकारणाची सूत्रे माजी खासदार समीर भुजबळ यांना हलवावी लागणार आहेत.