एसटीच्या ताफ्यात "स्लिपर कम सिटर' बस! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

जळगाव ः एसटीची नवीन विना वातानुकूलित "स्लिपर कम सिटर' रातराणी बस "एसटी'च्या ताफ्यात आणण्यात आली आहे. प्रवाशांना सेवा देण्यासाठी जानेवारीअखेर राज्यभरातील सर्व विभागांमध्ये मिळून 200 रातराणी बस दाखल होणार असून, या अंतर्गत जळगाव विभागात आज चार "स्लिपर कम सिटर' बस दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या बस जळगाव- पुणे मार्गावरच धावणार आहेत. 

जळगाव ः एसटीची नवीन विना वातानुकूलित "स्लिपर कम सिटर' रातराणी बस "एसटी'च्या ताफ्यात आणण्यात आली आहे. प्रवाशांना सेवा देण्यासाठी जानेवारीअखेर राज्यभरातील सर्व विभागांमध्ये मिळून 200 रातराणी बस दाखल होणार असून, या अंतर्गत जळगाव विभागात आज चार "स्लिपर कम सिटर' बस दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या बस जळगाव- पुणे मार्गावरच धावणार आहेत. 

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरू केल्या आहेत. एसटीकडे सध्या साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बसद्वारे सेवा देण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून स्लिपर बसेसला प्राधान्य देतात. तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. या पार्श्‍वभूमीवर महामंडळात नवीन बांधणीची सिटर आणि स्लिपर अशा दोन्ही सुविधा असलेली शयन- आसन रातराणी बस दाखल झाली आहे. 

स्लिपर आणि सिटरचे एकच भाडे 
महामंडळाने "स्लिपर कम सिटर' वातानुकूलित बस सेवेत आणल्या आहेत. बसमध्ये 30 पुश- बॅक सीट, 15 प्रशस्त अशी स्लिपर सिटची व्यवस्था आहे. 12 मीटर लांबीची बस आहे. माईल्ड स्टील प्रकारातील बांधणी केली आहे. पुढील बाजूस एलईडी नामफलक आहे. तसेच मागील बाजूस कॅमेरा आहे. याशिवाय प्रत्येक कोचजवळ रीडिंग लॅम्प, नाईट लॅम्प स्लिपर कोचसाठी आहे, या शिवाय फॅन आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा स्वतंत्र दरवाजा आहे. या प्रकारची बससेवा राज्यातील प्रमुख शहरांसाठी सुरू होत आहे. यात जळगावचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना साध्या बस भाड्यात प्रवास करता येणार आहे. प्रतिटप्पा (6 किमी.) दहा रुपये भाडे आहे. बसमधील स्लिपर आसनसाठी सिटींगच्या आसनाचेच भाडे लागणार आहे. म्हणजेच जळगाव- पुणे मार्गावर साडेसहाशे इतक्‍या भाड्यात प्रवास करता येणार आहे. 

जळगाव- पुणे मार्गावर सुरवात 
महामंडळातील ही नव्या बांधणीच्या चार बस जळगाव विभागाला प्राप्त झाल्या आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावर या बस सोडण्याचे नियोजन राहणार असून जळगाव- पुणे मार्गावर बस सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

आज बससेवेचा शुभारंभ 
महामंडळातील "स्लिपर कम सिटर' असलेल्या बस या पुणे मार्गावर सोडण्यात येत आहे. याचा प्रारंभ उद्या (ता.30) जळगाव आणि चोपडा आगारातून करण्यात येत आहे. यात जळगाव आगारातून ही बस रात्री साडेआठला मार्गस्थ होईल. तर चोपडा बसस्थानकावरून धुळे मार्गाने जाणारी बस देखील रात्री साडेआठला सुटणार आहे. 

बसची वैशिष्ट्ये 
- मोबाईल चार्जिंगची सुविधा, मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच. 
- प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी दिवा आणि झोपेसाठी निळ्या रंगाचा दिवा. 
- प्रत्येक शयन कक्षासाठी एक पंखा. 
- सुरक्षिततेसाठी वाहनामध्ये आग प्रतिबंधक उपकरणे. 
- प्रत्येक आसनाजवळ बेल पुश. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST sleeps "Slipper Come Sitter" Bus