Unseasonal Rain : मालपूर येथील शेतकऱ्याने कांदापीक काढण्यासाठी लढविली नामी शक्कल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unseasonal rain farmers harvested onions by hooking tractor to vakhar dhule news

Unseasonal Rain : मालपूर येथील शेतकऱ्याने कांदापीक काढण्यासाठी लढविली नामी शक्कल!

दोंडाईचा (जि. धुळे) : गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. अजूनही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (unseasonal rain farmers harvested onions by hooking tractor to vakhar dhule news)

त्यामुळे मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्याने तयार झालेले कांदापीक काढण्यासाठी नामी शक्कल लढविली आहे. मंजुरीची बचत होईल या हिशेबाने थेट ट्रॅक्टरला वखर लावून कांदा काढण्यासाठी लगबग सुरू केली आहे. कांद्याला किमान पंचवीस रुपये किलो भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी सुनील धनगर यांनी कलवाडे शिवारातील शेतीत कांदा पिकाची लागवड केली आहे. त्यांचा मुलगा सुरंजन धनगर हा शेती अवजार वापरण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतो. मजुरीचे दर वाढल्याने शेती न परवडणारी झाल्याची ओरड शेतकऱ्यांची असते.

महागडी बी-बायाणे, खते, फवारणींतर्गत मशागतीची कामे यासाठी लागणारे भांडवल शेतकरी कर्ज काढून उभे करतो. ऐनवेळी पिकांचे उत्पादन येईल अशा वेळी अवकाळीचा तडाखा पिकांना बसला आहे. पिकांचे नुकसान झाली, भाव गडगडले. मजुरी वाढली यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

एकेक रुपयाची बचत कुठून होईल यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागला आहे. कांदा काढणीस आला असताना वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत. झालेच तर वेळीच उत्पादन हाती घेण्यासाठी खूप कसरत करावी लागते. पंधरा दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण कायम आहे. जर का पाऊस झाला तर काढणीस आलेले कांदापीक हातातून जाईल.

या भितीपोटी थेट ट्रॅक्टरला वखर लावून कांदा काढला जात आहे. फक्त खांडणी करण्यासाठी मजुरी लागणार आहे. वेळेची आणि पैशाची बचत होईल यासाठी शेतकऱ्याने ही शक्कल लढविली आहे. कांद्याच्या वाफ्याची अंतराची पास बनवून वखराला लावून कांदा काढला जात आहे. याच अवजाराचा उपयोग भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी केला जाऊ शकतो, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

"वेळेची बचत होईल. जास्त मजूर लागणार नाही. त्यामुळे पैशाची बचत होईल. अवकाळी पावसामुळे पीक वाया जाण्याची भीती आहे." -सुनील धनगर, शेतकरी, मालपूर (ता. शिंदखेडा)

टॅग्स :DhulerainOnion Crop