कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, रिक्षाचालकांच्या अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

नंदुरबार : मुलांच्या शिक्षणाची सोय, शिक्षणात आरक्षण, अल्प उत्पन्न गटात नोंद, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण, थांब्यासाठी जागा यासह विविध कल्याणकारी योजना राबवाव्यात अशी अपेक्षा रिक्षा चालकांनी व्यक्त केल्या आहेत.

नंदुरबार : मुलांच्या शिक्षणाची सोय, शिक्षणात आरक्षण, अल्प उत्पन्न गटात नोंद, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण, थांब्यासाठी जागा यासह विविध कल्याणकारी योजना राबवाव्यात अशी अपेक्षा रिक्षा चालकांनी व्यक्त केल्या आहेत.

रिक्षा चालविण्याचा व्यवसायातून आता फारशी कमाई राहिलेली नाही. खासगी वाहनांच्या संख्येत वाढ, परमिट-विना परमिट वाहतुकीचा मुद्दा, शहरातील कमी झालेले अंतर, त्यासाठीचा मिळणारा मोबदला, पेट्रोलचे वाढलेले दर त्यातून आलेली संकटे यामुळे रिक्षा व्यवसाय धोक्यात येऊ लागला आहे. त्यातच थांब्यासाठी नसलेली जागा, पोलिसांचा त्रास यामुळे रिक्षाचालक कंटाळले आहेत. उत्पन्न कमी आणि गरजा जास्त असे चित्र निर्माण झाले आहे. काहींना ४० ते ५० वर्ष होऊनही त्यांची प्रगती नाही. दैनंदिन गरजाही पूर्ण होऊ शकत नसलेले तुटपुंजे उत्पन्न, त्यातून मुलांचा शिक्षणाचा खर्चही ते भागवू शकत नाही. त्यामुळे परिवहन सेवेचे काम करणाऱ्या या रिक्षा चालकांसाठी शासनानेच लक्ष घालणे गरजे आहे.

लोणीकरांचा शिरपूर येथे निषेध

या आहेत प्रमुख मागण्या

शासनाने कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, मुलांसाठी शिक्षणाची सोय करावी, शिक्षणात सवलती द्याव्यात, अल्प उत्पन्न गटात नोंद व्हावी, व्यवसायासाठी कर्जपुरवठा करावा, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणावे, थांब्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, आरोग्यासाठी सवलत मिळावी आदी.

समितीकडून पटोलेंची भेट

रिक्षा चालकांच्या प्रश्नाबाबत ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईतील विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठख घेण्यात आली. परिवहन व कामगार विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारीही बैठकीस उपस्थित होते. रिक्षा चालकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिवहन खात्यांतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, जिल्हानिहाय लोकसंख्येच्या आधारावर रिक्षा परवाने, परमिट देण्यात यावे. खासगी ऑटोरिक्षासह जीप, मॅजिकमधून होणारी बेकायदा वाहतूक राज्यातून संपुष्टात आणण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात यावे, प्रादेशिक परिवहन समितीवर जिल्हानिहाय ऑटोरिक्षा चालकांचे प्रतिनिधी अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात यावे, अशा विविध मागण्या संघटनेने बैठकीत केल्या.

रिक्षाचालकांच्या प्रश्नाबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सकारात्मक तोडगा काढून, रिक्षाचालकांना न्याय देणार असल्याचे आश्वासन बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

या बैठकीस आनंद चौरे (नागपूर), सुरेश गलांडे, फिरोज मुल्ला (सांगली), महेश चौगुले, आरिफ शेख (मिरज), ईलियास लोधी (अकोला), नरेंद्र वाघमारे (कामठी), मारूती कोंडे (नवी मुंबई), प्रल्हाद सोनवणे (जळगाव), महीपती पवार, राजू पूजारी (सोलापूर), किशोर खरताळे, संजय गांगुले (नाशिक), विक्की तामचिकर, विनोद वरखडे (पिंपरी चिंचवड) आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welfare corporation should be set up, as the Rickshaw Drivers expect