"रात्रीस खेळ चाले"! विकृतांनी 'तिच्यावर' नजरा हेरल्या खऱ्या..पण, त्यांचा अंदाज चुकला..कारण..

नरेश हरनोळ : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

मुलींनो, महिलांनो, कसल्या तरी कारणांमुळे घरी जायला उशीर झाला असला, बस किंवा रिक्षाची वाट पाहत असलात अन्‌ कुणीतरी टपोरी येऊन तुमची छेड काढत असला तर घाबरून जाता ना तुम्ही... स्वाभाविक आहे ते. गेल्या काही दिवसांत नाशिक शहरातल्या अशा वर्दळीच्या ठिकाणी काही घटना घडल्याही. खरेदी, नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिला तिच्या अवतीभोवती घुटमळणाऱ्या, छेडखानी करणाऱ्या विकृतांनी हेरल्या खऱ्या. पण, त्यांचा अंदाज चुकला

नाशिक :दोन दिवसांपूर्वीची घटना... रात्री अकरा-साडेअकराची वेळ. एक पंजाबी ड्रेस घातलेली महिला त्र्यंबक रोडवरील ठक्कर बझार बसस्थानकात बसची प्रतीक्षा करीत होती. आवारात अत्यंत कमी वर्दळ. बसचे चालक-वाहक समोरच्या हॉटेलमध्ये बसलेले. काही रिक्षाचालकही. पण, फार कोणी नव्हते. मात्र एक 25 वर्षांचा तरुण त्या महिलेच्या आसपास घुटमळत होता. महिलेच्या नजरेने ते हेरले, त्या थांबूनच होत्या. वेळ जाऊ लागला तसा तो तरुण त्यांच्या दिशेने जवळ जवळ येत होता. काही अंतरावर आल्यावर मात्र त्याने अश्‍लील इशारा केला. त्याच्या नजरेतच वासना होती. महिलेने त्याच्याकडे कानाडोळा केला असता, त्याने पुन्हा शिटी वाजवून इशारा केला आणि "चलते का?' असे थेट विचारले... त्या तरुणाला काही कळायच्या आत नाशिक पोलिस निर्भया पथकाने घेरले आणि क्षणात आलेल्या गाडीत बसवत बेड्या ठोकल्या... ही एक प्रासंगिक घटना, पण लैंगिक विकृतीला ठेचून काढण्यासाठीच पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून "डिकॉय ऑपरेशन' (स्टिंग ऑपरेशन) साकारले आहे. 

"नाइट कल्चर'ची ती शिकार होऊ शकते. 

नाशिकमध्ये रात्री साडेनऊ-दहानंतर बहुतांशी सामसूम होते आणि सुरू होतो "नाइट कल्चर'चा शो. शहरातील निमाणी, मध्यवर्ती बसस्थानक, ठक्कर बझार, महामार्ग बसस्थानक आणि नाशिक रोड बसस्थानक यांसह पंचवटी कारंजा, शालिमार, रामकुंड, गोदाघाट, काही मोजके रिक्षाथांबे या ठिकाणी रात्री-अपरात्री एकटी महिला असणे तसे धोक्‍याचेच. मात्र जर एखादवेळी महिला अशा ठिकाणी रात्री-अपरात्री आलीच तर "नाइट कल्चर'ची ती शिकार होऊ शकते. 

"ती'च्या संरक्षणासाठी निर्भया पथकाचा असाही रात्रीस खेळ चाले 

खरेदी, नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिला तिच्या अवतीभोवती घुटमळणाऱ्या, छेडखानी करणाऱ्या विकृतांनी हेरल्या खऱ्या. पण, त्यांचा अंदाज चुकला. त्या तरुणी साध्या वेशातल्या पोलिस होत्या. नाशिक पोलिस आयुक्‍तालयाच्या निर्भया पथकाच्या सदस्या होत्या. छेडखानी करताच त्यांनी इशारा केला अन्‌ सोबतच्या पोलिसांनी स्थानकसख्याहरीच्या मुसक्‍या आवळल्या. गेले काही महिने शाळा-कॉलेज, बगिचे किंवा इतर फिरण्याच्या ठिकाणी हे पथक असे ऑपरेशन करायचे. आठवडाभरापासून सार्वजनिक ठिकाणी हा कौतुकाने दखल घेण्यासारखा "रात्रीस खेळ' चालू आहे. रात्री-अपरात्रीही मुली, महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी हा राज्यातला पहिला प्रयोग आहे. ठक्‍कर बझार, निमाणी या बसस्थानकांवर अशा सडकसख्याहरींच्या मुसक्‍या आवळल्याने रात्री उशिरा वासनांध नजरा घेऊन तिथे रेंगाळणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागलीय. तीन दिवसांनंतर सुरू होणाऱ्या नव्या वर्षात ती आणखी कमी होईल आणि ती सुरक्षित राहील, यात शंका नाही... 

स्टिंग ऑपरेशन राबविणारे "नाशिक आयुक्तालय' एकमेव 
हैदराबादच्या घटनेमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यातूनच शहरात महिलांच्या निर्भया पथकामार्फत "डिकॉय' ऑपरेशन सुरू केले. असे डिकॉय ऑपरेशन राबविणारे नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव पोलिस आयुक्तालय आहे. "जिची छेड काढावी, तीच महिला पोलिस' असली तर असा संदेशच वासनांधापर्यंत पोचणे हाच या "डिकॉय' ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे. जे यात सापडले त्यांच्यावर पथकाने विनयभंगाचे गुन्हेच दाखल केले आहेत. 

"डिकॉय' ऑपरेशन यशस्वी... 
"डिकॉय' अर्थात स्टिंग ऑपरेशन... शाळा-महाविद्यालयांमध्ये युवतीची छेडखानी करणाऱ्या तरुणांचे स्टिंग ऑपरेशन करणे आणि त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन कारवाई करणे होय. त्यासाठी पोलिस आयुक्तांनी निर्भया पथकाची स्वतंत्र रचना केली. यात साध्या वेशातील महिला पोलिस कर्मचारी वा अधिकारी रात्रीच्या वेळी बसस्थानक, शहर बसथांबे, रेल्वेस्थानक, रिक्षाथांबे, रामकुंड, गोदाघाट आदी ठिकाणी थांबतात. काही अंतरावरच साध्या वेशातील पोलिस मोबाईलमध्ये चित्रण करतात. त्याच वेळी साध्या वेशातील महिलेला कोणतीही इजा पोचू नये, यासाठी काही पोलिस सापळा रचून सज्जही असतात. संशयित "डिकॉय'च्या जाळ्यात अडकल्याचा इशारा होताच, दबा धरून असलेले पोलिस संशयितावर झडप घालतात. व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये पोलिसांच्या हाती संशयिताविरोधात पुरावाही उपलब्ध होतो आणि त्यानुसार पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केले जात आहेत. 

हेही वाचा > चलती है क्या ?'तिला रिक्षात बसण्याचा इशारा केला..अन् त्यावेळीच..

"अर्ली मॉर्निंग टू लेट नाइट' ऑपरेशन 
पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील आणि उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकाचे कामकाज चालते. शहर पोलिस आयुक्तालयात नियुक्तीस असलेल्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती महिला निर्भया पथकात करण्यात आली. आयुक्तालय हद्दीत चार विभाग केले. यात निर्भया पथक एक : पंचवटी, आडगाव, म्हसरूळ. 
निर्भया पथक दोन : सरकारवाडा, गंगापूर, भद्रकाली, मुंबई नाका. 
निर्भया पथक तीन : सातपूर, अंबड, इंदिरानगर. 
निर्भया पथक चार : उपनगर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प. 
एका विभागात एक महिला पोलिस उपनिरीक्षक, दोन महिला कर्मचारी, एक पुरुष कर्मचारी अशा दोन पथकांची नेमणूक केली आहे. पहाटे सहा ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते मध्यरात्री बारापर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये पथक शहरात देखरेख करते. याशिवाय, रात्री-अपरात्री कधीही कॉल आला तर पथक घटनास्थळी जाते. पथकाकडून "डिकॉय ऑपरेशन'शिवाय, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे, मुली, युवती, महिलांशी सुसंवाद साधणे, महिला सुरक्षा विभाग व निर्भया पथकाच्या संपर्क क्रमांकासह महिला पोलिस अधिकाऱ्यांचे तत्काळ संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देणे, टवाळखोरांकडून लक्ष्य होणाऱ्या युवतीने संपर्क साधताच साध्या वेशातील पथक दाखल होऊन कारवाई करते. 

या क्रमांकावर करा संपर्क 
शहर महिला हेल्पलाइन क्रमांक : 1091 
शहर सीनिअर सिटिझन हेल्पलाइन क्रमांक : 1090 
शहर पोलिस कंट्रोल रूम : 100/0253-2305233/2305234/2305238 
शहर व्हॉट्‌सऍप क्रमांक : 8390209518 
नाशिक ग्रामीण पोलिस कंट्रोल रूम : 0253-2309715/2303044/2200495/2200401 
मालेगाव ग्रामीण पोलिस कंट्रोल रूम : 02554-231000/235115/231551 

हेही वाचा > ...यामुळे तीन दिवसांच्या तान्हया बाळाला सोडून आई..."माता न तू वैरिणी"

"पोलिसदीदी-पोलिसकाका' 
पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेनुसार शहरातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात पोलिसदीदी-पोलिसकाका ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्या-त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळा-महाविद्यालयात एक महिला पोलिस कर्मचारी दीदी-पुरुष कर्मचारी काका यांच्याकडे जबाबदारी आहे. ते वारंवार त्या शाळा-महाविद्यालयाला भेट देतात. तक्रार असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांना भेटतात. दीदी-काकांचे संपर्क क्रमांकही शाळेत देण्यात आले. 

मुलींचे धाडस अन्‌ गुन्हे दाखल 
वारंवार शाळा-महाविद्यालयांमध्ये महिला पोलिसांकडून होणाऱ्या उपक्रमांमुळे काही मुलींचा आत्मविश्‍वास वाढला आणि त्यांनी धाडसाने महिला पोलिसांकडे संपर्क साधून तक्रारी केल्या. यातील काही तक्रारी कौटुंबिक, तर काही टवाळखोरांकडून होणाऱ्या छेडखानीच्या होत्या. विशेषत: सावत्र बाप व सावत्र भावाकडून लैंगिक छळप्रकरणी जिल्ह्यात दोन, तर शहरात एक गुन्हा दाखल आहे. 

नक्‍की पहा > त्याने कागदावर काढले अपघाताचे चित्र आणि पुढे जे काही घडले थरकाप उडविणारे...
... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman safety sting operation by Nashik Police Marathi News