कोरोनामुळे सार्वजनिक नवरात्र उत्सवास शासनाने परवानगी नाकारली

एल.बी.चौधरी 
Wednesday, 7 October 2020

शासनाचे पोलिस ठाण्यात आगामी नवरात्रबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून गणेशोत्सवाला असलेले नियम नवरात्र उत्सवाला लागू केले आहेत.

सोनगीर (धुळे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणेच येत्या 17 आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक नवरात्र उत्सवास शासनाने परवानगी नाकारली असून यंदा गरबा व दांडियाची धूम दिसणार नाही. घरातच देवीच्या मूर्तीची स्थापना करून उत्सव शांततेत व साध्या पध्दतीने साजरा करावा लागणार आहे. दरम्यान नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या व दीडशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या धुळे, सोनगीर, शिरपूर, बेटावद, पारोळा येथील रथोत्सवाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील रथयात्रेचे यंदाचे हे 165 वे वर्ष आहे.
 
शासनाचे पोलिस ठाण्यात आगामी नवरात्रबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून गणेशोत्सवाला असलेले नियम नवरात्र उत्सवाला लागू केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक गरबा मंडळास स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असून चौकात केवळ चार फूट उंचीची व घरात दोन फूट उंचीची मूर्ती स्थापनेस परवानगी देण्यात येईल. जिल्ह्यात प्रत्येक गावात सार्वजनिक गरबा मंडळे गरबा नृत्यात लहान थोर मंडळी सहभागी होतात.
 
प्रत्येक कुटुंबाची कुलदेवता असते. नवरात्रात देवीची पूजा केली जाते. मात्र सध्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही. यापार्श्वभूमीवर यंदा सर्वच धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरा होत आहे. त्यामुळे साहजिकच नवरात्र उत्सवावरही मर्यादा आली आहे.  गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. आरतीत कमीत कमी कार्यकर्ते असावे, असे शासनाचे आदेश आहेत.

धुळे तहसीलदार यांचे नवरात्र उत्सवाबाबत मार्गदर्शन प्राप्त झाल्याचे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दहा दिवस धुळे, सोनगीर, शिरपूर, बेटावद, पारोळा वहन यात्रा निघते. एकादशीला रथयात्रा साजरा होते. यानिमित्त यात्राही भरते. त्यात कोट्यावधीची उलाढाल होते. यंदा ही उलाढाल ठप्प राहण्याची भिती आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year the government has denied permission for the public navratra celebrations due to corona